कोणत्याच सामन्याची पटकथा पूर्वीपासून लिहून तयार नसते, असे बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खडसावले. एखाद्या निष्णात बुद्धिबळपटूप्रमाणेच त्याने चाली रचल्या आणि हा डाव जिंकून दाखवला. २००७चीच पुनरावृत्ती बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पाहायला मिळाली.
पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. नावारूपाला नसलेल्या जोगिंदर शर्माच्या हाती धोनीने चेंडू सुपूर्द केला. तेव्हा मिसबाह उल हकने षटकार खेचत विजयाचे दार ठोठावले. पण तो आत्मघातकी फटका पाकिस्तानला विजयाच्या उंबरठय़ावरून मागे खेचणारा ठरला आणि भारत विश्वविजेता झाला. यावेळी प्रतिस्पर्धी होता बांगलादेश. अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. समोर हार्दिक पंडय़ासारखा कामचलाऊ मध्यमगती गोलंदाज. पण पंडय़ालाच यावेळी गोलंदाजी का दिली, याचे उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘‘या परिस्थितीत कशी गोलंदाजी करायची, याचा विचार आम्ही करत होतो. यॉर्करवर भर द्यायचा की, ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकायचे. त्यावेळी योग्य रणनीती आम्ही आखली. माझ्यापुढे युवराज सिंग, सुरेश रैना आणि हार्दिक पंडय़ा असे तीन गोलंदाज होते. मी त्यामध्ये हार्दिकला पसंती दिली, त्यानेही रणनीतीनुसार चेंडू टाकले.’’
पंडय़ाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत मुशफिकर रहिमने विजयी गर्जनाही केली. पण फक्त गर्जना करून काही होत नसते, हे धोनीला चांगलेच माहिती होते. त्यानंतरच्या चेंडूवर मुशफिकर बाद झाला, त्याचा अहंकार मोडीत निघाला. त्यावेळी धोनीने क्षेत्ररक्षणात काही बदल केले. याबाबत धोनी म्हणाला की, ‘‘आमच्यासाठी प्रत्येक धाव महत्त्वाची होती. जिथे फलंदाज फटके मारण्याची शक्यता होती, तिथे चांगले क्षेत्ररक्षक उभे करायचे होते. डीप पॉइंट ते डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग ते डीप पॉइंट असे बदल केले, त्यामध्ये थोडा वेळ गेलाही, पण ते गरजेचेच होते.’’
त्यानंतरच्या पाचव्या चेंडूवर अनुभवी महमुदुल्लाही मोठा फटका मारता बाद झाला. एक चेंडू आणि बांगलादेशला विजयासाठी दोन धावांची गरज होती. पांडय़ाने धिम्यागतीने टाकलेला चेंडू थेट धोनीच्या हातात विसावला आणि त्याने यष्टय़ांचा अचूक वेध घेतला. सारे काही अविश्सनीय, अद्भूत, अप्रतिम, अवर्णनीय असेच. सारे शब्दांत व्यक्त करण्याच्या पलीकडले. मोठी धावसंख्या नसताना, चार झेल सोडलेले असताना आणि तीन चेंडूंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त दोन धावा असताना मिळालेला हा विजय आश्चर्यकारक असाच.
धोनीच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे हा विजयाध्याय लिहिला गेला. पंडय़ाला अखेरचे षटक देणे, दोन चौकारांनंतरही त्याच्यावर न रागावता विश्वास ठेवणे, चोख क्षेत्ररक्षण लगावणे, हेच धोनीचे कर्तृत्व. त्यामुळे भारताला एका धावेने रोमहर्षक विजयाची नोंद करता आली. या पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अखेरच्या षटकापूर्वी धोनीबरोबर बरेच खेळाडू चर्चा करताना दिसले, त्यामध्ये आशीष नेहरा अग्रस्थानी होता. धोनी कुणाला दुखावत नाही. पण साऱ्यांचे ऐकून घेतल्यावर तो आपल्या मनाचे ऐकतो आणि निर्णय घेतो. याबाबत धोनी म्हणाला की, ‘‘अखेरच्या षटकापूर्वी गोंधळाचे वातावरण होते. बांगलादेशचे फलंदाज चांगले खेळत होते. त्यावेळी बरेच खेळाडू माझ्याबरोबर चर्चा करत होते. गोलंदाज आणि फलंदाज त्यांच्या दृष्टिकोनातून आपली मते व्यक्त करत होते. त्यांची मते मी ऐकून घेतली. फलंदाज आणि खेळपट्टी यांचा विचार केला. त्यानुसार मला जे योग्य वाटले तो निर्णय मी घेतला.’’
धावगती वाढवण्यासाठी पहिली फलंदाजी करणे महत्त्वाचे होते. नाणेफेकीचे नाणे रुसले असले तरी कौल भारताच्या बाजूने लागला. नाणेफेक बांगलादेशने जिंकली खरी, पण भारताला फलंदाजी बहाल केली. होरपळलेले रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना आत्मविश्वासाने फलंदाजी करत होते. ट्वेन्टी-२०ची नजाकत त्यांच्या फलंदाजीमध्ये क्वचितच दिसत होती. मोठे फटके फार कमी दिसत होते. फॉर्मात असलेल्या विराट कोहलीलाही मोठे फटके मारून मोठी खेळी साकारता आली नाही. याबाबत धोनी म्हणाला, ‘‘संथ खेळपट्टीवर अजून काय होणार होते?’’ पण चाणाक्ष धोनीने युवराज सिंगच्या आधी पंडय़ाला फलंदाजीला पाठवला. हा त्याचा निर्णय अखेरचे षटक देण्यासारखाच अनाकलनीय, पण इथेही धोनी जिंकला. एक षटकार आणि दोन चौकार लगावून तो आपली वेगवान खेळी संपवून बाद झाला. धोनीलाही मोठे फटके मारता येत नव्हते. २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याला मोठा फटका मारता आला नाही, तेव्हा धोनी स्वत:वरच रागावला.
या सामन्यात धोनीच्या हातून झालेली सर्वात मोठी चूक म्हणजे, त्याने सुरेश रैनाला दुसरे षटक द्यायला हवे होते किंवा युवराज सिंगकडून एखादे षटक टाकून घ्यायला हवे होते. पण जिंकल्यावर विजयाच्या नशेत सारेच मश्गुल आहेत. होळी तर विजयाने साजरी झाली, पण आता आव्हान आहे ते विजयाचे आणि धावगतीची टांगती तलवार डोक्यावर असेलच.
हातातला विजय गमावल्यामुळे बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा दु:खी अंत:करणाने साऱ्यांसमोर आला. विजयाचा घास ओठांपर्यंत येऊन हिरावल्याची निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. ‘‘तीन चेंडूंत दोन धावांची गरज होती, दोन चांगले फलंदाज खेळपट्टीवर होते, चार विकेट्स हातात होते, अशा परिस्थितीतून सामना गमावणे अतीव दु:खदायक आहे. शेवटच्या तीन चेंडूंपूर्वी सारे काही आमच्या बाजूने होते, पण या तीन चेंडूंमध्ये आम्ही तीन फलंदाज गमावले आणि विजयाचा घास हिरावला. यावेळी मैदानातील फलंदाजांनी नेमके काय केले, हे मी सांगू शकत नाही, माझ्यासाठीही हे अनाकलनीय आहे. अशा पद्धतीने सामना गमावल्यामुळे तुम्ही कमकुवत होता. पण एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला सावरायला हवे.’’

‘कॅप्टन कूल’ भडकतो तेव्हा..
बांगलादेशवर अविश्वसनीय विजय मिळवून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्रकार परिषदेसाठी आला आणि पहिल्याच प्रश्नावर त्याचा पारा चढला. या सामन्यापूर्वी सारेच धावगतीची चर्चा करत होतो, पण या विजयामुळे अपेक्षित
धावगती साधता आली नाही, असे एका पत्रकाराने विचारल्यावर ‘कॅप्टन कूल’ धोनी भडकला आणि म्हणाला की, ‘‘मला वाटते आहे की, तुम्हाला या विजयानंतर आनंद झालेला नाही. माझे बोलणे पूर्णपणे ऐका. तुमच्या बोलण्यावरूनच असे वाटत आहे. क्रिकेटच्या सामन्याची कोणतीच पटकथा नसते. तुम्हाला पृथक्करण
करावे लागते की, ज्या खेळपट्टीवर पराभूत झाल्यावर आम्ही फलंदाजी केली, काय कारण होते त्याचे. जर तुम्ही बाहेर बसून या साऱ्या गोष्टींचा विचार करू शकत नसाल तर तुम्ही हा प्रश्न विचारू शकत नाही!’’