दुबई : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करला असला, तरी याचा बाऊ करू नये. आमचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले नसून उर्वरित लढतींमध्ये झोकात पुनरागमन करू, असा आशावाद भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला.

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘अव्वल-१२’ फेरीतील रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून धुव्वा उडवला. त्यामुळे १९९२च्या एकदिवसीय विश्वचषकापासून सुरू झालेली भारताची वर्चस्वमालिका खंडित झाली. कोहलीने मात्र चाहत्यांना खेळाडूंवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत पराभवाची कारणमीमांसा करताना विविध मुद्दय़ांवर भाष्य केले.

* शाहीनमुळे पिछाडीवर

शाहीन आफ्रिदीने पॉवरप्लेमध्ये अप्रतिम मारा केला. ३१ धावांतच तीन बळी गमावल्याने आम्ही पिछाडीवर पडलो. शाहीनने सुरुवातीपासून आमच्यावर दडपण टाकल्यामुळे अपेक्षित धावगती राखणे कठीण गेले.

* नाणेफेकीचा कौल निर्णायक

दुबईच्या खेळपट्टीवर दवाचा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अधिक सोपे झाले आणि गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी संर्घष करावा लागला.

* कामगिरी उंचावण्यात अपयशी

ेसुरुवातीला पिछाडीवर पडूनही आम्हाला अनेकदा मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयश आले. फलंदाजांकडून मोठय़ा भागीदाऱ्या झाल्या नाहीत. पाकिस्तानने तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्व गाजवल्याने ते नक्कीच विजयासाठी पात्र आहेत.

रोहितला वगळण्याचा विचार हास्यास्पद

रोहित पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे लयीत असलेल्या इशान किशनला डावलून रोहितला खेळवण्याचा निर्णय चुकला का, असे एका पत्रकाराने विचारले असता हसू अनावर झालेल्या कोहलीने शांत चित्ताने उत्तर दिले. ‘‘तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय धाडसी आहे. मी माझ्यामते सर्वोत्तम ११ खेळाडूंना संधी दिली. तुम्ही माझ्या जागी असता, तर काय केले असते? तुम्ही रोहितसारख्या फलंदाजाला ट्वेन्टी-२० संघातून वगळाल का? त्याने अखेरच्या सामन्यात काय कामगिरी केली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मी काहीतरी वादग्रस्त बोलावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर आधीच सांगा’’ असे कोहली म्हणाला.