अभिनयाच्या फटकेबाजीने अवघ्या चित्रपटरसिकांना वेड लावणाऱ्या शाहरूख खानने आज क्रिकेटच्या मैदानावरसुद्धा शाब्दिक फटकेबाजी करत क्रिकेटरसिकांची मने जिंकली. तब्बल अर्धा तास क्रिकेटरसिकांनी शाहरूखच्या शाब्दिक फटकेबाजीचा सोहोळा अनुभवला. आयपीएलमधील क्रिकेट संघाचा मालक म्हणून खेळाडूंना ‘चिअरअप’ करणाऱ्या शाहरूखलाच आजपर्यंत क्रिकेटरसिकांनी पाहिले होते. मात्र, त्याच्या या नव्या रूपालासुद्धा त्यांनी तेवढीच दाद दिली.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि अभिनयाच्या विशिष्ट शैलीने रसिकप्रेक्षमांची मने शाहरूख खाने जिंकली. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स हा त्याचा संघ क्रिकेटच्या मैदानात त्याने उतरवला होता, पण आता चक्क क्रिकेट समालोचन करून क्रिकेट रसिकांच्या मनात शिरकाव केला. टी-२० विश्वचषकासाठी झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे इंग्रजीत सुरेख संचालन त्याने केले आणि समालोचनाच्या क्षेत्रातही आपण मागे नाही, हे दाखवून दिले. त्याची गंभीर दखल क्रिकेटविश्वाने घेतली. आयपीएलमधील क्रिकेट संघाचा मालक म्हणून खेळाडूंना चिअरअप करताना क्रिकेट रसिकांनी त्याला पाहिले होते. मात्र, भारत-बांगलादेशच्या सामन्याचे पहिल्या अध्र्या तासाचे समालोचन त्याने केले. बंगळुरूच्या चिन्ना स्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. शाहरूखसोबत समालोचन कक्षात भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर होते. क्रिकेटक्षेत्रातील या दिग्गजांसोबत शाहरूखची शाब्दिक फटकेबाजी पाहून आधी क्रिकेटरसिकांना आश्चर्य वाटले. या गोड धक्क्यातून सावरत तेवढीच उत्स्फूर्त दादही त्यांनी दिली.