रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आपल्याच समर्थकाची नियुक्ती करावी, असा आग्रह नारायण राणे यांनी लावून धरल्याने काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर पक्ष राणे यांना झुकते माप देतो का, याची चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी आपले समर्थक मंगेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, असा राणे यांचा आग्रह आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावरून वादावादी झाली. खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप आदी नेत्यांनी वेगळा सूर लावला. इब्राहिम दलवाई यांच्या नियुक्तीचा खासदार दलवाई यांनी आग्रह धरला. तर राणे समर्थकाचीच का नियुक्ती करावी, अशी भूमिका भाई जगताप यांनी मांडली. राणे यांनी शिफारस केलेल्या शिंदे यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावर अशोक चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे विचारणा केली.

या पाश्र्वभूमीवर पक्ष कोणती भूमिका घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राणे यांच्या कलानेच नियुक्त्या केल्या जातात. आगामी  निवडणुका लक्षात घेता राणे यांच्या मतानुसारच नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.