T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीनं टी-२० कर्णधारपदाबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाला…!

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर खुलासा केला आहे.

virat-kolhi

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-२० वर्ल्डकपमधला सामना होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला हा सामना फक्त भारतातल्याच नाही, तर जगभरातल्या क्रीडारसिकांसाठी उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा शेवटचा टी-२० वर्ल्डकप असणार आहे. मात्र, विराट कोहली कर्णधारपद न सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर चर्चा देखील होत असताना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीनं त्यावर खुलासा केला आहे. टाईम्स नाऊनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, टी-२० वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधारपदावरून सुरू असलेल्या चर्चंना विराट कोहलीनं उत्तर दिलं आहे. आयपीएल सुरू होण्याच्या आधी विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी पोस्ट टाकून टी-२० वर्ल्डकपनंतर २० ओव्हरच्या फॉरमॅटमधील संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच, त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाच्याही कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. त्यामुळे यंदाचा टी-२० वर्ल्डकप विराट कोहलीसाठी कर्णधार म्हणून शेवटचा ठरणार असल्याचं स्पष्ट झालं.

विराटच्या निर्णयावर उलट-सुलट चर्चा

मात्र विराट कोहलीच्या या निर्णयावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. खुद्द बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं विराटच्या या निर्णयावर आश्चर्य वाटल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे विराट कोहली आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द विराट कोहलीनंच त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

“आमचं पूर्ण लक्ष वर्ल्डकपवर, याव्यतिरिक्त…”

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीनं यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याचं टाईम्स नाऊच्या वृत्तात म्हटलं आहे. “मी याआधीच माझी भूमिका पुरेशी सविस्तरपणे स्पष्ट केली आहे. त्यावर अजून काही मी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सध्या आमचं पूर्ण लक्ष हे या वर्ल्डकपवर आहे. याव्यतिरिक्त ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यांचा शोध घेण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. मी अशा गोष्टींना हवा देणार नाही”, असं विराट कोहली म्हणाला आहे.

“मला अशा लोकांबद्दल वाईट वाटतं”

“मी माझी भूमिका प्रामाणिकपणे आणि खुलेपणाने स्पष्ट केली आहे. जर लोकांना वाटत असेल की त्यात अजून काही आहे, तर मला अशा लोकांबद्दल फार वाईट वाटतं. असं काहीही नाही”, असं देखील विराटनं यावेळी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virat kohli ind vs pak t20 world cup match stepping down as captain pmw

Next Story
इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ सामना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी