T20 World Cup 2021 : स्कॉटलंडची अफगाणिस्तानशी गाठ

अव्वल-१२’ फेरीच्या अभियानाला विजयी प्रारंभ करण्याच्या निर्धाराने दोन्ही संघांतील खेळाडू मैदानात उतरतील.

शारजा : ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सोमवारी होणाऱ्या एकमेव सामन्यात झुंजार वृत्तीच्या स्कॉटलंडची धोकादायक अफगाणिस्तानशी गाठ पडणार आहे. ‘अव्वल-१२’ फेरीच्या अभियानाला विजयी प्रारंभ करण्याच्या निर्धाराने दोन्ही संघांतील खेळाडू मैदानात उतरतील.

गेल्या काही महिन्यांत झालेल्या सत्तासंघर्षांमुळे देशातील चाहत्यांना यानिमित्ताने पुन्हा क्रिकेटकडे वळवण्यासाठी अफगाणिस्तानचे खेळाडू उत्सुक असतील. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील या संघाची मदार प्रामुख्याने रशीद खान आणि मुजीब उर रहमान या फिरकी जोडीवर आहे. नबीकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असून सलामीवीर मोहम्मद शहझाद धडाकेबाज फलंदाजी करण्यात पटाईत आहे. सराव सामन्यात त्यांनी गतविजेत्या विंडीजला धूळ चारली.

दुसरीकडे कायले कोएट्झरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या स्कॉटलंडने प्राथमिक फेरीत अविश्वसनीय खेळ करून सलग तीन विजयांसह आगेकूच केली. यादरम्यान त्यांनी बांगलादेशलाही नमवले. जोश डेव्ही आणि ब्रॅडली व्हील यांची सलामीची जोडी स्कॉटलंडसाठी उत्तम योगदान देत असून डावखुरा फिरकीपटू मार्क व्ॉट मधल्या षटकांत बळी मिळवण्याची जबाबदारी यशस्वीपणे पेलत आहे. त्यामुळे स्काटॅलंडला कमी लेखणे अफगाणिस्तानला महागात पडू शकते.

६-० उभय संघांत आतापर्यंत झालेल्या सहाही ट्वेन्टी-२० सामन्यांत अफगाणिस्तानने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

२ ट्वेन्टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तान-स्कॉटलंड दुसऱ्यांदा आमनेसामने येत असून यापूर्वी २०१६च्या विश्वचषकात झालेल्या लढतीत अफगाणिस्तानने सरशी साधली होती.

संघ

अफगाणिस्तान : मोहम्मद नबी (कर्णधार), रशीद खान, रहमनुल्ला गुरबाझ, हजरतुल्ला झझई, उस्मान घानी, असगर अफगाण, नजीबुल्ला झादरान, हश्मतुल्ला शाहिदी, मोहम्मद शहझाद, मुजीब उर रहमान, करिम जनत, गुलाबदीन नैब, नवीन उल हक, हमिद हसन, फरीद अहमद.

स्कॉटलंड : कायले कोएट्झर (कर्णधार), रिची बेरिंगटन, डेलन बज, मॅथ्यू क्रॉस, जोश डेव्ही, अलासदेर एव्हान्स, ख्रिस ग्रीव्ज, मायकेल लीस्क, कॅलम मॅकलॉइड, जॉर्ज मुन्से, सफ्यान शरिफ, हमजा ताहिर, क्रेग व्ॉलास, मार्क व्ॉट, ब्रॅडली व्हील.

वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 afghanistan to play against scotland match prediction zws

ताज्या बातम्या