‘युअर फ्रेंड्स कॅन मेक यू, ऑर ब्रेक यू’!! त्यामुळे आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना आधी चांगले मित्र निवडणं, त्यांची चांगली पारख असणं पहिली महत्त्वाची पायरी ठरते.

‘गुंडांच्या टोळीने घरात घुसून ४ जणांना ठार मारले व पसे, दागिने घेऊन फरार झाले’, ‘दरोडेखोरांच्या गटाने बँक लुटली’, ‘पाकीटमाऱ्यांच्या टोळीने लोकल प्रवाशांना केले त्रस्त’! अशा अनेक घटना रोज घडत असतात, रोज त्यांच्या बातम्या होत असताना आपण बघतो, वाचतो. जगात सर्रास छोटय़ा- मोठय़ा प्रमाणावर गुन्हे, (दरोडे, चोरी, खून, इ.) घडत आहेत, पण अशा गुन्हेगारांना पकडण्यात नेहमीच पोलीस यशस्वी ठरतात असं नाही, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशा गुन्हेगारांच्या असलेल्या मोठय़ा टोळ्या आणि त्यांचे गुन्हेगारी विश्वात पसरलेले हात. या गुन्ह्यंना सुरुवात होते कशी आणि मग एखादा चांगल्या घरात, परिस्थितीत वाढलेला मुलगा पुढे जाऊन ‘डॉन’ कसा बनू शकतो? हे प्रश्न नक्कीच डोक्याला सतावतात. बहुतांश वेळेला ह्य ‘सुसंस्कारित मुलं ते गुंड/चोर’ ह्य प्रवासाला कारणीभूत ठरते ती ‘कंपनी’- मित्रमैत्रिणींचा सहवास’.. कॉलेजमध्ये गेल्यावर कंपनी चांगली मिळाली नाही आणि मुलगा हाताबाहेर गेला,’ अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला असतात. अगदी मागच्या आठवडय़ात मित्रमत्रिणी जमलेले असताना शाळेतल्या एका मुलाचा (समीरचा) विषय निघाला ‘बरेच महिन्यात त्याचा काही संपर्क नाही, दिसला नाही अशी चर्चा सुरू असताना एका मित्राकडून कळलं की तो काही महिन्यांपूर्वीच गेला! सांगणाऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर विशेष दुख दिसत नव्हतं, पण सांगण्याच्या सुरात नक्कीच काहीतरी गूढ आहे हे स्पष्ट कळलं. कळली ती गोष्ट फारच धक्का देणारी होतीच, पण त्याहून जास्त विचार करायला लावणारी होती. समीर अगदी सुसंस्कारित, सुशिक्षित सुखवस्तू घरातला मुलगा. कॉलेजमध्ये वाईट संगतीला लागला, ड्रग्स विकायच्या धंद्यात कधी त्याचा पाय घसरला हे त्याचं त्यालापण कळलं नाही. जवळच्या मित्रांनी समजवायचा प्रयत्न केला, पण त्या मित्रांशीच त्याने संपर्क तोडून टाकला. ड्रग्सचं व्यसन आणि ते विकून मिळणारी मोठी रक्कम ह्यंत तो पूर्णपणे अडकला. अशाच एक व्यवहारात नुकसान/ फसवणूक झाली आणि समीर गोत्यात आला. त्याचा मृत्यू/आत्महत्या कशी झाली हे अजूनही गूढ आहे; कारण एका रात्री त्याचं मृत शरीर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना मिळालं!!’ .सगळं ऐकून आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला.. पेपरमध्ये किंवा टी.व्ही.वर अशा बऱ्याच बातम्या ह्यआधी पाहिल्या होत्या, पण एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल अशी गोष्ट ऐकताना घटनेचं गांभीर्य प्रकर्षांने जाणवलं. मराठीतल्या ‘रेगे’ या सिनेमातसुद्धा अशाच एका चांगल्या घरातल्या मुलाच्या बाबतीत घडलेली सत्य घटना दाखवली होती. त्यातसुद्धा ‘भाईगिरीच्या’ वाटणाऱ्या आकर्षणापासून झालेली छोटीशी सुरुवात नंतर किती महागात पडू शकते ते आपण पाहिलं होतं. ‘तुमच्या मुलांकडे तुमचं खरंच लक्ष आहे का?’ असा सूचक प्रश्नदेखील ह्य चित्रपटाच्या मध्यामातून समस्त पालकवर्गाला विचारला गेला.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

ह्य सदराच्या पहिल्या लेखात आपण हा मुद्दा पाहिला होता की व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये पालक, पूर्वजांकडून मिळालेली गुणसूत्रे जितकी महत्त्वाची असतात तितकीच सभोवतालची परिस्थिती, आजूबाजूची माणसं, त्यांचे स्वभाव, वर्तन या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि ह्य गोष्टींचा प्रभाव सगळ्यात जास्त पडतो तो ‘टीनएज/ कॉलेजच्या वर्षांत!’ त्याला बरीच कारणं आहेत; जेव्हा आपण पौगंडावस्थेतून जात असतो तेव्हा शारीरिक, मानसिक स्तरावर बरेच बदल घडत असतात. आपण आपली ‘ओळख/आयडेंटिटी’च्या शोधात असतो. स्वतंत्र व्यक्ती होण्यासाठी धडपड करत असतो. या काळात बंधन घालणाऱ्या व्यक्ती आवडेनाशा होतात. आईवडिलांशीसुद्धा बरेचदा वाद होतात, खटके उडतात. पालकांपेक्षा मित्र जवळचे वाटायला लागतात. समवयीन मित्रांचं दडपण (पीअर प्रेशर) ह्य वयात सर्वात अधिक बघायला मिळतं. मित्रमत्रिणींची पसंती मिळवायला, त्यांच्या मनासारखं वागायला, कधीकधी ग्रुपमध्ये हिरो व्हायला वाट्टेल ते करायची तयारी असते. आणि मित्रांकडून मिळालेला आधार या काळात सर्वात महत्त्वाचा वाटतो. ह्य सगळ्या गोष्टींमुळेच हा काळ फार महत्त्वाचा आणि तारेवरची कसरत करणाराही ठरतो. अनेकांना ह्या वयात खूप चांगल्या, चांगले विचार करणाऱ्या मित्रांची सोबत लाभते आणि असे मित्र त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांची मदत करतात; पण सगळ्यांच्या बाबतीत असं घडत नाही! काही मुलं मात्र वाईट, चुकीच्या संगतीला लागतात- बरेचदा नकळतच ह्य संगतीचा तेसुद्धा हिस्सा बनून जातात. कारण ह्य वयामध्ये ‘काहीतरी थ्रिल करूया, हटके वागूया, भाईगिरी करून बघूया’ अशा बऱ्याच इच्छा सातत्याने आपल्याला खुणावत असतात. त्यामुळे चूक-बरोबर ह्यचा सारासार विचार करून मित्रमत्रिणी निवडले जात नाहीत, आणि काहीतरी ‘कूल’ करतोय ह्य भ्रमात बरेचदा अशा संगतीची सुरुवात होते. आणि अशा संगतीचा प्रभावसुद्धा सर्वाधिक ह्यच वयामध्ये आपल्या मनावर, विचारांवर, वर्तनावर पडायला लागतो. हळूहळू हेच विचार, कृती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा कसा भाग बनून जातात ते आपलं आपल्यालाही कळत नाही. शिवाय आपल्या मित्रमत्रिणींबद्दल इतर कुणी चुकीचं बोललेलं आपण खपवून घेऊ शकत नाही, त्यामुळे जर वाईट संगतीचा आपण भाग बनत असू तर ते एक बाहेर न पडता येणारं चक्रव्यूह व्हायला लागतं! बरेचदा पहिली सिगारेट हातात द्यायला हे मित्रच कारणीभूत ठरतात आणि दारूचा पहिला पेगसुद्धा मित्रांच्याच आग्रहामुळे ओठाला लावला जातो. आपल्या मित्रांप्रमाणेच अशा वाईट सवयीपण मग आपली साथ सोडायला देत नाहीत!!

आपण काही चुकीचं करतोय हा विचार मनातसुद्धा येत नाही कारण असं वागणारे आपण एकटेच नाहीत, ह्यचीच प्रचीती वारंवार यायला लागते; आपण आपल्या ग्रुपमध्ये ‘फिट’ बसण्यासाठी आपण आता तयार आहोत अशीही समजूत आपण आपली करून द्यायला लागतो. काही लोकांसाठी हे स्वतच्या आरोग्याला हानिकारक सवयीपर्यंतच हे मर्यादित राहतं तर काहींच्या बाबतीत त्याचं रूपांतर चोरी, दरोडा, खून अशा गंभीर गुन्ह्यंमध्ये होऊ शकतं.

‘ढवळ्याशेजारी बांधला पवळा, गुण नाही पण वाण लागला’ हे जरी खरं असलं तरी हेच संपूर्ण सत्य नाहीये. आपण जे मित्रमत्रिणी निवडतो त्यांना समजून घेणं महत्त्वाचं ठरतं, चुकीच्या गोष्टी बाजूला घडत असतील तर त्याचा बळी न ठरता त्यातून आपला मार्ग मोकळा योग्य वेळेवर करून घेणं जमायला हवं-त्याने पुढे जाऊन होणारे बरेच धोके टळू शकतात. सवंग गोष्टींच्या आहारी जाणं फारसं कठीण नाही, पण जगात आपल्या प्रेरणा देणारी, चांगलं काम करू पाहणारी आपल्याच वयाची अजून अनेक आपल्या आजूबाजूला मुलं आहेत; त्यांचा आदर्श ठेवून स्वत:ला चांगला, सुजाण नागरिक, विद्यार्थी बनवणं हे आपल्या हातात नक्कीच असतं!

पालकांनी मुलांना मोकळीक देताना त्याचा अतिरेक होत नाही ना ह्यची काळजी घेणंही आवश्यक ठरतं, आणि मुलांनी पालकांची काळजी त्याला जाचक बंधन न मानता समजून घेतली तर पालकांशी मोकळा संवाद साधता येऊ शकतो. आपण मोठे होत असलो, विविध अनुभव घेऊन बघायला उत्सुक असलो तरी पालकांच्या अनुभवाचा फायदासुद्धा आपण करून घ्यायला हवा. आयुष्यात खूप काही चांगलं करून दाखवण्याची, स्वतला सिद्ध करण्याची आणि एक समृद्ध जीवन जगण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला चांगल्या मित्रमत्रिणींची साथ असणं फार मोलाचं ठरतं.

‘युअर फ्रेंड्स कॅन मेक यू, ऑर ब्रेक यू’!! त्यामुळे आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना आधी चांगले मित्र निवडणं, त्यांची चांगली पारख असणं पहिली महत्त्वाची पायरी ठरते. या पायरीवरच मात्र तुम्ही एक पाऊल चुकीचं टाकलं तर आयुष्यभर चुकीच्या मार्गावर चालायला हेच मित्रमत्रिणी भाग पाडू शकतात. ‘सो चूज युअर फ्रेंड्स वाइजली अँड लिव युअर लाइफ ग्रेसफुली’!
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com