भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांमध्ये आज टी-२० विश्वचषकातील सामना रंगणार आहे. या सामन्याची सर्वच क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असताना तशीच उत्सुकता प्रत्यक्ष क्रिकेटपटूंमध्ये देखील आहे. हेच नुकत्याच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमधून दिसून येतंय. हा व्हिडिओ भारत-पाकिस्तान सामना होणाऱ्या मैदानातला अर्थात दुबई इथला आहे. पाकिस्तानच्या संघाचा मैदानात सराव सुरू असताना भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान संघाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी मैदानाच्या बाजूने जात असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, त्याचवेळी मैदानात उभ्या असलेल्या पाकिस्तानच्या फास्ट बॉलरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचा फास्ट बॉलर शहनवाज दहानी याचा व्हिडीओ सध्या व्हायरत होत आहे. पण त्याहून जास्त त्याने धोनीला पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. शनिवारी अर्थात सामन्याच्या पूर्वसंध्येला मैदानात पाकिस्तानच्या संघाचा सराव सुरू असताना मैदानाच्या बाजूने भारतीय संघाचे खेळाडू जात होते. त्याच वेळी धोनी देखील तिथून जाताना दिसताच शहनवाज दहानीचं तिकडे लक्ष गेलं. धोनीला पाहताच दहानी काही वेळ स्तंभित झाला. त्याने धोनीला आवाज देऊन त्याला अभिवादन केलं.

धोनी म्हणाला, “मी म्हातारा होत आहे…”

मात्र, यावेळी धोनी आणि दहानी यांच्यात बोलणं देखील झालं. व्हिडीओमध्ये देखील त्यांचे संवाद अस्पष्ट असे ऐकू येत आहेत. यामध्ये धोनीशी बोलायला सुरुवात करताना, “तुम्ही धोनी आहात, मी दहानी आहे”, अशी कोटी करताना शहनवाज दिसतोय. या चर्चेमध्ये धोनी “मी आता म्हातारा होत आहे”, असं म्हणताच दहानीनं “तुम्ही आता आधीपेक्षाही फिट दिसत आहात”, असं म्हणत त्याला प्रतिसाद दिला.

एकीकडे हा व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसरीकडे भारत-पाकिस्तान सामन्याचा ज्वर हळूहळू वाढू लागला आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत ८ ट्वेन्टी-२० सामने झाले असून, यापैकी ६ सामने भारताने आणि एक सामना पाकिस्तानने जिंकला आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला.

पाकिस्तानविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत कोहलीने सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सहा डावांत सर्वाधिक २५४ धावा केल्या आहेत.

पाकिस्तान : (अंतिम १२)बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, इशान किशन, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

दोन्ही संघांचे कर्णधार काय म्हणतात…

भारत-पाकिस्तान सामन्याविषयी सगळीकडेच अनावश्यक चर्चा रंगते. परंतु आम्ही मात्र याकडे लक्ष न देण्यालाच प्राधान्य देतो. अमिरातीतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेऊन आम्ही संघनिवड केली असून प्रत्येक खेळाडूला त्याच्या भूमिकेबाबत पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या स्पर्धेत नक्कीच दमदार कामगिरी करू, याची मला खात्री आहे.

विराट कोहली, भारताचा कर्णधार

इतिहासाची उजळणी करण्यात आम्हाला मुळीच रस नाही. आम्ही विश्वविजेतेपदाच्या निर्धाराने येथे दाखल झालो असून भारताविरुद्धची लढत आमच्यासाठी अन्य सामन्याप्रमाणेच आहे. यंदा सर्व खेळाडू भारताला नमवण्याबाबत आशावादी असून आमच्या मैदानातील कामगिरीद्वारेच आम्ही ते दाखवून देऊ!

बाबर आझम, पाकिस्तानचा कर्णधार

सामन्याचे स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
वेळ : सायंकाळी ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak t 20 match today dhoni shahnawaj dahani video viral pmw
First published on: 24-10-2021 at 11:37 IST