ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक सामन्यात कोहलीने अद्भुत फलंदाजीच्या जोरावर भारताला एकहाती विजय मिळवून दिला. कोहलीच्या या खेळीचे जगभरातून कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांबरोबर इयान चॅपेलसारख्या माजी महान क्रिकेटपटूनेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव केला आहे. दस्तुरखुद्द कोहलीनेही माझी ही सर्वोत्तम खेळी असल्याचे सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या १६१ धावांचा पाठलाग करताना भारताची १४व्या षटकात ४ बाद ९४ अशी अवस्था होती आणि या संथ होत जाणाऱ्या खेळपट्टीवर मोठे फटके मारणे सोपे नव्हते. पण अशा परिस्थितीतही कोहलीने ५१ चेंडूंत नाबाद ८२ धावांची खेळी साकारत अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकवून दिला. त्यामुळेच त्याच्या या खेळीला क्रिकेटविश्वाने कुर्निसात केला आहे.
फेब्रुवारी महिन्यात कोहली म्हणाला होता की, जेवढे षटकार मला मारावेसे वाटतात तेवढे लागत नाहीत. त्यामुळे मी चौकार मारण्यावर जास्त लक्ष देतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्याने ११ चौकार लगावले आणि त्यापैकी आठ चौकार अखेरच्या पाच षटकांमध्ये म्हणजे दडपणाखाली मारले.
या खेळीनंतर कोहली म्हणाला की, ‘‘माझ्यासाठी ही खेळी सर्वोत्तम अशीच आहे, कारण या खेळीदरम्यान मी फार भावनिक झालो होतो. ऑस्ट्रेलियासारखा क्रिकेटविश्वातील अव्वल संघ समोर होता. आमच्यासाठी हा उपांत्यपूर्व फेरीचा सामनाच होता. काही करून विजय मिळवायचाच होता. मायदेशात खेळत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांना जेवढे होऊ शकेल तेवढे खूश ठेवण्याचा, त्यांचे मनोरंजन करण्याचा माझा हेतू होता आणि तो सफलही झाला.’’
या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियासमोर १६१ धावांचे आव्हान अवघड होते, पण कोहलीच्या अद्वितीय खेळीमुळे भारताने पाच चेंडू राखून हा सामना जिंकला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयी चौकार लगावला, त्या वेळी कोहलीने खेळपट्टीवर बस्तान मांडले. बॅट आणि ग्लोव्हज खाली ठेवत त्याने विजयाचा सुस्कारा सोडत विजयाचे दडपण उतरवले.
याबाबत कोहली म्हणाला की, ‘‘या वेळी काय बोलावे ते मला सुचत नाही. कारण या विजयाने मला गहिवरून आले आहे. ऑस्ट्रेलियाकडून सामना हिरावून घेत आम्ही उपांत्य फेरीत प्रवेश केला. माझ्या मते क्रिकेट असेच खेळले गेले पाहिजे. प्रत्येक सामन्यागणिक तुम्हाला नवीन आव्हाने समोर येत असतात. पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला अशी परिस्थिती आपल्यावर यावी असे वाटत नसते.’’
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये कोहली फार भावनिक झाला होता आणि त्याला सावरण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिथे होता. याबाबत कोहली म्हणाला की, ‘‘सामन्याच्या अखेरच्या काही षटकांमध्ये मी भावनिक झालो होतो. त्याचबरोबर अतिउत्साही होतो. पण धोनीने मला सांगितले की, शांत हो. भावनांचा उद्रेक होऊ देऊ नकोस. त्यानुसार मी शांत राहिलो आणि विजयावर शिक्कामोर्तब करू शकलो.’’
या खेळीमध्ये कोहलीने बऱ्याच गोष्टी पाहिल्या, पण परिस्थितीला स्वत:वर वरचढ होऊ दिले नाही. आठव्या षटकात सुरेश रैना आखूड चेंडूवर फटका मारताना बाद झाला आणि संघाची ३ बाद ४९ अशी अवस्था झाली. त्यानंतर युवराज सिंग फलंदाजीला आला. काही कालांतराने युवराजच्या पायाला दुखापत झाली आणि तो दुहेरी धावा घेताना दिसला नाही. पण या वेळी आक्रमक कोहली शांत राहिला. हवेत फटके मारून धावगती वाढवण्याचे त्याने टाळले. या दोघांनी ३५ चेंडूंत ४० धावांची भागीदारी रचली, त्यामध्ये फक्त दोन चौकारहोते. परिस्थिती कदाचित हाताबाहेर जाऊ शकत होती. पण कोहली शांत राहिला. आपली विकेट त्याने आंदण दिली नाही, यामध्येच त्याच्या खेळातील परिपक्वता दिसून आली.
याबाबत कोहली म्हणाला की, युवराजसोबत खेळतानाचा काळ थोडासा कठीण होता. कारण युवराज हा मोठे फटके मारून सामना जिंकवून देणारा खेळाडू आहे, पण त्या वेळी तो ७० टक्केच तंदुरुस्त होता, पण त्या वेळीही संघाचा विचार करून युवराजने मैदान सोडले नाही. युवराजने त्यानंतर काही मोठे फटके मारले. त्याचा हा निर्णय योग्यच होता.’’
युवराजनंतर धोनी फलंदाजीला आला. त्यानंतर या दोघांनी एकेरी-दुहेरी धाव घेत ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांकडून धावा चोरल्या. याबाबत कोहली म्हणाला की, ‘‘माझ्या आणि धोनीमध्ये चांगला समन्वय आहे. क्षेत्ररक्षकाला पळवण्यासाठी कुठे चेंडू मारायचा आणि धावा चोरायच्या, हे आम्ही ठरवत होतो. त्यासाठी व्यायामशाळेमध्ये जावे लागते, त्यासाठीच धावण्याचा सराव करायचा असतो. या गोष्टींमुळेच आम्हाला या धावा घेणे सोपे झाले. जेव्हा मी थकलेलो असतो तेव्हा खेळायला मला आवडते. थकल्यावर मी मैदानावर आल्यावर खाते उघडण्यापूर्वी कसा धावू शकतो, तसे मी धावण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते हे सरावाचेच फळ आहे.’’
स्थिरस्थावर झाल्यावर कोहलीने सतराव्या आणि अठराव्या षटकात जो धावांचा पाऊस पाडला, तो विलक्षण असाच होता. या दोन षटकांमध्ये त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. फॉकनरच्या पहिल्या दोन्ही चेंडूंवर त्याने चौकार लगावले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावत त्याने दडपण काहीसे हलके केले. या षटकात भारताने १९ धावांची लूट केली. त्यानंतर नॅथन कल्टर-निलेच्या १९व्या षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूंवर चौकार लगावत भारतासाठी विजयाचे दार उघडले. तीन षटकांमध्ये भारताला ३९ धावांची गरज होती, पण कोहलीच्या या फटकेबाजीने अखेरच्या षटकात भारताला फक्त चार धावांची गरज होती. धोनीने अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

कोहलीची अद्भुत फलंदाजी -धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आम्ही विराट कोहलीच्या अद्भुत खेळीमुळेच जिंकू शकलो, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर व्यक्त केले.‘‘ कोहलीची ही खेळी अविस्मरणीय अशीच आहे. कारण खेळपट्टी संथ होती, त्यामुळे चेंडू बॅटवर सहजपणे येत नव्हता. त्यामुळे या खेळपट्टीवर मोठे फटके मारणे सोपे नव्हते. कोहलीची ही खेळी अफलातून अशीच होती,’’ असे धोनी म्हणाला.
तो कोहलीबाबत पुढे म्हणाला की, ‘‘गेल्या चार वर्षांमध्ये कोहलीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. जेव्हा तुम्ही मोठय़ा खेळी खेळत असता तेव्हा त्यामधून बरेच काही शिकत असता. कोहली हा धावांचा भुकेला आहे. तो आपल्या खेळीतील चुकांमधून बरेच काही शिकला आहे. चुकांमधूनही त्याने बरेच काही सकारात्मक घेतले आहे. हे एका चांगल्या फलंदाजाचे लक्षण आहे.’’
‘‘कोणत्याही एका फलंदाजावर अवलंबून असता कामा नये, पण सध्याच्या घडीला कोहली अप्रतिम क्रिकेट खेळत आहे. आम्हाला चांगली सलामी मिळालेली नाही, त्याचबरोबर मधल्या फळीकडूनही लौकिकाला साजेशी कामगिरी होताना दिसत नाही. जेव्हा मधल्या षटकांमध्ये चांगल्या धावा येतात तेव्हा दडपण कमी असते. पण तरीही सध्याच्या घडीला अन्य फलंदाजांनीही चांगली फलंदाजी केल्यास आमचा खेळ अजूनही बहरू शकतो,’’ असे धोनी म्हणाला.