बोल्टच्या भेदकतेपुढे अफगाणिस्तानची भंबेरी

अबू धाबी : तब्बल १४ वर्षांचा जेतेपदाचा वनवास संपवून ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने ‘अव्वल-१२’ फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली शेवटची स्पर्धा खेळणाऱ्या भारताकडून तमाम देशवासीयांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र तसे न झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसऱ्या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ट्रेंट बोल्टच्या (३/१७) भेदक माऱ्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन (नाबाद ४०) आणि डेवॉन कॉन्वे (नाबाद ३६) यांच्या उत्तम फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानवर आठ गडी आणि ११ चेंडू राखून मात केली. न्यूझीलंडने या विजयासह उपांत्य फेरी गाठली असून अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.

अबू धाबी येथे झालेल्या या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात अफगाणिस्तानने दिलेले १२५ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १८.१ षटकांत गाठले. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत ८ बाद १२४ अशी धावसंख्या उभारली. हझरतुल्ला झझाई (२), मोहम्मद शहजाद (४) आणि रहमानुल्ला गुरबाझ (६) स्वस्तात माघारी परतल्याने अफगाणिस्तानची ३ बाद १९ अशी अवस्था झाली. मात्र, डावखुऱ्या नजीबुल्ला झादरानने एक बाजू लावून धरताना ४८ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. त्याला गुल्बदीन नैब (१५) आणि कर्णधार मोहम्मद नबी (१४) यांची काहीशी साथ लाभल्याने अफगाणिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभारली.

१२५ धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल (२८) आणि डॅरेल मिचेल (१७) यांनी न्यूझीलंडच्या डावाची आक्रमक सुरुवात केल्यावर त्यांना अनुक्रमे रशीद खान आणि मुजीब उर रहमानने बाद केले. त्यामुळे नऊ षटकांत न्यूझीलंडची २ बाद ५७ अशी धावसंख्या होती. मात्र, विल्यम्सन आणि कॉन्वे यांनी दडपण न घेता संयमाने फलंदाजी केली. त्यांनी ६८ धावांची अभेद्य भागीदारी रचत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : २० षटकांत ८ बाद १२४ (नजीबुल्ला झादरान ७३; ट्रेंट बोल्ट ३/१७, टीम साऊथी २/२४) पराभूत वि. न्यूझीलंड : १८.१ षटकांत २ बाद १२५ (केन विल्यम्सन नाबाद ४०, डेवॉन कॉन्वे नाबाद ३६; रशीद खान १/२७)

सामनावीर : ट्रेंट बोल्ट

रशीदचे सर्वात जलद ४०० बळी

अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू रशीद खानने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ४०० बळींचा टप्पा गाठला आणि ही कामगिरी करणारा तो केवळ चौथा गोलंदाज ठरला. मात्र, त्याने हा टप्पा सर्वात जलद (२८९ सामने) गाठला. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत रशीद चौथ्या स्थानी असून त्याच्या आधी ड्वेन ब्राव्हो (५१२ सामन्यांत ५५३ बळी), सुनील नरीन (३८३ सामन्यांत ४२५ बळी) आणि इम्रान ताहीर (३३४ सामन्यांत ४२० बळी) यांचा क्रमांक लागतो.

विंडीज, श्रीलंका पात्रता फेरीत खेळणार

दुबई : वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या माजी विजेत्यांना पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पात्रता फेरीचा अडथळा ओलांडावा लागणार आहे. ‘आयसीसी’च्या नियमांनुसार यंदाच्या विश्वचषकाचा विजेता, उपविजेता आणि त्यानंतर जागतिक क्रमवारीत पुढील सहा स्थानांवर असलेल्या संघांना थेट ‘अव्वल-१२’ फेरीत खेळण्याची संधी मिळते. इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ १५ नोव्हेंबपर्यंत क्रमवारीत आघाडीच्या सहा संघांत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र विंडीजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने त्यांची १०व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. बांगलादेशने विश्वचषकात सर्व लढती गमावल्या असल्या, तरी त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ट्वेन्टी-२० मालिकेत धूळ चारल्याने त्यांनी क्रमवारीत आठवे स्थान पटकावले. त्यामुळे श्रीलंकेची नवव्या स्थानी घसरण झाली.