भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्याकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं होतं. करो या मरोची स्थिती असलेल्या या सामन्यात भारतानं ६६ धावांनी विजय संपादित केल्यामुळे विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये भारताचं आव्हान अद्याप कायम राहिलं आहे. भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा आणि के. एल. राहुल यांच्या धडाकेबाज १४० धावांच्या सलामीच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २१० इतकी भलीमोठी धावसंख्या ठेवली. अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव करत विजयासोबतच नेट रनरेटही वाढवला. पण तरी देखील कर्णधार विराट कोहलीला बुधवारच्या सामन्यामध्ये रोहीत शर्मा आणि के. एल. राहुल यांच्यापेक्षाही तिसऱ्याच खेळाडूचा खेळ सर्वाधिक आवडला!

रोहीत आणि राहुल यांच्या खेळीवर सर्वच क्रिकेट चाहत्यांकडून आणि आजी-माजी क्रिकेटपटूंकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, विराट कोहलीचं मत काहीसं वेगळं आहे. सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात विराट कोहलीला कोणत्या खेळाडूची कामगिरी सर्वाधिक आवडली? असा प्रश्न विचारला असता विराट कोहलीनं रोहीत शर्मा किंवा के. एल. राहुल यांच्यापैकी कुणाचंही नाव न घेता थेट फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनचं नाव घेतलं. त्याचं कारणही विराटनं पुढे सांगितलं आहे.

विराट म्हणतो, “यासाठी अश्विननं फार मेहनत घेतली”

“आर अश्विनचं पुनरागम ही या सामन्यातली माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. ही अशी गोष्ट आहे, ज्यासाठी अश्विननं फार मेहनत घेतली आहे. अश्विननं याच प्रकारचं नियंत्रण आणि लय आयपीएलमध्ये देखील दाखवली आहे. तो एक विकेट टेकर गोलंदाज आहे”, असं विराट म्हणाला.

T20 WC : चान्स तो बनता है..! टीम इंडिया अजूनही गाठू शकते सेमीफायनल; जाणून घ्या कसं

आर अश्विननं बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात १४ धावांच्या बदल्यात २ गडी बाद केले. अश्विनची हीच कामगिरी भारताच्या विजयातली सर्वात चांगली बाब ठरल्याचं विराट म्हणाला.

दिवाळीच्या आधी अफगाणिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला, ”हा एक खेळ आहे, आम्ही वेळेनुसार अनेक निर्णय घेतो. वरच्या फळीतील तीन फलंदाज निश्चितच असतात, पण आम्ही पुढे जाऊन निर्णय घेतो. याचे श्रेय विरोधी संघाला द्यावे लागेल. प्रामाणिकपणे सांगायचे, तर नेट रन रेट माझ्याही मनात होता. आम्हाला सकारात्मकतेने पुढे जायचे आहे, पुढे काय होते ते पाहू.”

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारताने मागील सामन्यात केलेली चूक सुधारली. केएल राहुलसोबत रोहित शर्मा पुन्हा एकदा सलामीला आला आणि दोन्ही फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. या सलामीच्या जोडीने १४० धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ४७ चेंडूत ७४ धावा, तर केएल राहुलने ४८ चेंडूत ६९ धावांची शानदार खेळी केली. रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने १३ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या, तर हार्दिक पंड्यानेही यावेळी मनमोकळेपणाने फलंदाजी करत १३ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. रोहितला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.