अटीतटीच्या लढतीत बांगलादेशवर एका धावेने मात
बांगलादेशविरुद्धचा विजय भारताच्या ललाटावर कोरलेलाच होता, या सामन्याने तेच दाखवून दिले. मोठी धावसंख्या नाही, चार झेल सोडलेले, अखेरच्या षटकात ११ धावा असताना हार्दिक पंडय़ाकडे धोनीने चेंडू सुपूर्द करत मोठा जुगारच खेळला. त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार वसूल करत बांगलादेशच्या मुशफिकर रहिमने विजयाचे दार उघडले खरे, पण त्यानंतरच्या चेंडूवर तो बाद झाला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाहसुद्धा बाद झाला. एक चेंडू आणि विजयासाठी दोन धावा बांगलादेशला हव्या होत्या. हार्दिकचा हा चेंडू थेट धोनीच्या हातात विसावला. बांगलादेशच्या फलंदाजांनी एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण धोनीने थेट यष्टींचा वेध घेतला आणि अविश्वनीय, अद्भूत, अद्वितीय, असा विजय भारताच्या पदरी पडला. अखेरच्या तिन्ही चेंडूवर तीन फलंदाजांना बाद करत भारताने बांगलादेशवर अभूतपूर्व एका धावाने विजय मिळवला.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले, पण संथ खेळपट्टीवर धावांचे डोंगर रचण्याचे भारताचे मनसुबे अपयशी ठरले. फॉर्मात नसलेल्या भारताच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. हे दोघेही ‘पॉवर प्ले’च्या षटकांमध्ये मोठे फटके मारत नसल्याचे दिसतानाच प्रेक्षकांनी ‘वी वाँट सिक्सर’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि रोहित शर्मा (१८) आणि शिखर धवन (२३) यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत चाहत्यांची अपेक्षापूर्ती केली. आता हे दोघे मोठे फटके खेळत भारताची धावगती वाढवतील, असे वाटत असतानाच या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित बाद झाला. त्यानंतरच्या षटकात शकिब अल हसनने धवनला चकवत तंबूत माघारी धाडले आणि भारतीय संघाला पिछाडीवर ढकलले. या दोघांनी स्पर्धेतील सर्वोत्तम अशी ४२ धावांची सलामी दिली. खेळपट्टीचा पोत पाहता फॉर्मात असलेल्या विराट कोहलीलाही (२४) लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. या सामन्यातील चौदावे षटक चांगलेच रंगतदार ठरले. फिरकीपटू शुव्हागता होमच्या पहिल्या चेंडूवर रैनाने चौकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर कोहलीने षटकार लगावत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला, पण कोहलीने सुरेश रैनाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले.
कोहलीनंतर युवराज सिंगचा क्रमांक असला तरी कर्णधार धोनीने चाणाक्षपणे हार्दिक पंडय़ाला फलंदाजीसाठी बढती दिली. पंडय़ानेही या संधीचा फायदा उचलला. या षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने उत्तुंग षटकार लगावला. १४ व्या षटकात भारताने कोहलीला गमावले असले तरी सर्वाधिक १७ धावा कमावल्या. पंडय़ा एका बाजूने चांगला खेळत असताना स्थिरस्थावर झालेल्या रैनाकडून मोठय़ा फटक्यांची अपेक्षा होती, पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. रैनाने २३ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३० धावा केल्या. पंडय़ाही फटकेबाजी करण्याच्या नादात दोन चौकार आणि एका षटकारासह सात चेंडूत पंधरा धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये धोनी आणि युवराज सिंग ही जोडी मोठी फटकेबाजी करून धावसंख्या फुगवतील, असे वाटले होते, पण यामध्ये ते दोघेही अपयशी ठरले आणि भारताला १४६ धावांवर समाधान मानावे लागले. भारताने या डावात १० चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर १६ धावांमध्ये ७६ धावा फटकावल्या, पण उर्वरीत १०४ धावांमध्ये त्यांना फक्त ७० धावा करता आल्या. एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला असता तर भारताला धावसंख्या वाढवता आली असती.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना तमीम इक्बालने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला, पण चौथ्याच चेंडूवर सहा धावांवर त्याचा झेल आशीष नेहराने स्वत:च्याच गोलंदाजीवर सोडला. त्यानंतर तमीमला अश्विनच्या पाचव्या षटकातही जसप्रीत बुमराने झेल सोडत जीवदान दिले. त्यानंतरच्याच बुमराहच्या षटकात तमीमने चार चौकार लगावत जीवदानाचा फायदा उचलला. धोनीने हे सारे पाहत आपल्या लाडक्या रवींद्र जडेजाच्या हाती चेंडूवर सुपूर्द केला आणि त्याने चौथ्याच चेंडूवर तमीमचा काटा काढला. तमीमने ५ चौकारांच्या जोरावर ३५ धावा केल्या. तमीम बाद झाल्यावर शकिब अल हसनसारख्या (२२) अनुभवी खेळाडूला आठ धावांवर असताना अश्विनने हार्दिक पंडय़ाच्या गोलंदाजीवर जीवदान दिले, पण मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरला. यावेळी एका बाजूने सब्बीर रेहमान (२६) घातक फलंदाजी करत होती, पण रैनाच्या गोलंदाजीवर चपळाईने धोनीने त्याला यष्टीचीत केले. शकिब आणि सब्बीर बाद झाल्यावर बांगलादेशची धावगती मंदावली, पण त्यानंतर त्यांनी धावफलक हलता ठेवला. धोनीने यावेळी सौम्य सरकारचा १५ धावांवर सोपा झेल सोडला.
सामन्याचे पारडे दोलायमान अवस्थे असताना सामना अखेरच्या षटकांपर्यंत पोहोचला. अखेरच्या षटकांमध्ये त्यांना ११ धावांची गरज होती. हार्दिक पंडय़ाच्या अखेरच्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मुशफिकर रहिमने दोन चौकार लगावले. बांगलादेशला तीन चेंडूत विजयासाठी दोन धावांची गरज होती, पण अखेरच्या तिन्ही चेंडूवर तीन बळी घेत भारताने विजयाला गवसणी घातली.
संक्षिप्त धावफलक
भारत- २० षटकात ७ बाद १४६ (सुरेश रैना ३०, विराट कोहली २४; मुस्तफिझूर रहमान २/३४; अल-अमिन होसेन २/३७) – वि. बांगलादेश- २० षटकांत ९ बाद १४५ (तमीम इक्बाल ३५; आर. अश्विन २/२०, रवींद्र जडेजा २/२२)
सामनावीर : आर. अश्विन.