धडाकेबाज फलंदाज, भागीदारी फोडण्यात निष्णात गोलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक असा ऑस्ट्रेलियाचा सर्वागीण अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार आहे. विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी वॉटसनने यासंदर्भात घोषणा करत सर्वानाच चकित केले. कारकीर्दीत विविध दुखापतींनी त्रस्त केलेल्या वॉटसनची कामगिरी गेल्या वर्षभरात खालावली आहे. वारंवार उद्भवणाऱ्या दुखापती, ढासळता फॉर्म आणि वाढते वय या मुद्दय़ांचा विचार करून ३४ वर्षीय वॉटसनने निवृत्तीची घोषणा केली आहे.
‘‘निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. निवृत्तीचा विचार गेले काही दिवस मनात रुंजी घालत होता. ऑस्ट्रेलियाचा संघ युवा खेळाडूंचा आहे. हा संघ हळूहळू विकसित होत आहे. कुटुंबाला वेळ देणे हे माझे प्राधान्य आहे. आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाचे भरगच्च स्वरूप लक्षात घेता कुटुंबाला वेळ देता येणार नसल्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे,’’ असे भावुक वॉटसनने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली कारकीर्दीची सुरुवात करण्याचे भाग्य मला लाभले. अव्वल खेळाडूंसह खेळताना मला मिळालेले ज्ञान युवा खेळाडूंना देताना माझ्या मनात समाधानाची भावना आहे.’’
२०१३मधील भारत दौऱ्यात अभ्यासात कमी पडल्याने प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांच्या निर्णयामुळे वॉटसनला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यावेळी निवृत्तीचा विचार मनात आला होता का, यावर वॉटसन म्हणाला, ‘‘नक्कीच. त्यावेळचे संघातील वातावरण गढूळ होते. मी माझ्या खेळाचा आनंद
घेऊ शकत नव्हतो. क्रिकेट किंवा कोणताही खेळ खेळताना आनंद मिळणे महत्त्वाचे असते. तो कारकीर्दीतला वाईट टप्पा होता. डॅरेन लेहमन यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर ताण निवळला.’’
एकदिवसीय प्रकारातील २००७ आणि २०१५ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा वॉटसन अविभाज्य घटक होता. सहा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याचा मानही वॉटसनच्या नावावर असून, २०१२ विश्वचषकात त्याला स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Untitled-26