मतदान केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी.. यंदा तरुण आणि त्यातही नव मतदारांचा टक्का वाढणार या चर्चेला तोडीस तोड उत्तर देत पन्नाशी ओलांडलेले, साठीकडे झुकलेल्या ज्येष्ठांचा उत्साह गुरुवारी ठाण्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांमध्ये नजरेत भरणारा होता. टेंभी नाका, पाचपाखाडी, नौपाडा यासारख्या परिसरात ज्येष्ठांचा हा उत्साह तरुणांनाही लाजविणारा होता. ठाण्यातील अत्रे कट्टयावरील कार्यक्रमांना नियमीतपणे हजेरी लावणाऱ्या ज्येष्ठांनी दुपापर्यंत मतदान केंद्र व्यापून टाकल्याचे चित्र होते. ज्येष्ठांचा हा वाढता सहभाग पाहून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांच्या चेहऱ्यावरही कुतूहूलाचे भाव दिसत होते.
 गुरुवारी सकाळी मतदान केंद्र खुली होताच अनेक उत्साही तरूणांनी सकाळी लवकर येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या वेळात लवकर मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर गर्दी कमी मिळते. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढण्यापुर्वीच मतदान करण्याकडे अनेकांचा कल होता. लवकर मतदान केल्यास सुट्टीचा आनंदही लुटता येईल, या भावनेने सकाळपासून केंद्रावर गर्दी दिसत होती.
दिवसभर सुट्टीची मजा घेता यावी यासाठी लवकर उठून मतदान केल्याची प्रतिक्रिया गावदेवी मैदाना परिसरात मतदानासाठी आलेली सोनाली पांचळ या तरुणीने दिली. सोशल साईटवर मिरवण्यासाठी सुध्दा लवकर मतदान केल्याचा फायदा घेता येऊ शकतो. ‘मी मतदान केले तुम्ही कधी करणार?’ असे मित्रांनी चिडवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्याचा फंडाही काही तरूणांनी अवलंबला होता. अंबरनाथमधल्या श्रीकांत भगत याने सकाळीच मतदान केंद्र गाठून मतदान केल्याचा अनुभव सांगितला. गेला महिनाभर त्याचे मित्र ठाणे निवडणूक आयोगाच्या मदतीने ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये निवडणूकीच्या प्रचारासाठी पथनाटय़ांचे सादरीकरण करत होते. त्यामुळे मतदानाविषयी जवळीक निर्माण झाली होती.
एका मतानेही फरक पडतो, त्यामुळे कदाचीत चांगले सरकार सुध्दा येऊ शकते म्हणून मी मतदान केले असे भगत यांचे म्हणणे होते. तर डोंबिवलीतल्या प्रणाली पवार हिने देशात स्थिर सरकारची गरज असून अशाच उमेदवाराकडे आपला कल असल्याचे तिने सांगितले. आपल्या परिसरातील उमेदवारांबद्ध माहिती कमी असली तरी पक्षांचे नेतृत्व कोण करतो हेच पाहून आपण मतदान केले असल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, ठाण्यातील सांस्कृतीक कट्टयांवर आवर्जून हजेरी लावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी मोठय़ा संख्येने मतदानात भाग घेतल्याचे चित्र गुरुवारी दिसत होते. ठाणे, डोंबिवली यासारख्या भागात सकाळच्या सुमारास तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.