२०१९च्या विश्वचषकापर्यंत खेळणार असल्याची धोनीची नाटय़मय ग्वाही
ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत निवृत्तीचा प्रश्न येणारच याची जाणीव कर्णधार महेंद्रसिंग धोनीलासुद्धा होती. पण यापुढेही आपण खेळत राहणार असल्याचे संकेत जरूर दिले. एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने निवृत्तबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर त्याने २०१९च्या विश्वचषकापर्यंत आपण खेळणार असल्याचा इशाराच जणू दिला. बांगलादेशविरुद्धची लढत अखेरच्या चेंडूवर जिंकल्यानंतर पत्रकाराच्या प्रश्नानंतर धोनीने भारताच्या विजयाचा तुम्हाला आनंद झालेला नाही, असे मला वाटते, अशा खोचक शब्दांत राग व्यक्त केला होता.

धोनीनाटय़
(पात्र : महेंद्रसिंग धोनी आणि ऑस्ट्रेलियन पत्रकार)
पत्रकार : तू या खेळातील जवळपास सर्व काही प्राप्त केले आहे. यापुढेसुद्धा तू खेळणे चालू ठेवणार का?
धोनी : ये इकडे. चल जरा गंमत करू. खरेच ये इथे.
(पत्रकार व्यासपीठावर येताच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत संवादाला प्रारंभ केला.)
धोनी : मी निवृत्त व्हावे, असे तुला गंभीरपणे वाटते?
पत्रकार : मी तुला प्रश्न विचारलाय.
धोनी : हा प्रश्न भारतीय पत्रकाराकडून येणे, हे मला अपेक्षित होते. मग मला नक्की विचारता आले असते की तुझा मुलगा खेळण्याइतपत आणि यष्टीरक्षण करण्याइतपत मोठा झाला आहे का? जर त्याने नाही म्हटले असते, तर मी विचारले असते, ठीक आहे. मग तुझा भाऊ आहे का, जो खेळू शकेल आणि यष्टीरक्षण करू शकेल. तू चुकीच्या दारूगोळ्याचा चुकीच्या वेळी स्फोट केला आहेस.
धोनी : माझे मैदानावरील धावणे पाहून तुला मी तंदुरुस्त नाही, असे वाटते का?
पत्रकार : नाही, तू अतिवेगवान आहेस.
धोनी : मग मी २०१९च्या विश्वचषकापर्यंत टिकू शकेन असे तुला वाटते का?
पत्रकार : होय, नक्कीच!
धोनी : झाले तर मग. तुला
तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.

पराभवानंतरही भारतीय संघाचे कौतुक
वेस्ट इंडिज संघाकडून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही भारतीय संघावर समाजमाध्यमांतून कौतुकांचा वर्षांव झाला.

भारतीय खेळाडूंना नशिबाने साथ दिली नाही. सामना थरारक झाला आणि तुम्ही कडवी झुंज दिली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघांना अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.
– सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

निकाल काही असो, भारतीय संघाचा अभिमान वाटतो. सर्वोत्तम खेळ केला. सुरुवातीपासून दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक.
– प्रग्यान ओझा, भारताचा फिरकीपटू

काय सामना होता. यापूर्वी अशा प्रकारची लढत मी पाहिली नव्हती. वेस्ट इंडिजला विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दोन दिवस लागतील.
– ग्लेन मॅक्ग्रा, ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज

निकाल काय लागला हे विसरा. हा विलक्षण सामना होता. दोन अव्वल संघ.. योग्य खेळपट्टी.. अविश्वसनीय प्रेक्षक.. आणि ट्वेन्टी-२०ची जादू.
– मायकेल वॉन, इंग्लंडचा माजी कर्णधार

अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम.. वेस्ट इंडिज संघाचे कौतुक. वेस्ट इंडिजचा असल्याचा अभिमान वाटतो.
– ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार

वेस्ट इंडिजने चांगली खेळी केला. भारतीय खेळाडूंची कामगिरी मात्र निराशाजनक झाली.
– अनिल कुंबळे, भारताचा माजी फिकरीपटू