आपल्यापैकी अनेकांना वजन कमी करणं हे फार मोठं संकट वाटतं. अनेकांचं हे मत प्रत्यक्ष प्रयत्न केल्यानंतर तयार झालेलं असतं, तर अनेकांनी फक्त ऐकीव माहितीच्या आधारावर हे मत बनवलेलं असतं. पण कुणी जर तुम्हाला सांगितलं की अवघ्या २ तासांमध्ये ४.४ किलो वजन कमी केलं तर? अर्थात आपला विश्वास बसणार नाही. पण असं झालं आहे. सध्या दुबई आणि यूएईमध्ये टी-२० वर्ल्डकपचे सामने सुरू आहेत. बुधवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्याआधी न्यूझीलंड आणि स्कॉटलंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवर फलंदाज मार्टिन गप्टिल याचं चक्क ४.४ किलो वजन कमी झालं आहे! त्यानं स्वत:च या गोष्टीचा खुलासा केला आहे.

३३ डिग्री तापमान आणि ९३ धावांची खेळी!

बुधवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं स्कॉटलंडचा फक्त १६ धावांनी पराभव केला. त्याआधी स्कॉटलंडसमोर न्यूझीलंडनं विजयासाठी १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांमध्ये ९३ धावा एकट्या मार्टिन गप्टिलच्याच होत्या. पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर तंबू ठोकून बसलेल्या मार्टिन गप्टिलनं तब्बल ५६ चेंडू अर्थात न्यूझीलंडच्या डावातले जवळपास निम्मे चेंडू खेळून काढले. त्यात त्यानं सहा चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने ९३ धावांची खेळी केली. पण जेव्हा मार्टिन गप्टिल खेळत होता, तेव्हा दुबईतलं तापमान होतं ३३ डिग्री सेल्सियस.

विजयानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मार्टिननं हा खुलासा केल्याचं वृत्त स्पोर्ट्सकीडानं दिलं आहे. “जेव्हा मी फलंदाजी करून परतलो, तेव्हा माझं जवळपास ४.४ किलो वदन कमी झालं होतं. त्यामुळे मला तातडीन हायड्रेशन प्रक्रिया सुरू करावी लागली”, अशी प्रतिक्रिया ३५ वर्षीय मार्टिन गप्टिलनं दिली आहे.

  • उन्हाचा बसला फटका

मार्टिन गप्टिलनं सलामीवीर ग्लेन फिलिप्ससोबत १०५ धावांची भागीदारी केली. या खेळीमध्ये स्कॉटलंडच्या गोलंदाजांसोबतच दुबईच्या प्रचंड झळ बसाणाऱ्या उकाड्याचा आणि उन्हाचा देखील त्यानं सामना केला. त्याचाच परिणाम म्हणून त्याचं वजन कमी झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. “मी आता हळूहळू नॉर्मल होतो आहे. मैदानात असताना मी जवळजवळ उकडून निघालो होतो. पण आम्हाला मध्ये एक दिवस मोकळा मिळाला. त्यामुळे मला त्याचा फायदा झाला”, असं देखील गप्टिलनं सांगितलं आहे.