News Flash

व्यक्तिमत्त्वाचा पोशाख

अंतरंगातील व्यक्तिमत्त्व पाहणं जास्त महत्त्वाचं आहे.

व्यक्तींच्या बाह्य़रूपावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची पहिली चाचणी करण्यापेक्षा त्यांच्या अंतरंगातील व्यक्तिमत्त्व पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. बाह्य़रूपावरून व्यक्तिमत्त्व परीक्षणाचा दृष्टिकोन बाजूला सारलात तर ‘पोशाखातल्या व्यक्तिमत्त्वा’पेक्षा ‘व्यक्तिमत्त्वाचा पोशाख’ ठरवणं सोपं जाईल.

त्या दिवशी स्टेशनवर एका मुलाने नियॉन (भडक) बेबीिपक रंगाची फुल पँट घातली होती, त्यावर पांढरा ‘व्ही’नेक असलेला कुडता घातला होता! अर्थातच सकाळच्या ऑफिस गोअर्सच्या ‘फॉर्मल्सच्या’ गर्दीत त्या मुलाच्या कपडय़ांमुळे तो वेगळा उठून दिसत होता. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या काही मुलींनी ‘कसला बायल्या आहे’ अशी कमेंट पास करत त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, तर काहींनी ‘ओ सो कूल’ अशी कॉन्ट्रास्ट प्रतिक्रिया देत त्याच्या चॉइसचं कौतुक केलं. एकाच गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील हा विरोधाभास आणि बाह्यरूपावरून केली जाणारी व्यक्तीची पारख मग सगळीकडेच माझं लक्ष वेधून घ्यायला लागली. कधी कधी नुसती बघ्याची भूमिका घेत, तर कधी कधी अशा संवादात भाग घेत बऱ्याच गोष्टींकडे बघायला लागले, आणि बघितलेल्या गोष्टीतून बरंच काही शिकत गेले. कालानुरूप, संस्कृतीप्रमाणे, वयाप्रमाणे पेहरावात अनेक बदल होत असतात आणि या बदलांबरोबरच कपडय़ांकडे (ओघाने त्याबरोबर येणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या निकषाकडे) बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.

काही वर्षांपूर्वी फाटके किंवा कमी कपडे घालणं गरिबीचं लक्षण वाटायचं; पण आता असेच तोकडे, विरलेले कपडे घालणं हे ‘कूल आणि ट्रेण्डी’ असण्याचं प्रतीक समजलं जातं. तसंच खाली वाकल्यावर ‘ए बी सी डी’ (अर्थ माहीत नसल्यास मुलींना विचारा!) होणाऱ्या मुलींकडे वाकडय़ा नजरेने बघितलं जायचं, पण आता ‘लो वेस्ट जीन्सच्या’ ट्रेण्डने ही नजरसुद्धा बदलली. आता ते फार कॉमन आणि नॉर्मल आहे असं मुलींना वाटतं! मुळात एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो- मन, अंतरंग, विचार, वर्तन या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरी व्यक्तिमत्त्वाची पहिली चाचणी होते ती बाह्यरूपावरूनच! बारूपात उंची, जाडी, रंग, व्यंग या गोष्टींपेक्षा जास्त लक्ष बरेचदा माणसाने घातलेल्या कपडय़ांकडे, त्याच्या किंवा तिच्या कपडे-दागिने यांच्या चॉइसकडेच आधी जातं. व्यक्तिमत्त्वाची झलक थोडय़ाफार प्रमाणात का होईना, पण कपडय़ांमधून दिसून येते हे सत्य आपण नाकारू शकत नाही. पण म्हणून केवळ कपडय़ांवरून व्यक्तिमत्त्वाची पारख करणं म्हणजे सुतावरून भाताची परीक्षा केल्यासारखं होऊ शकतं!

एखादा खादीचा झब्बा घातलेला मुलगा बघितला की डोळ्यांसमोर ‘पत्रकाराची’ प्रतिमा येते, तर एखादा वायब्रंट (भडक) रंगांचे, ऑफबीट िपट्र असलेले कपडे घातलेला तरुण बघितला की ‘चित्रकार किंवा कलाकार’ डोळ्यांसमोर येतो. पांढरा झब्बा किंवा खादीचा झब्बा आणि जॅकेट घातलेली व्यक्ती पहिली कीहमखास एखादा नेता किंवा पुढारी डोळ्यांसमोर येतो. खादी कुडता घातलेली मुलगी समाजसेविका वाटते तर फॉर्मल स्कर्ट आणि बूट घातलेल्या मुली ‘कॉर्पोरेट’मध्ये आहेत असं अनुमान बांधता येतं. या गोष्टी जरी व्यवसायासंबंधी असल्या तरी त्या त्या व्यवसायाबरोबर येणारे व्यक्तिमत्त्वाचे पलूसुद्धा आपण विविध माणसांमध्ये शोधत असतो. कारण व्यवसायाची निवड करणं हासुद्धा आपल्या टॅलेंटबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असलेला निर्णय असतो. बहुतांश वेळेला आपले अंदाज बरोबर ठरत असले तरी ‘पोशाख’ हे केवळ एकच प्रमाण मानून बांधलेले तर्क नेहमीच बरोबर ठरतील असं नाही. एखादा चित्रकार फॉर्मल्स का घालू शकत नाही? किंवा एखाद्या समाजसेविकेला हाय हिल्सचे बूट घालण्यापासून आपण थांबवू शकत नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी ‘कपडे आणि त्यातून खुलणारं’ व्यक्तिमत्त्व हा नक्कीच कुतूहल निर्माण करणारा आणि अभ्यास करायलासुद्धा चांगला विषय आहे.

या विषयाचा विचार करताना ‘तरुणाईच्या पोशाख आणि व्यक्तिमत्त्वाचा’ विचार प्रामुख्याने करावासा वाटतो, कारण या काळात तरुण-तरुणी आपल्या कपडय़ांबद्दल, त्याच्या चॉइसबद्दल खूप जास्त काळजी घेत असतात (कॉन्शस असतात). व्यक्तिमत्त्व या काळात घडत असतं आणि व्यक्ती म्हणून स्वत:ला ओळखून घेताना, स्वत:ची ओळख बनवताना विविध विषयांत तरुण प्रयोग करून बघत असतात. ही प्रयोगशीलता तरुणाईच्या पोशाखातून तर नक्कीच दिसून येते! कपडय़ांचे लेटेस्ट ट्रेण्ड फॉलो करण्यासाठी ते धडपड करत असतात; कॉलेजमध्ये, पार्टीमध्ये उठून दिसण्यासाठी विविध कपडय़ांचे प्रकार आणि ब्रॅण्ड ट्राय करून बघत असतात. आपण ग्रुपमध्ये वेगळे पडणार नाही याची काळजी घेतानासुद्धा कपडय़ांचा मुद्दा ऐरणीवर असतो! एकमेकांच्या कपडय़ांवरून कमेंट्स पास करत असले तरी तरुण मंडळी आपल्यावर कुणी कमेंट पास करणार नाही ना याची शहानिशा करताना दिसतात. थोडक्यात काय तर या वयात व्यक्तिमत्त्व घडत असताना कपडे किंवा पेहराव याला प्राधान्य दिलेलं दिसून येतं!

सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की ज्यांना आपला ‘उच्च दर्जा’ दाखवायचा असतो ते नेहमीच महागडय़ा ब्रॅण्डेड कपडय़ांची निवड करत असतात आणि वेळप्रसंगी अशा ‘उच्च’ ब्रॅण्डचा उल्लेख चारचौघात वारंवार करत ते आपली ऐपत/दर्जा आणि चॉइस दाखवून देत असतात, तर अतिश्रीमंत घरातील व्यक्तींच्या जीवनाचा अविभाज्य भाग या ‘ब्रॅण्डेड’ वस्तू झाल्या असल्याने त्यांना त्याचा उल्लेख वारंवार करून त्यांचा दर्जा पटवून द्यावासा वाटत नाही. ज्यांना असे ब्रॅण्डेड कपडे घेणं पटत किंवा परवडत नाही ते मात्र पसंती साध्या दुकानांना आणि ‘फॅशन स्ट्रीट, िलकिंग रोड’ अशा रस्त्यावरील दुकानांना देतात. ज्यांना आपण गर्दीत उठून दिसावं असं वाटतं, किंवा बोलक्या (आउट गोइंग), आनंदी, उत्साही व्यक्ती लाल, निळा, केशरी अशा भडक/गडद रंगांना पसंती देताना दिसतात तर अबोल, साधेपणात समाधानी असलेल्या व्यक्ती सौम्य (आकाशी, फिकट गुलाबी, अबोली, फिकट पिवळा, इ.) रंगांची निवड करताना दिसतात. काही जणांना काहीच डिझाइन नसलेले प्लेन कपडे भावतात तर काहींना डिझाइन नसलेले कपडे बोअिरग वाटतात आणि ते नेहमी फुलं, भौमितिक आकार, टायगर िपट्र असे वेगवेगळे िपट्र असलेल्या कपडय़ांचीच निवड करतात. काळा रंगसुद्धा कपडय़ांसाठी खूप लोकांना आवडतो, अगदी सणासुदीच्या दिवशी घालायलासुद्धा काळ्या रंगाचेच कपडे ते निवडतात. काळ्या कपडय़ात बारीक दिसत असल्याने तरुण मुलींची या रंगाला विशेष पसंती दिसून येते, तर शांतचित्त, शांतता, साधेपणा आवडणाऱ्या व्यक्ती विशेषत: पांढऱ्या रंगांच्या कपडय़ांची निवड करतात. काहीतरी नवीन, वेगळं, आपल्या मनासारखं करायला आवडणाऱ्या व्यक्ती बरेचदा स्वत:च त्यांच्या कपडय़ांचं डिझाइन करतात; त्यासाठी अगदी कापड पसंती करण्यापासून, रंग, बॉर्डर, त्यावरील नक्षी, कपडय़ाचं डिझाइन या सगळ्या गोष्टी ते स्वत:हून करतात आणि त्यातून त्यांना काहीतरी कल्पक केल्याचा आनंद मिळतो तर बाकी लोक रेडीमेड कपडय़ांनाच पसंती देतात!

अशा अनेक कपडय़ांबद्दल आणि त्यातून झळकणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल, वृत्तीबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल निष्कर्ष काढता येऊ शकतात आणि आपण दैनंदिन आयुष्यात ते काढतही असतो. कपडय़ांवरून एखाद्याचा धर्म/जातसुद्धा ओळखली जाते! डोक्यावरून स्कार्फ बांधला, टिकली लावली नाही आणि काजळ लावलं असेल तर लगेच लोकांच्या नजरेत आपण मुस्लीम ठरतो, फुलांची नक्षी असलेली मिडी किंवा स्कर्ट घातला की ख्रिश्चन ठरतो आणि साडी, टिकली, बांगडय़ा असा पेहराव असेल तर िहदू वाटतो. अशा पूर्वग्रहदूषित निष्कर्षांवरून समोरच्या माणसाचं आपल्याबद्दलचं मत आणि वागणंसुद्धा वेळप्रसंगी बदलतं याचा अनुभव आपण घेत असतो! असं पेहरावावरून धर्माचे अंदाज बांधता येत असले तरी त्यामुळे पूर्वग्रह करून आपले समोरच्या व्यक्तीबद्दलचे विचार आणि वर्तन त्यानुसार बदलणं मला पटत नाही. याबाबतीत ‘पीके’ सिनेमातील एक प्रसंग नक्कीच डोळे उघडणारा आणि विचार परिवर्तनासाठी महत्त्वाचा ठरला आहे. ‘विविध धर्माच्या तथाकथित पोशाखातील व्यक्तींना भोंदू बाबासमोर उभं करून त्याला जेव्हा लोकांचे धर्म ओळखायला आमिर खान (पीके) सांगतो, तेव्हा त्या बाबाचे सगळे अंदाज चुकतात, कारण त्या व्यक्तींनी पोशाखाची अदलाबदल केलेली असते. तेव्हा आमिर खान ‘थप्पा कहाँ हैं?’, ‘धरम कीपरीक्षा सिर्फ कापडोंसे कैसे करते हो?’ हा प्रश्न विचारून उपस्थित सर्वानाच नि:शब्द करतो तो प्रसंग सर्वानाच विचार करायला लावणारा आणि असे तर्कवितर्क काढण्यापासून सावध करणारा ठरला आहे!

कपडे/पोशाख हा व्यक्तिमत्त्वाबरोबरच सवयीचासुद्धा भाग असतो, हे विसरून चालणार नाही. व्यक्तिमत्त्वाची छाप लोकांवर पडायला कपडे साहाय्य करत असले तरी चांगले, महागडे, चकचकीत कपडे घालून वाईट कृत्य करत असलेली माणसं आणि अगदी साध्या कपडय़ात राहूनसुद्धा थोर, समाजोपयोगी काम करत असलेली डॉ. प्रकाश आमटे यांसारखी माणसं त्यांच्या कर्तृत्वासाठीच ओळखली जातात, त्यांच्या कामापुढे त्यांचे कपडे, पेहराव या सगळ्याच गोष्टी दुय्यम ठरतात- याची आपण आठवण ठेवणं महत्त्वाचं आहे! तुमच्या ‘पोशाखातल्या व्यक्तिमत्त्वापेक्षा’ तुमच्या ‘व्यक्तिमत्त्वाचा पोशाख’ ठरवणं आणि त्याने तुमची लोकांमधील ओळख ठरवणं तुमच्याच हातात आहे!
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 1:05 am

Web Title: personality
टॅग : Personality
Next Stories
1 सुसंगती सदा घडो!
2 ‘अ’ की ‘ब’??
3 एकला चलो रे!
Just Now!
X