दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा थकलेले होते. त्याशिवाय ‘आयपीएल’ आणि विश्वचषकामध्ये अवघ्या दोन दिवसांचा फरक भारताच्या सुमार कामगिरीसाठी कारणीभूत ठरला, असे स्पष्ट मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

सोमवारी भारताने नामिबियावर सहज विजय मिळवला. परंतु पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्धचे सामने गमावल्याने भारताला अव्वल-१२ फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारत अखेरची स्पर्धा खेळत होता. त्यांच्यानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहे.

‘‘खरे सांगायचे तर मीसुद्धा मानसिकदृष्टय़ा थकलो आहे. माझ्या वयाचा विचार करता, हे स्वाभाविक आहे. मात्र खेळाडूंची मानसिक तसेच शारीरिक दमछाक झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जैव-सुरक्षित वातावरणात राहण्याबरोबरच सातत्याने क्रिकेट खेळणे अत्यंत अवघड होते. विशेषत: ‘आयपीएल’नंतर विश्वचषकाच्या तयारीसाठी पुरेसा वेळच हाती नसल्याने आपोआप संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला,’’ असे शास्त्री म्हणाले. ‘‘पराभवाची कारणे देणे मला आवडत नाही. परंतु या दोन स्पर्धेदरम्यान किमान दोन आठवडय़ांची विश्रांती पुरेशी ठरली असती. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध आमच्यात जिंकण्याची जिद्द दिसली नाही. दडपणाखाली जोखीम पत्करण्याऐवजी आम्ही बचावावर भर दिला. त्यामुळे देहबोलीसुद्धा खालावली. यामागे नक्कीच शारीरिक आणि मानसिक थकवा कारणीभूत ठरला,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले. त्याशिवाय द्रविडला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच भारताचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे शास्त्री यांनी नमूद केले.