नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने गोलंदाजीच्या सरावाला प्रारंभ केला असला तरी शुक्रवारी त्याची आणखी एक तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही, हे स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. या लढतीत हार्दिकने फलंदाजीत अवघ्या ११ धावांचे योगदान दिले. याशिवाय त्याचा उजवा खांदाही दुखावला. त्यामुळे आधीच गोलंदाजी न करणाऱ्या हार्दिकच्या संघातील स्थानाविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केला.

मात्र बुधवारी हार्दिक भारताच्या सराव सत्रात गोलंदाजी करताना आढळला. १५ मिनिटे गोलंदाजी केल्यानंतर हार्दिकने काही काळ फलंदाजीचा सरावही केला.

हार्दिक, भुवनेश्वरला वगळावे -गावस्कर

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी भारताने हार्दिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी इशान किशन आणि शार्दूल ठाकूर यांना संधी द्यावी, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मांडले आहे. ‘‘हार्दिक १०० टक्के तंदुरुस्त नसेल, तर भारताने त्याला खेळवण्याची जोखीम पत्करू नये. त्याऐवजी लयीत असलेल्या किशनला संधी द्यावी. भुवनेश्वर सातत्याने सुमार कामगिरी करत असून त्याची देहबोलीसुद्धा खालावलेली आहे. त्यामुळे शार्दूल त्याच्यापेक्षा उत्तम पर्याय ठरेल,’’ असे गावस्कर म्हणाले. मात्र गोलंदाजीत सहावा पर्याय हवा असल्यास हार्दिकऐवजी अश्विनला खेळवावे, असेही गावस्कर यांनी सुचवले.