शारजा : निकोलस पूरनच्या (२२ चेंडूत ४० धावा) फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने शुक्रवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. या विजयासह विंडीजने स्पर्धेतील आव्हान शाबूत ठेवले आहे.

शारजा येथे झालेल्या या सामन्यात विंडीजने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकांत ५ बाद १३९ धावा करता आल्या. सलग तिसऱ्या पराभवामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य झाले आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यावर लिटन दास (४४) आणि कर्णधार महमदुल्ला (नाबाद ३१) यांनी पाचव्या गडय़ासाठी ४० धावांची भागीदारी रचली. मग दासला ड्वेन ब्राव्होने माघारी पाठवले. बांगलादेशला अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता असताना आंद्रे रसेलने केवळ नऊ धावा दिल्याने विंडीजने स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त केला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना विंडीजने ७ बाद १४२ अशी धावसंख्या उभारली. ट्वेन्टी-२० पदार्पणात रॉस्टन चेसने (३९) चांगली खेळी केली. तर अखेरच्या षटकांत पूरन आणि जेसन होल्डर (पाच चेंडूत १५ धावा) यांनी फटकेबाजी केल्याने विंडीजला १४० धावांचा टप्पा पार करता आला. दरम्यान, या सामन्यात विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डला दुखापत झाली.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : २० षटकांत ७ बाद १४२ (निकोलस पूरन ४०, रॉस्टन चेस ३९; शोरीफुल इस्लाम २/२०) विजयी वि. बांगलादेश : २० षटकांत ५ बाद १३९ (लिटन दास ४४, महमदुल्ला नाबाद ३१; जेसन होल्डर १/२२)

सामनावीर : निकोलस पूरन

’ गुण : विंडीज २, बांगलादेश ०

७ वेस्ट इंडिजचा हा बांगलादेशविरुद्धच्या १२ ट्वेन्टी-२० सामन्यांतील सातवा विजय ठरला. त्यांनी पाच लढती गमावल्या आहेत.