मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पराभवाचा धक्का सहन करावा लागेल. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा १७ धावांनी पराभव केला. मधल्या फळीतल्या फलंदाजांचं अपयश हे मुंबईच्या आजच्या सामन्यातल्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं.

सामन्यात पहिली फलंदाजी करणाऱ्या राजस्थानच्या संघाने सामन्यात मुंबईसमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. वास्तविक पाहता मुंबईच्या माऱ्यासमोर राजस्थानची आघाडीची फळी स्वस्तात माघारी परतली होती. मात्र मधल्या फळीत राजस्थानच्या महिपाल लोमरोर, चेतन बिश्त आणि तेजिंदर सिंह यांनी भागीदारी रचत राजस्थानला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. महिपालने ७४ धावा काढून राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यात मोठा हातभार लावला. त्याला चेतन बिश्तने ४१ तर तेजिंदर सिंहने ४३ धावा काढून चांगली साथ दिली. मुंबईकडून धवल कुलकर्णीने सर्वाधिक ३ बळी मिळवले.

प्रत्युत्तरादाखल मुंबईने आपल्या डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. सलामीवीर जय बिस्ता आणि अखिल हेरवाडकर यांनी चौफेर फटकेबाजी करत झटपट धावा काढण्याचा सपाटा लावला. मात्र जय बिस्ता माघारी परतल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीने सामन्यात पुरती निराशा केली. सिद्धेश लाड, आदित्य तरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असताना हे फलंदाज लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकले नाहीत. मधल्या फळीत सुर्यकुमार यादवने अखेरच्या षटकांपर्यंत फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न तोकडेच पडले.