इतिहास पुनरावृत्तीच्या उंबरठय़ावर

ट्वेन्टी-२० क्रिकेटची आकडेवारीसुद्धा भारतासाठी अनुकूल आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया लढतीला उपांत्यपूर्व सामन्याचेच स्वरूप

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असला तरी इतिहासाची पुनरावृत्ती येथे घडत असते. २०११च्या विश्वचषकाप्रमाणेच मोहालीत पाकिस्तान संघाचे आव्हान संपुष्टात आले आणि उपांत्यपूर्व फेरीचे महत्त्व प्राप्त झालेल्या साखळीतील अखेरच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्याच संघाशी झुंजावे लागणार आहे. त्या वेळी स्थळ होते अहमदाबादचे मोटेरा स्टेडियम आणि आता आहे मोहालीचे आय. एस. बिंद्रा स्टेडियम. पण भारतीय भूमीवर चालू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा भारताचा निर्धार मात्र पक्का आहे. (Full Coverage || Fixtures || Photos)

ट्वेन्टी-२० क्रिकेटची आकडेवारीसुद्धा भारतासाठी अनुकूल आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यांपैकी भारताने ८ जिंकले आहेत, तर ४ गमावले आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर ट्वेन्टी-२० मालिकेत हरवण्याचीही किमया साधली आहे. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकाची आकडेवारी मात्र दोन्ही संघांना समान संधी देणारी आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या चार सामन्यांपैकी दोघांनीही प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. पण याच ऑस्ट्रेलियाने गतवर्षी एकदिवसीय प्रकारातील विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताच्या आव्हानापुढे पूर्णविराम दिला होता, हे विसरता कामा नये.

आकडेवारी आणि फॉर्म साथ देणारा असला तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात गाफील राहणे चुकीचे ठरेल, असे भारताचा उपकर्णधार विराट कोहलीने सांगितले. तो म्हणाला, ‘‘यंदाच्या हंगामातील ट्वेन्टी-२० प्रकारातील भारताची कामगिरी सातत्यपूर्ण अशीच आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांच्यासोबतची ट्वेन्टी-२० मालिका जिंकणे, याकडे सकारात्मक पद्धतीनेच पाहता येईल. पण म्हणून भारताचे पारडे जड आहे, असे गृहीत धरून चालणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत ही आमच्यासाठी एक प्रकारे उपांत्यपूर्व फेरीचाच सामना आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला कसे हरवता येईल, हा विचार करताना कोणत्या गोष्टींमुळे त्यांना हरवू शकलो याचा अभ्यास करणेसुद्धा महत्त्वाचे आहे. पण भारतीय संघ क्षमतेनुसार खेळला, तर त्याची पुनरावृत्ती नक्की होईल.’’

भारताला भारतात हरवणे, हे अत्यंत अवघड आहे, याची कबुली ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सनने सामन्याआधीच दिली. तो म्हणाला, ‘‘बांगलादेशने भारताविरुद्धच्या सामन्यात थोडी अधिक चांगली कामगिरी केली असती, तर खूप बरे झाले असते. मग भारताशी होणाऱ्या सामन्याची चिंताच करण्याची आवश्यकता नव्हती. पण क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताशी त्यांच्याच भूमीवर सामना करणे हे अतिशय आव्हानात्मक असते. भारताला त्यांच्या भूमीवर हरवणे, हे अविश्वसनीय यश मानले जाते. भारतात खेळण्याचा मोठा अनुभव गाठीशी असल्यामुळे मला आणि संघातील अन्य खेळाडूंनाही याची जाणीव आहे.’’

नागपूरला न्यूझीलंडविरुद्ध ४७ धावांनी पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ खडाडून जागा झाला. मग कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहज हरवले. मात्र बंगळुरूचा बांगलादेशविरुद्धचा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. हार्दिक पंडय़ाच्या अखेरच्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर बांगलादेशचे तीन फलंदाज बाद झाले आणि भारताने अनपेक्षितपणे हा सामना खिशात घातला. आता सामना जगातील सर्वात व्यावसायिक संघ म्हटल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी आहे.

न्यूझीलंडकडून हार पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाने बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवून आपले आव्हान जिवंत राखले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार स्टीव्हन स्मिथ, उस्मान आणि शेन वॉटसन यांच्या फलंदाजीचा प्रत्यय सर्वानाच आला आहे. जेम्स फॉकनरने आपल्या मध्यमगती माऱ्याच्या बळावर शुक्रवारी पाकिस्तानचा निम्मा संघ गारद करण्याची किमया साधली होती. लेग-स्पिनर अ‍ॅडम झम्पा हे ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे अस्त्र ठरणार आहे. भारतीय खेळपट्टय़ांवर सरावलेल्या झम्पाने बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत अनुक्रमे ३ आणि २ बळी घेतले आहेत. डेव्हिड वॉर्नरचा हरवलेला सूर ही ऑस्ट्रेलियासाठी अद्याप चिंतेची बाब ठरत आहे.

भारताची सलामीवीर जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा अद्याप मोठी खेळी साकारू शकलेली नाही. सुरेश रैनाने बांगलादेशविरुद्ध ३० धावा काढल्या होत्या. युवराज सिंगही आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवू शकलेला नाही. या परिस्थितीत विराट कोहलीवरच भारताची प्रमुख मदार आहे. बांगलादेश विरुद्ध रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र निर्णायक क्षणी झेल सोडल्यामुळे भारताला बांगलादेशविरुद्ध झगडावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर भारताला क्षेत्ररक्षणातसुद्धा सुधारणा करावी लागणार आहे. भारत मोहालीत गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळला होता. त्या सामन्यात अजिंक्य रहाणेने दोन्ही डावांत शतके झळकावली होती. मात्र संघात फारसे बदल न करणारा धोनी रहाणेला संधी देण्याची शक्यता कमीच दिसते आहे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया (गट दुसरा)

  • स्थळ : पीसीए स्टेडियम, मोहाली
  • वेळ : सायंकाळी ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.

संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, मोहम्मद शमी, पवन नेगी.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅश्टॉन अ‍ॅगर, नॅथन कोल्टर-निले, जेम्स फॉकनर, आरोन फिन्च, जॉन हेस्टिंग्स, जोश हॅझलवूड, उस्मान ख्वाजा, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, पीटर नेव्हिल, अ‍ॅन्ड्रय़ू टाय, शेन वॉटसन, अ‍ॅडम झम्पा.

  • खेळपट्टीचा अंदाज :

ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे मोहालीत झालेले दोन्ही सामने मोठय़ा धावसंख्येचे होते. त्यामुळेच रविवारच्या सामन्यातसुद्धा फलंदाजीसाठी नंदनवन ठरू शकेल, अशा खेळपट्टीची अपेक्षा करण्यात येत आहे. मागील तिन्ही सामन्यांत लाभलेल्या खेळपट्टय़ांपेक्षा ही खेळपट्टी निराळी असल्यामुळे भारतीय संघाला या सामन्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे. मोहालीत झालेल्या दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करून सामने जिंकले आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Icc t20 world cup india vs australia