सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी आतुर ऑस्ट्रेलियाची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारतीय पुरुष संघाची भंबेरी उडवणाऱ्या नागपूरच्या जामठा स्टेडियमवर हा सामना होणार असल्याने पुन्हा एकदा खेळपट्टी चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. अष्टपैलू एलियास पेरी ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शन आणि घोटीव व्यावसायिकता यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ ओळखला जातो. अनुभवी रेने फारेल गोलंदाजीचा भार वाहणार आहे. युवा खेळाडूंचा भरणा ही ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू आहे.
डेन व्हॅन निइकर्क दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आधारस्तंभ आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये डेन व्हॅनने गेल्या काही वर्षांत प्रभावी कामगिरी केली आहे. शबनिम इस्माइल आणि मॅरिझन कापवर गोलंदाजीची धुरा आहे.