25 March 2019

News Flash

हिरव्या काचेतून

‘‘शेट आता सणकला होता. अंगावर ओरडत होता.

‘‘शेट आता सणकला होता. अंगावर ओरडत होता. भडकू हातवारे करत होता. खांद्याला धरून ढकलत होता. वळचणीला थांबलेले तुरळक लोक बघत होते. छत्रीवाले त्यांना ओलांडून जात होते. आम्ही कॅफेच्या आतून अवाक्  होऊन हे मूकनाटय़ पाहात होतो. अचानक शेटचा कडेलोट झाला. खिशातून पाकीट काढलं, काही नोटा काढून बायकोच्या अंगावर भिरकावल्या. रस्त्याकडेच्या भिकाऱ्याला चाराणे फेकावेत तसं.’’ तरुण लेखकांनी लिहिलेल्या या सदरातील ही एक कथा.

‘‘आरटीआयबद्दल विचारायचं होतं.’’

‘‘शेट, सोमवारी सकाळी का? नंतर बोलू या?’’ मी उगाचच कावलो. ही नोकरी अशी पहिलीच. तरुण वय, मोठी फर्म, नवी बॉस. क्लायंटला प्रपोजल द्यायचं काम चालू होतं आणि हा पंचेचाळिशीचा सहकारी काही तरी भलतंच टुमणं घेऊन आलेला.

‘‘माताजींनी ठेचलाय काय?’’ आकडय़ांनी लगडलेल्या स्क्रीनकडे बोट दाखवत शेट हसले. ‘‘पाच मिनिटं..’’ शेट म्हणाले. नजर न हटवता मी मान नकारार्थी हलवली. तरी शेट आजूबाजूला घुटमळत राहिले.

‘‘बोला शेट.’’ शेवटी मी वैतागून समोरचं एक्सेल बंद केलं.

‘‘ते काय आरटीआय निघालंय हल्ली – ते वापरून माझ्या बायकोचा टॅक्स रिटर्न मिळवता येईल का?’’

मला वाटलं रिटर्नची कॉपी हरवली आहे. ‘‘तुम्हाला नाही मिळणार. तुमच्या बायकोने अर्ज केला तर मिळेल; पण त्यापेक्षा ज्याने रिटर्न भरला त्या सीएला विचारा. त्याच्याकडे कॉपी..’’

‘‘तो ७७७ चा थोडाच देणाराय मला..’’ शेट हिरमुसून म्हणाले.

तेवढय़ात कम्युनिकेटर टिंगला. ‘‘मॉर्निग. कॅन यु कम ओव्हर?’’

काल रात्रीच रिव्ह्य़ू कॉमेंट्स दिल्यास ना बये? मी काय कॉम्प्युटर से तेज दिमाग चलनेवाला चाचा चौधरी आहे का?

‘‘इट्स नॉट रेडी एट.’’

‘‘नेव्हर माइंड. कम ओव्हर.’’ काल रात्री रिव्ह्य़ू झालेल्या (म्हणजे लाल पेनाने फुलपाखरं काढून मार्जिनमध्ये नोट्स लिहिलेल्या) कागदांचं बाड घेऊन मी माताजींची केबिन गाठली.

ऑफिसात येताच माणसाने स्वत्वाला तर्पण देऊन फक्त ‘बिलेबल अवर्स’ होऊन जगावं अशी काहीशी या फर्मची धारणा होती. आमच्यासारख्या कामगारवर्गाची क्युबिकल्स ख्रिस्ती स्मशानभूमीचं मॉडेल समोर ठेवून बनवली होती. बॉस लोकांनी बसायचे काचेचे ठोकळे फारसे निराळे नव्हते. लाडाने त्याला केबिन असं म्हणत, पण दोन्ही हात आडवे पसरून उभं राहता येत नसे.

तरी माताजींच्या ठोकळ्यात त्यांच्या स्त्रीत्वाच्या ठळकशा पुसटखुणा होत्या. त्या नसल्या तरी त्यांच्या पर्फ्यूमचा गंध दरवळत असे. त्यांच्या त्रिकोणी कुटुंबाचा फोटो बाजूच्या सॉफ्टबोर्डावर डकवलेला होता. पोरगं आठवी-नववीत वाटत होतं. एक ठीकठाक वॉटरकलर निगुतीने फ्रेमबीम करून ठेवलं होतं.

पुढचे दोन तास माताजींनी त्या प्रपोजलचा यथेच्छ चिवडा केला. कालच्या लाल फुलपाखरांमध्ये नव्या हिरव्या फुलपाखरांची भर घातली. मी त्यांच्या हाती सोपवलेल्या नवथर अडखळत्या प्रयत्नांवर वीस वर्षांच्या अनुभवाचं सराईत रोगण चढत होतं. हे सगळे बदल करायला मला अख्खा दिवस आणि कदाचित निम्मी रात्र लागणार होती, पण शेवटी स्वत:ला अभिमान वाटावा, असं प्रपोजल त्यातून निघणार होतं. त्यांचे आभार मानून मी निघालो.

‘‘एक मिनिट.’’ माताजींनी मला थांबवलं. ‘‘मे बी इट्स नन ऑफ माय बिझनेस, पण मघाशी शेटशी काय बोलत होतास?’’

गॉसिप! शेट आणि मी बोलत असताना माताजी क्युबिकलजवळून गेल्याचं मी पाहिलं होतं. पण त्यांना लगेच तहान लागली असेल असं वाटलं नव्हतं. ‘‘हम्म. हे बघ, शेटला मी पंधरा वर्षांपासून ओळखते. त्याच्या घरगुती गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालू नकोस.’’ माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून माताजी हसल्या. ‘‘इट्स अ लाँग, सॅड स्टोरी. बरं ते राहू दे. तू मला फायनल व्हर्जन कधी देशील? आज हे क्लायंटला पाठवूनच घरी जायचं..’’

सेंडचं बटण हाणलं तेव्हा रात्रीचे सवा अकरा वाजले होते. शेट दिवस आटोपून कधीच नाहीसा झाला होता. माझ्या अंगाअंगातून दमणूक ठिबकत होती. माताजी मागेच होत्या, सकाळ इतक्याच टवटवीत.

‘‘नाऊ  दॅट्स दॅट. घरी जाऊ. कुठे राहतोस तू?’’

‘‘प्रभादेवी.’’

‘‘मी अंधेरी. चर्चगेट?’’ मी मान डोलावली.

‘‘पण चालत जाऊ या?’’ मुंबईत रात्री चालण्यासारखं सुख नाही. माताजींचीही हरकत दिसली नाही. आम्ही निघालो.

‘‘इफ यू डोंट माइड – शेटची काय स्टोरी आहे?’’ दिवसभर डोक्यात अडकलेला प्रश्न मी विचारून टाकला.

माताजी हसल्या. ‘‘यू आर अ गॉसिप क्वीन आरंट यू?’’ मी जरा शरमलो. ‘‘स्टोरी अशी काही नाही रे. द यूज्वल – ब्रोकन होम्स. शेटचे वडील अलिबाग जवळचं मोठं प्रस्थ आहे. भांडण करून शेट मुंबईला आला नोकरी करायला. गरज अशी नव्हती, मेबी ही वाँटेड टु एस्केप. फॅमिली डिसओन्ड हिम. पाच वर्षांपूर्वी द पॅट्रिआर्च डाइड. प्रॉपर्टीतला वाटा याच्या बायकोला दिला. बिकॉज शी वेंट बॅक टु द फॅमिली. तेव्हापासून शेट एकटाच राहतो. प्रॉपर्टीसाठी केस लावलीये बायकोवर.’’

‘‘तरीच त्याला बायकोचा टॅक्स रिटर्न पाहिजे होता. डेंजरच आहे त्याची बायको!’’

‘‘नाही रे, मी भेटले आहे तिला. साधीशी आहे, नॉट द शार्पेस्ट टूल इन द शेड. मोह कोणाला सुटलाय रे.. डोन्ट जज हर फॉर दॅट.’’

‘‘पण तरी, असं पैशापाठी जायचं म्हणजे..’’ मी बोलायचं म्हणून काही तरी बोललो. माताजींना मी जजमेंटल वाटलो हे मला जरा खुपलं होतं.

‘‘अरे, आणखीही काही असू शकतं आणि मी तर म्हणेन चूक जास्त शेटची आहे.’’

‘‘कशी काय?’’ मला आश्चर्य वाटलं.

‘‘ही कुडंट मॅनेज हर एक्सपेक्टेशन्स. बंडखोरी दाखवली, निभावायला जमलं नाही. अपेक्षांचं जाळं खतरनाक असतं रे..’’ अचानक माताजी थांबल्या. ‘‘हा कॅफे छान आहे. वरपासून खालपर्यंत मस्त हिरव्या काचा. लेट सिटिंग झालं की नेहमी इथे येते. कॉफी?’’

दिवसभराच्या वणवणीनंतर कधी पाठ टेकतो असं झालं होतं. त्यात शेटचे कौटुंबिक पापुद्रे सोलण्यात एका मर्यादेपलीकडे मला रस नव्हता. ‘सम अदर टाइम’ सांगून मी सटकलो.

दिवस पुढे सरकत होते. प्रपोजलं जात होती, मीटिंगा होत होत्या. कामं येत होती, जात होती. पिट्टा पडत होता. तास चार्जेबल होत होते. हिरव्या काचांचा कॅफे आता नेहमीचा अड्डा झाला होता.

माताजींच्या एक्सपेक्टेशन्स मॅनेज करण्यात मी यशस्वी झालो होतो बहुतेक. कारण हल्ली नवी कामं शेटकडे जायच्या ऐवजी माझ्याकडे येत. शेटचा चक्रमपणा दिवसेंदिवस वाढत होता. उशिरा येत असे, मध्येच गायब होत असे. द्रवरूप आहारही वाढला असावा, कारण त्याच्या आसपास एक सूक्ष्मसा शिळकट वास येई. टंगाडय़ा शेट आधीच उंटासारखा बारक्या उडय़ा घेत चालायचा. आता चालीत थोडा फरपटण्याचा आभासही आला होता.

‘गॉसिप क्वीन’ कीर्तीमुळे की काय, पण शेटच्या कौटुंबिक नाटय़ाचे नवे अंक न मागता माझ्यापर्यंत पोहोचत असत. बापाच्या स्वकष्टार्जित संपत्तीतला शेटचा वाटा बायकोला देणारं मृत्युपत्र कोर्टाने अवैध ठरवलं होतं. त्यामुळे आधीचं शेटला ‘जायदाद से बेदखल’ करणारं मृत्युपत्र वैध ठरलं होतं. अर्थातच, शेटने बायकोवर ठोकलेल्या केसलाही अर्थ उरला नव्हता. शेट जिंकूनही हरला होता.

पण या सगळ्यात कधीही न पाहिलेल्या शेटच्या बायकोची मात्र मला राहून राहून कणव येत होती. निकाल काहीही लागला असता तरी तिच्या कपाळी शिक्का पराजिताचाच असणार होता. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे पैशाची बाजू तरी भक्कम झाली असती, पण आता तेही नव्हतं. नुसता कोरडा काटेरी पराभव. मी हे एकदोनदा माताजींना बोलून दाखवलं, पण त्यांनी जास्त रस घेतला नाही.

एक दिवस एक किचकट कॉल साडेपाचला संपला. क्लायंटने पैशांत देमार बडवला होता. उद्यापासून घिस्सा सुरू होणार, आज तरी जगून घ्यावं या विचाराने माताजी आणि मी हिरव्या काचांच्या कॅफेकडे वळलो आणि नेहमीची

खिडकी धरली.

पलीकडच्या फुटपाथवरून टंगाडय़ा उंट येताना दिसला. मी हात वर केला, पण त्याला मी दिसणं शक्यच नव्हतं. मोबाइलवर शेटचा नंबर शोधायला लागलो, तर माताजींनी हाताने थांबवलं. त्यांच्या नजरेच्या रोखाने मी पाहिलं. प्रिंटेड साडी नेसलेली एक ठेंगणीशी बाई शेटच्या दंडाशी झटत होती. शेट सारखी तिची पकड सोडवत होता, दूर सरत होता. ती परत परत त्याच्या जवळ जात होती.

‘‘शेटची बायको..’’ माताजी पुटपुटल्या.

शेट आता सणकला होता. अंगावर ओरडत होता. भडकू हातवारे करत होता. खांद्याला धरून ढकलत होता. वळचणीला थांबलेले तुरळक लोक बघत होते. छत्रीवाले त्यांना ओलांडून जात होते. आम्ही कॅफेच्या आतून अवाक्  होऊन हे मूकनाटय़ पाहात होतो.

अचानक शेटचा कडेलोट झाला. खिशातून पाकीट काढलं, काही नोटा काढून बायकोच्या अंगावर भिरकावल्या. रस्त्याकडेच्या भिकाऱ्याला चाराणे फेकावेत तसं.

वाऱ्याच्या झोतात त्या नोटा इतस्तत: उधळल्या. नोटा मुठीत पकडत ती भेलकांडली. खालच्या राडीत पडलेल्या नोटा उचलल्या. दूरवर उडालेल्या नोटांमागे धावली. रस्त्यावर गेलेल्या नोटांवरून वाहनं जात होती, तिकडे तिने हताशपणे पाहिलं.

दरम्यान शेट दिसेनासा झाला होता. शेटची बायको खचून फूटपाथवरच बसली. माताजींनी माझा खांदा घट्ट धरला. जणू त्या मला उठण्यापासून रोखत होत्या. सेकंदभरातच त्यांच्या लक्षात आलं, की माझा तसा काहीच विचार नव्हता.

‘‘ओह! आय थॉट.. नेव्हर माइंड.’’ त्यांनी हात काढून घेतला.

मग आम्ही अजून एकेक कॉफी प्यायलो.

 

आदूबाळ 

aadubaal@gmail.com

First Published on February 18, 2017 12:30 am

Web Title: article by aadubaal