12 July 2020

News Flash

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!

ऑस्ट्रेलियाचे संस्थान खालसा करीत वेस्ट इंडिजच्या महिलांची प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी

ऑस्ट्रेलियाचे संस्थान खालसा करीत वेस्ट इंडिजच्या महिलांची प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी
इतिहासाकडे मागे वळून पाहायचे नसते, तर इतिहास घडवायचा असतो. गुणवत्तेवर विश्वास असेल, मनगटात दम असेल, जिंकण्याची ईर्षां असेल, विजयश्री खेचून आणण्याची जिगर असेल तर इतिहास घडवण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही आणि हेच ईडन गार्डन्सवर महिलांच्या अंतिम फेरीत पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत असला तरी त्यांनी कसलेच दडपण घेतले नाही. फक्त स्वत:च्या गुणवत्तेवर विश्वास ठेवत त्यांनी अप्रतिम खेळ केला आणि पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घालत महिला क्रिकेटमध्ये इतिहास रचला. विश्वविजयाची हॅट्ट्रिक साजरी केलेल्या ऑस्ट्रेलियाला दिडशे धावांच्या आत रोखण्यात वेस्ट इंडिजचा संघ यशस्वी ठरला. १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १२० धावांची सलामी देत विजयाचा मार्ग प्रशस्त केला आणि त्यानंतर आठ विकेट्सने सहज विजय मिळवला. विजयी धाव घेतल्यावर वेस्ट इंडिजच्या महिलांना गगन ठेंगणे झाले होते. मैदानावर येऊन त्यांनी आपल्या आनंदाला नृत्याच्या रूपात वाट मोकळी करून दिली. कारण त्यांनी फक्त विश्वचषक जिंकला नव्हता, तर ऑस्ट्रेलियाचे राज्य खालसा करत जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता आणि वेस्ट इंडिजच्या क्रिकेट इतिहासाच्या अध्यायात त्यांनी सुवर्णाध्याय लिहिला होता.
कर्णधार स्टेफनी टेलर आणि हॅयली मॅथ्यूज यांनी विश्वविजयाचे ध्येय फक्त बाळगले नाही तर ते सत्यात उतरवण्यातही मोलाचा वाटा उचलला. कोणतीही जोखीम न पत्करता त्यांनी संयमपणे डावाची सुरुवात केली. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्यांनी ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी बोथट करत दर्जेदार फलंदाजीचा वस्तुपाठ दाखवून दिला. या दोघींनी १२० धावांची सलामी देत विजय खेचून आणला. मॅथ्यूजने ४५ चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६६ धावांची अतुलनीय खेळी साकारली. टेलरला विजयावर शिक्कामोर्तब करता आले नसले तरी तिची सहा चौकारांनिशी ५९ धावांची खेळी लक्षणीय ठरली.
नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाला सलामीवीर इलिस व्हिलानीने आक्रमक सुरुवात करून दिली. व्हिलानीने दहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मालिकेतील दुसरे अर्धशतक साजरे केले. पण त्यानंतरच्या षटकात दिएंद्रा डॉटिनच्या अप्रतिम चेंडूवर तिचा सुंदर झेल स्टेफनी टेलरने पकडला. व्हिलानीने ३७ चेंडूूंत ९ चौकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. व्हिलानी बाद झाल्यावर कर्णधार मेग लॅनिंगने १४व्या षटकात सलग तीन चौकार लगावले. १७व्या षटकात तिने स्पर्धेतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर ती मोठी खेळी साकारू शकली नाही. लॅनिंगने ८ चौकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया १६० धावांचा पल्ला गाठेल असे वाटत असताना डॉटिनने अखेरच्या षटकात फक्त एक धाव देत दोन बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ५ बाद १४८ (इलिस व्हिलानी ५२, मेग लॅनिंग ५२, इलिस पेरी २८; दिएंद्रा डॉटिन २/३४, अनिसा मोहम्मद १/१९, हॅयली मॅथ्यूज १/१३) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १९.३ षटकांत २ बाद १४९ (हॅयली मॅथ्यूज ६६, स्टेफनी टेलर ५९; क्रिस्टन बीएम्स १/२७)

* सामनावीर: हॅयली मॅथ्यूज.
* स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : स्टेफनी टेलर.

हा विजय आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण विश्वचषकापूर्वी आम्ही ही स्पर्धा जिंकू, असे कोणालाच वाटले नव्हते. आमच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. आनंद नेमक्या कोणत्या शब्दांत व्यक्त करायचा ते सुचत नाही. आता विश्वचषक हातामध्ये विसावल्यावर स्वप्न सत्यात उतरल्याची जाणीव झाली आहे.
– स्टेफनी टेलर, वेस्ट इंडिजची कर्णधार

वेस्ट इंडिजने आमच्यापेक्षा सरस खेळ
केला, हे मान्य करावेच लागेल. आम्ही १६० धावांचे लक्ष्य उभारण्याचे ठरवले होते. पण अखेरच्या षटकात आम्हाला फक्त एकच धाव मिळाली. वेस्ट इंडिजची सलामी अनपेक्षित अशीच झाली आणि त्यांनी आमच्याकडून सामना हिरावून घेतला.
– मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलियाची कर्णधार

ईडन डायरी
महिलांच्या सामन्याला चांगला प्रतिसाद
आतापर्यंत विश्वचषकात महिलांच्या सामन्यांना जास्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहण्यात आले नाही. पण इडन गार्डन्सवर रंगलेल्या महिलांच्या अंतिम फेरीसाठी प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली होती. जवळपास १५ हजार प्रेक्षकांनी या सामन्याला उपस्थिती लावत खेळाचा आनंद लुटला.
पुरुष संघाकडूनही अभिनंदनाचा वर्षांव
वेस्ट इंडिजच्या महिलांनी विश्वचषक पटकावल्यावर पुरुष संघातील खेळाडूंनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव केला. महिला क्रिकेटपटू आनंद साजरा करत असताना वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी, आंद्रे रसेल, जेरॉम टेलर, जॉन्सन चार्ल्स आणि प्रशिक्षक कर्टली अ‍ॅम्ब्रोज यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
सॅमीच्या संदेशाने प्रेरणा
अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाचा कर्णधार डॅरेन सॅमीने आपल्या आवाजात महिला संघाला एक संदेश पाठवला होता. या संदेशामध्ये त्याने महिला संघाला पाठिंबा आणि विश्वास दर्शवला होता. या संदेशामुळे आम्हाला विश्वविजयासाठी प्रेरणा मिळाली, असे वेस्ट इंडिजची महिला क्रिकेटपटू मेरिसा अग्युरेलियाने सांगितले.
खेळपट्टीचा प्रयोग फसला
खेळपट्टीवर गवत आणून भारतामध्ये वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी बनवण्याचा आयसीसीचे मुख्य खेळपट्टी निरीक्षक अँडी अ‍ॅटकिन्सन यांनी प्रयोग करून पाहिला. पण महिलांच्या सामन्याच्या वेळी वेगवान गोलंदाजांना कोणताच फायदा न मिळाल्याचे दिसून आले. खेळपट्टीवर चेंडू सहजपणे बॅटवर येत असल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 3:58 am

Web Title: west indies womens win world t20 final
Next Stories
1 स्टम्प व्हिजन : अनोळखी ओळख!
2 भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविड यांना विचारणा
3 आफ्रिदीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले
Just Now!
X