वेस्ट इंडिजविरुद्ध आज शेवटचा साखळी सामना

आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये फक्त एक विजय मिळवू शकलेल्या भारतीय महिला संघाला वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना ही अखेरची संधी असेल. हा सामना गमावल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे, त्यामुळे कसलीही तमा न बाळगता फक्त विजयाचेच ध्येय ठेवून भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

महिलांच्या ‘ब’ गटामध्ये इंग्लंडने तिन्ही सामने जिंकत बाद फेरीत प्रवेश केला आहे, तर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचे तीन सामन्यांमध्ये चार गुण आहेत. तीन सामन्यांनंतर भारताच्या खात्यामध्ये फक्त दोन गुण असून हा सामना जिंकून त्यांचे चार गुण होतील. पण या सामन्यानंतर जर पाकिस्तानचा संघ अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत झाला तरच भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असेल. पण जर भारताने हा सामना जिंकला आणि पाकिस्ताननेही त्यांचा अखेरचा सामना जिंकला, तर भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

भारताने विजयानिशी विश्वचषकाची सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्यांना पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध सामने गमवावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना फक्त ९० धावाच करता आल्या होत्या.

डकवर्थ-लुईस नियमांनुसार पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फक्त दोन धावांनी पराभूत झाल्याचा फटका भारताला बसला होता. भारताची कर्णधार मिताली राज, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्ती या चांगल्या फलंदाजी करू शकतात, पण त्यांच्या खेळात सातत्य पाहायला मिळालेले नाही. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज

झुलान गोस्वामीकडे चांगला अनुभव आहे.

वेस्ट इंडिजने जर हा सामना जिंकला तर त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यावर विजय मिळवला असला तरी त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून बाद फेरीच्या दिशेने ठोस पाऊल टाकण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आतुर असेल.