यंदाच्या टी-२० वर्ल्डकपची सुरुवात भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली आहे. याआधी कधीच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत न झालेल्या भारतीय संघाला यंदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यापाठोपाठ न्यूझीलंडविरुद्ध देखील भारताचा दारुण पराभव झाल्यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्डकपमधील आशा धूसर होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज अफगाणिस्तानसोबत होणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती असणार आहे. त्यामुळे प्रचंड दडपणाखाली असलेल्या टीम इंडियाला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
भारताचे पहिल्या टप्प्यातील उर्वरीत तीन सामने हे अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया या तुलनेने कमकुवत संघांसोबत होणार आहेत. मात्र, या तिन्ही सामन्यांमध्ये भारताला मोठा विजय मिळवणं आवश्यक आहे. तसेच, सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या सामन्यात करो या मरोच्या स्थितीत असलेल्या भारतीय संघाला सुनील गावसकर यांनी इशारावजा सल्ला दिला आहे. अफगाणिस्तानचा संघ प्रचंड धोकादायक असल्याचं ते म्हणाले आहेत.




“ते बिनधास्तपणे बॅट फिरवतात”
सुनील गावसकर म्हणाले, “अफगाणिस्तानचा संघ प्रचंड धोकादायक आहे. कारण २० षटकांच्या सामन्यांमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी कधीच न घाबरणारी ती टीम आहे. ते सरळ क्रीजच्या बाहेर येतात आणि बिनधास्तपणे त्यांची बॅट फिरवतात. त्यांच्याकडे काही गूढ फिरकी गोलंदाज आहेत आणि गेल्या काही काळात चांगल्या दर्जाची फिरकी गोलंदाजी खेळण्यात भारतीय फलंदाजांना अडचणी येत असल्याचं दिसत आहे. विशेषत: बॅक ऑफ द हँड स्पिन गोलंदाजी खेळताना भारतीय फलंदाज बिचकत आहेत”, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.
बनाना पील…!
सुनील गावसकर यांनी अफगाणिस्तानच्या संघाला ‘बनाना पील’ची उपमा दिली आहे. “ते ‘बनाना पील’सारखे आहेत. केळीच्या सालावरून आपण जसे अगदी सहज घसरून खाली पडू शकतो, त्याप्रमाणे अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना तुम्ही त्यांना फार गांभीर्याने न घेण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्ही घसराल आणि थेट खाली पडाल”, असं सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स टुडेसोबत बोलताना म्हटल आहे.
भारतीय फलंदाजांना सल्ला
दरम्यान, अफगाणिस्तानच्या या गूढ गोलंदाजीचा सामना कसा करावा, याबाबत सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांना सल्ला दिला आहे. “राशीद खान हा भारतीय फलंदाजांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारताला आक्रमक धोरण ठेवावं लागेल. भारतीय फलंदाजांना क्रीजच्या बाहेर येऊन फटके मारावे लागतील जेणेकरू त्यांच्या गोलंदाजांची लय बिघडवता येईल”, असं गावसकर म्हणाले आहेत.