सागरी वाहतूक पाच पटीने वाढणार

केंद्राच्या महत्त्वाकांक्षी ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत विविध १७३ प्रकल्प निश्चित करण्यात आले असून २०२० पर्यंत चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व एक कोटी रोजगारनिर्मिती शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग, जहाजमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

‘सागरमाला’ बंदर विकास प्रकल्पामुळे सागरी वाहतूक सध्याच्या वार्षिक सहा कोटी टन तुलनेत पाच पटीने वाढणार असून येत्या चार वर्षांपर्यंत दरवर्षी सहा अब्ज डॉलर वाहतूक खर्चही वाचणार आहे, असेही ते म्हणाले.

इंडिया फाऊंडेशन, एस राजरत्न स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (सिंगापूर), बांगलादेश इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (बीआयआयएसएस) आणि इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिसी स्टडीज (आयपीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. विविध ३० देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.

भारतीय ध्वजावरील निळे चक्र हे भारताच्या नील अर्थव्यवस्थेचे द्योतक असून ७,५०० किलोमीटरचा सागरी मार्ग व १,२०० छोटी मोठी बंदरे असलेल्या भारताच्या या क्षेत्रात विस्तारास वाव असून देशात नवे बंदरे आणि जुन्या बंदरांचा विकास करण्यात येत आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. ‘सागरमाला’ बंदर विकास प्रकल्प हा चार मुख्य सूत्रांवर आधारित असून देशातील बंदर विकासाबरोबरच नवीन सागरी मार्ग, वाहतूक खर्च कमी करणे, तसेच निर्यातीला प्रोत्साहन देणे याला भविष्यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.