जवळपास ३० हजार तिकिटे अजूनही शिल्लक; बंगाल क्रिकेट असोसिएशनपुढे तिकीट विक्रीचा प्रश्न
उपांत्य फेरीत भारत पराभूत झाला आणि याचा थेट परिणाम अंतिम फेरीच्या तिकीट विक्रीवर होताना स्पष्टपणे जाणवत आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत खेळताना वानखेडे स्टेडियमच्या बाहेर तिकिटांचा काळा बाजार सुरू होता, पण अंतिम फेरीची तिकिटे माफक दरात मिळत असतानादेखील चाहत्यांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या तरी आहे. सध्याच्या घडीला स्टेडियममधील ३० हजार तिकिटे अजूनही विकली गेलेली नाहीत, असा अंदाज आहे.
क्रिकेट विश्वचषकाची अंतिम फेरी म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच, पण बऱ्याचदा तिकिटांची विक्री पूर्ण झाल्यामुळे सामान्य चाहत्यांना अंतिम फेरीचा आस्वाद घेता येत नाही. पण हा अंतिम फेरीचा सामना सामान्य चाहत्यांसाठी सुवर्णसंधी असेल.
सध्याच्या घडीला ईडन गार्डन्सच्या जवळपास ४० टक्के तिकिटे अजूनही विकल्या गेलेल्या नाहीत. यामध्ये क्लब हाऊसच्या बाजूला असलेल्या ‘एल’ ब्लॉक तळमजल्यावरील तिकिटांची विक्री अजूनही झालेली नाही. ‘एल’ ब्लॉकच्या बाजूलाच असलेल्या ‘के’ ब्लॉकच्या कोणत्याच तिकिट्स अद्याप विकल्या गेलेल्या नाहीत. ‘सी’ ब्लॉकची परिस्थितीही काहीशी अशीच आहे. येथेही दोन्ही मजल्यांच्या तिकिटांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
त्याचबरोबर ‘एच’ आणि ‘एफ’ ब्लॉकमध्येही तिकिटांच्या विक्रीबाबत अनिश्चितता आहे. ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये ‘डी’ ब्लॉक हा सर्वात मोठा भाग आहे. या स्टँडमध्ये स्टेडियममधील सर्वाधिक चाहते सामना बघत असतात. पण या ब्लॉकच्या पहिल्या मजल्याची तिकिटे विकली गेली असली, तरी तळमजल्याच्या तिकिटांना अजूनही जास्त भाव दिसत नाही. ही सारी तिकिटे ५०० ते १५०० रुपयांदरम्यान असतात. त्यामुळे सामान्य चाहत्यांना ही तिकिटे परवडणारी आहेत.
भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल, असा अंदाज वर्तवत बऱ्याच चाहत्यांनी अंतिम फेरीची तिकिटे काही दिवसांपूर्वीच विकत घेतली होती.
पण भारत पराभूत झाल्याने या सामन्याला जायचे का नाही, याचा विचार हे चाहते करत आहेत. जे चाहते बंगालबाहेरचे आहेत, त्यांनी मात्र या सामन्यासाठीच्या तिकिटांबरोबर हॉटेल आणि प्रवासाचेही बुकिंग केले होते. पण आताच्या घडीला हे संपूर्ण पैसे पूर्ण मिळत नसल्यामुळे काही चाहते या सामन्याला औपचारिकता म्हणून जाणार आहेत. पण बहुतांशी चाहत्यांचा भारत अंतिम फेरीत पोहोचला नसल्याने हिरमोड झाला असल्याने त्यांनी या सामन्याला उपस्थित न राहण्याचा विचार केला आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सची काही तिकिटे विकली गेलेली दिसली तरी स्टेडियममध्ये मात्र जास्त प्रेक्षक दिसू शकणार नाहीत. बंगाल क्रिकेट असोसिएशनला (कॅब) अंतिम फेरी खेळवण्याची संधी मिळाली असली तरी त्यांच्यापुढे तिकीट विक्रीचा प्रश्न फार मोठा आहे. यासाठी ‘कॅब’चा अध्यक्ष सौरव गांगुली काय शक्कल लढवतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जर चाहत्यांकडून या सामन्याला उत्तम प्रतिसाद मिळाला नाही, तर या तिकिटे प्रायोजक, प्रशासक, क्लब सदस्य आणि संलग्न क्लब्जना देण्यात येऊ शकतात.