पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने भारताची समीकरणे बिघडली -अरुण

२४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती.

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करल्याने भारताची पुढील सर्व समीकरणे बिघडली, अशी कबुली भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी दिली. त्याशिवाय जैव-सुरक्षित वातावरणात सातत्याने क्रिकेट खेळल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला, असेही अरुण यांनी सांगितले.

रविवार दुपारी न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवल्याने भारताचे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान अव्वल-१२ फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे आता सोमवारी भारताच्या नामिबियाविरुद्ध होणाऱ्या लढतीला फारसे महत्त्व उरलेले नाही. २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती.

‘‘यंदाच्या विश्वचषकात नाणेफेक जिंकणाऱ्या संघांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. त्यातच दुबईची खेळपट्टी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक लाभदायक ठरत होती. पाकिस्तानविरुद्ध आम्हाला या बाबींचा नक्कीच फटका बसला. त्यांनी दर्जेदार खेळ करताना आम्हाला एकदाही डोके वर काढण्याची संधी दिली नाही आणि त्यांच्याविरुद्ध झालेल्या पराभवामुळेच सर्व समीकरणे बिघडली,’’ असे अरुण  नामिबियाविरुद्धच्या लढतीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

याव्यतिरिक्त ‘आयपीएल’ आणि विश्वचषकाच्या आयोजनांत काही दिवसांचे अंतर असते, तर खेळाडूंना पुरेसी विश्रांती मिळून नव्या दमाने अभियानाला सुरुवात करता आली असती, असे अरुण यांनी नमूद केले. ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही जैव-सुरक्षित वातावरणात राहत असून सातत्याने विविध स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिका खेळत आहोत. त्यामुळे ‘आयपीएल’ संपल्यानंतर किमान दोन आठवडय़ांची विश्रांती खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा तयार होण्यासाठी सोयीची ठरली असती, असे मला वाटते,’’ असे अरुण यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कोहलीनेसुद्धा जैव-सुरक्षिततेचा मुद्दा मांडतानाच भारतीय खेळाडूंच्या देहबोलीविषयी भाष्य केले होते.

संघनिवडीबाबत मत व्यक्त करण्यास नकार

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून काही अनुभवी खेळाडूंना वगळल्यामुळे तुम्हाला धक्का बसला का, असे विचारले असता अरुण यांनी उत्तर देण्यास नकार दिला. ‘‘कोणत्याही स्पर्धेसाठी संघनिवड करण्याचे कार्य आमचे नसते. निवड समितीने १५ सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आणि आम्हाला त्यांच्यासोबतच खेळणे अनिवार्य असते. त्यामुळे यासंबंधी मी अधिक बोलू इच्छित नाही,’’ असे अरुण म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian bowling coach bharat arun express reason behind india poor performance t20 world cup zws

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या