दू रदर्शनचे तंत्रज्ञान समजून घेतल्यानंतर आता आपण त्याच्या बाह्यरूपात झालेले बदल आणि त्यामागचे तंत्र बघणार आहोत. दूरदर्शनच्या स्टुडिओमधून आपल्या घरी चित्र येण्याची प्रक्रिया थोडक्यात पुन्हा बघू या. दूरदर्शन कॅमेरा समोरील घटनेचे दृश्य ((Video) आणि श्राव्य (Audio) संकेत तयार करतो. प्रक्षेपक (Transmitter) ते संकेत हवेत सोडतो आणि संग्राहक ((Receiver) ते संकेत पकडतो आणि दूरदर्शन संचात त्याचे पुन्हा कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनेच्या प्रतिमेत रूपांतर होते. हे संकेत आपल्यापर्यंत वेगाने येणारी स्थिरचित्रे पोहोचवत असतात. आणि त्यांच्या वेगामुळेच आपण सलग हलते चित्र पाहू शकतो. प्रथम कृष्ण-धवल रंगांत दिसणारे चित्र पुढे रंगीत दिसू लागले. जरी रंगीत प्रसारणाचा शोध १९०८ सालीच लागला होता आणि जॉन बेअर्ड यांनी १९४० मध्ये त्याचे जाहीर प्रयोगही केले होते, तरी सर्वसामान्यांकडे रंगीत संच येऊन ते बघायला ६० चे दशक उजाडले. भारतात तर १९८२ मध्ये आशियाई स्पर्धाच्या वेळी रंगीत दूरदर्शनची सुरुवात झाली.

संकेत प्रक्षेपणाच्या स्वरूपात ९० च्या दशकात महत्त्वाचा बदल झाला आणि घरातील संचाचा कायापालट झाला. हा बदल म्हणजे सदृश (analog) ते सांख्यिकी (digital). जोपर्यंत दूरदर्शन संकेत सदृश स्वरूपात प्रक्षेपित होत होते, तोपर्यंत संचातील CRT च्या माध्यमातूनच आपल्या संचात चित्रे दिसत होती आणि त्यांच्या आकाराला, तपशील दाखविण्याच्या क्षमतेला मर्यादा होत्या. तसेच CRT मध्ये एकाआड एक ((Interlacing) रेषा रंगवण्याची पद्धती उपयुक्त ठरत असल्याने पडद्यावर उजेड सतत कमी-जास्त होत असायचा. त्या सुमारास आलेल्या प्लाझ्मा आणि द्रव्य स्फटिक प्रदर्शन (Liquid Crystal Display- LCD) / प्रकाश उत्सर्जन करणारे डायोड (Light Emitting Diode- LED) या तंत्राचा वापर करून अधिकाधिक स्पष्ट चित्र दाखवणारे, लांबी-रुंदी वाढून जाडी कमी कमी होत गेलेले दूरदर्शन संच तयार होऊ लागले. उदा. जुन्या CRT संचात जास्तीत जास्त ५२० (ओळींची संख्या) ७ ५७६ (प्रत्येक ओळीतील प्रकाशमान होणारे कण- पिक्सेल)= २,९९,५२० पिक्सेलने तयार होणारे चित्र दिसू शकते, तर सांख्यिकी प्रणालीवर चालणाऱ्या LCD संचात हेच चित्र पाच लाखांपासून ३३२ लाखांपर्यंत पिक्सेलमध्ये पाहता येते. प्लाझ्मा आणि LCD/ LED तंत्राने चालणारे दूरदर्शन संच काय तंत्र वापरतात, हे समजावून घेऊ.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Online Betting
सट्टेबाजीत दीड कोटींचं नुकसान, कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या; पत्नीने उचललं टोकाचं पाऊल!
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

आयनायू-प्लाझ्मा दूरदर्शन संच

या प्रकारच्या तंत्रात विद्युतभारित आयनीभवन झालेले वायू वापरले जातात. छोटय़ा छोटय़ा कुप्यांमध्ये असलेल्या प्रकाशामुळे झळकणारे दिवे (Fluroscent lamps) असावेत अशी रचना असलेले अनेक दिवे या तंत्रात वापरले जातात. आयनायू (Plasma) स्थिती म्हणजे काय? तर उदाहरणार्थ, बर्फ घन अवस्थेत असतो. त्याला तापवल्यावर द्रवरूप पाणी मिळते. पाणी तापवल्यावर वायुरूपी वाफ तयार होते. ही वाफ पुढे आणखी तापवली तर त्यातील अणू विघटित होतात आणि त्याचे घन (+ve) भारित आयन आणि ऋण ((-ve) भारित इलेक्ट्रॉनमध्ये रूपांतर होते. याच मिश्रणाला ‘आयनायू’ ((Plasma) म्हणतात. चित्र क्र.१ मध्ये आपल्याला आयनायूचे प्रतीकात्मक चित्र दिसते.

चित्र क्र. २ मध्ये दाखवल्याप्रमाणे बाहेरून येणारे कण अणूवर आपटल्यामुळे अणूला उत्तेजित करतात. त्यामुळे अणूतील इलेक्ट्रॉन आपली कक्षा सोडून वरच्या मंडलात उडी मारतात. जेव्हा हे इलेक्ट्रॉन पुन्हा मूळ मंडलात परत येतात, तेव्हा त्यांच्यातील अतिरिक्त ऊर्जा प्रकाशरूपाने बाहेर पडते. हाच गुणधर्म वापरून आयनायू दूरदर्शन चालतो. ज्याप्रमाणे प्रकाशनलिका किंवा  CFL  चे दिवे प्रकाशमान होतात, तसाच या संचाचा पडदा प्रकाशमान होतो. फक्त हे प्रकाशमान होणारे दिवे अतिशय सूक्ष्म आकाराचे कण असतात. त्यांनाच ‘पिक्सेल’ म्हणतात. या प्रत्येक कणात निऑन किंवा झेनॉन वायू भरलेला असतो आणि प्रत्येक कणाच्या आवरणाला आतून संदीपकाचा थर असतो. हे संदीपक लाल, हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात. ते आतमध्ये तयार झालेल्या अतिनील किरणांमुळे प्रकाशमान होतात आणि पडद्यावर रंग दिसू लागतात.

आयनायूमधील प्रक्रिया कशी होते ते टप्प्याटप्प्यात जाणून घेऊ.

१. आयनायू पडदा लाल, हिरव्या आणि निळ्या सूक्ष्म पिक्सेलनी बनलेला असतो.

२. पिवळ्या रंगात दाखवलेले इलेक्ट्रोड एक-एक पिक्सेल स्वतंत्रपणे चालू / बंद करू शकतात.

३. पडद्यावरील एक लाल रंगाचा पिक्सेल (चित्राचा तो भाग मोठा करून दाखवला आहे.) आपल्याला चालू करायचा असेल तर त्या पिक्सेलच्या बाजूचे इलेक्ट्रोड हव्या असलेल्या पिक्सेलला उच्च विभव देतात. त्यामुळे त्यातील वायूचे आयन तयार होऊन ते अतिनील किरणे प्रसारित करू लागतात.

४. अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यामुळे पिक्सेलमधील आतील बाजूस असलेला संदीपकाचा थर उजळतो.

५. संदीपक उजळल्यामुळे अदृश्य अतिनील किरण लाल प्रकाशाच्या स्वरूपात आपल्याला दिसू शकतात.

चित्र क्र. ४ मध्ये आयनायू पडद्याचे विस्तारित संकल्पनाचित्र दाखविले आहे. दोन काचांच्या मध्ये प्रथम दोन विद्युतरोधक पदार्थाचे थर असतात. पुढील बाजूस असलेल्या थरातून दर्शक इलेक्ट्रोड जातात, तर स्थान इलेक्ट्रोड मागील बाजूच्या पडद्याच्या अलीकडे असतात. या दोघांमध्ये लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांच्या पिक्सेलचे सूक्ष्म घट एक जाळी तयार करतात. दूरदर्शन संचात आलेला संकेत परिपथामार्फत योग्य त्या पिक्सेलला जागृत करतो आणि पडद्यावर चित्र उमटते. सेकंदाला हजारो वेळा घडणारी ही क्रिया नियंत्रित असल्याने रंगाची हवी ती छटा पडद्यावर हव्या त्याच ठिकाणी दिसते.

वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने हेही तंत्र मागे टाकले आणि अधिक स्वस्त, वजनाला हलके आणि अधिक स्पष्ट चित्र दिसणारे संच बाजारात आले; ज्यात द्रव स्फटिक दर्शक (Liquid Crystal Display- LCD )  आणि प्रकाश उत्सर्जन करणारे डायोड (Light Emitting Diode- LED)  वापरले जातात. याविषयी तपशिलात जाणून घेऊ  पुढील भागात.

dpdeodhar@gmail.com