ICC T20 World Cup : कोहली-शास्त्री यांना विजयी भेट? ; भारताची आज नामिबियाविरुद्ध अखेरची साखळी लढत

भारताच्या खात्यात चार गुण असून न्यूझीलंडचे आठ गुण झाले आहेत.

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी भारतीय संघ फक्त औपचारिकता म्हणून नामिबियाविरुद्धची लढत खेळणार आहे. या लढतीद्वारे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना विजयी निरोप देण्यासाठी भारताचे खेळाडू उत्सुक असतील.

विश्वचषकाला प्रारंभ होण्यापूर्वीच कोहलीने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. तर शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपत आहे. ही जोडी यंदा भारताला जेतेपद मिळवून देईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र भारताला ‘अव्वल-१२’ फेरीतच गाशा गुंडाळावा लागत आहे. २००७मध्ये भारताने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते. त्याशिवाय २०१२नंतर प्रथमच भारताला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करणाऱ्या भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला मोठय़ा फरकाने नमवले. मात्र त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी अफगाणिस्तानने न्यूझीलंडला नमवणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. भारताच्या खात्यात चार गुण असून न्यूझीलंडचे आठ गुण झाले आहेत. त्यामुळे अखेरची लढत जिंकूनही भारत आगेकूच करू शकत नाही, हे स्पष्ट झालेले आहे.

नामिबियाविरुद्धच्या लढतीचा विचार करता गेल्या दोन्ही सामन्यांत अर्धशतके झळकावणारा के. एल. राहुल आणि त्याचा साथीदार रोहित शर्मा यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त असेल. कोहलीसुद्धा छाप पाडण्यासाठी उत्सुक असेल. गोलंदाजीत स्कॉटलंडविरुद्ध भारताने रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी त्रिकुटासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. हा डाव यशस्वी ठरला असला तरी चक्रवर्तीला बळी घेता आला नाही. त्यामुळे लेगस्पिनर राहुल चहरला स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकते.

शास्त्री अहमदाबादच्या प्रशिक्षकपदी?

रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर संपत असला तरी ते लवकरच एका नव्या संघाला मार्गदर्शन करताना दिसू शकतील. ‘आयपीएल’मध्ये नव्याने समाविष्ट झालेला अहमदाबाद संघ शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून करारबद्ध करण्यास उत्सुक असल्याचे समजते.

’  वेळ : सायं. ७.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup india vs namibia match preview zws

Next Story
ख्रिस गेलचे कौशल्य सर्वोत्तम – मॉर्गन
ताज्या बातम्या