13 December 2018

News Flash

आई नावाची मैत्रीण

माझ्या आईच्या विचारांची क्षमता खुंटली गेली नाही

सुख दोन प्रकारचं असतं. पहिलं जे आपल्याला बऱ्याच काळापासून हवं असतं आणि दुसरं जे आपल्या अवतीभवती कायम अस्तित्वात असून कधी तरी अचानक आपल्याला कळून येतं. पहिल्या प्रकारातल्या सुखाची ‘स्पेसिफिक एक्सपायरी डेट’ असते. दुसरं सुख हे वाइनप्रमाणे वेळेबरोबर अधिक महत्त्वाचं होत जातं. माझ्या लहानपणापासून माझ्या आयुष्यात असलेलं सर्वात महत्त्वाचं सुख मला अलीकडेच कळू लागलं आहे. ते सुख माझ्या आईच्या सहवासाचं आहे!

एका वर्किंग वुमनचा मुलगा असल्यामुळेच कदाचित आईचा सहवास मला इतका महत्त्वाचा वाटतो. का वाटतो? याचं कारण शोधण्याचे प्रयत्न मी अलीकडे करू लागलो आहे. माझी आई माझ्या सर्वात जवळचा माणूस आहे. तुम्ही म्हणाल आई ही प्रत्येकाच्या जवळचीच असते, मात्र ती जवळ असते ते आई म्हणून. पारंपरिकदृष्टय़ा तिचं मुलावर प्रेम असतं, मुलाचं सुद्धा आईवर असतं, एकमेकांची काळजी असते. अर्थात आईला जितकी मुलाची काळजी असते तितकी मुलाला असत नाही. मात्र आई-मुलाच्या नात्यात मैत्रीचं नातं कितपत असतं? मैत्रीचं नातं अशासाठी की दोन माणसांना अगदी समान अधिकार, व्यक्त होण्याची समान मुभा, एकमेकांचे दोष दाखवण्याची समान संधी केवळ हेच नातं देऊ  शकतं. बाकीच्या साऱ्या नात्यांमध्ये कर्तृत्व मोठं असणाऱ्यांकडे झुकतं माप असतं.

तेव्हा माझ्या नजरेतून मी आईकडे पाहतो आहे ते केवळ तिचा मुलगा म्हणून नाही. तिला जवळून ओळखत असणारा, तिचा भूतकाळ माहीत असलेला, तिचा एक जवळचा मित्र म्हणूनसुद्धा. ६० च्या दशकात माझी आई जन्मली, ८० च्या दशकात तिचं लग्न झालं, ९० च्या दशकात ती दोन लहान मुलांची आई होती. आज ती दोन वाढलेल्या आणि धड मार्गी न लागलेल्या मुलांची आई आहे. या सगळ्या दशकांच्या प्रवासात आईचे जग घर आणि ऑफिस या दोन ठिकाणांभोवतीच अधिक फिरलं आहे. माझ्या वडिलांचंही वेगळं नाही तसं. सामान्य माणसं सहसा या दोन ठिकाणांभोवतीच आपलं जग गुंफतात. सामान्य माणसं प्रथम जेव्हा या दोन जगांच्या प्रवासाला सुरुवात करतात तेव्हा त्यांची काही ठरावीक मूल्यं असतात. ती मूल्यं त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमधून तयार झालेली असतात. एकदा का ही माणसं या दोन जागांच्या कैदेत अडकली, की त्यांची नवीन मूल्यं तयार करण्याची क्षमता खुंटली जाते. नवीन विचार कळून घेण्याची क्षमता सीमित होते.

माझ्या आईच्या विचारांची क्षमता खुंटली गेली नाही, याचं मला भयंकर कुतूहल वाटतं. त्या जगांच्या साचेबद्ध जगण्याला ते जमलं नाही. आईला आजची स्त्री नेमकी कळली. ती कशी कळली हा मला एक संशोधनाचा विषय वाटतो. गंमत आणि दुर्दैव मात्र असं की आईचे विचार जितके काळानुरूप बदलू शकले तितके तिचे आचार बदलले नाहीत. पण हे मात्र फक्त स्वत:पुरते. अगदी साधं उदाहरण म्हणजे आई रोज ट्रेनचा प्रवास करते, मात्र तिला एस्केलेटर या प्रकरणाची अजून भीती आहे. ती कारणं देते की एस्केलेटर न वापरण्याच्या निमित्ताने माझं थोडं चालणं होतं. हे मुळात तिला चालण्याची आवड असती तर पटण्यासारखं होतं. आई समवयस्क स्त्रियांमध्ये रमत नाही हे तिच्या विचार बदलण्याचं लक्षण वाटतं, आणि शेजारीपाजारी नुकतीच संसारात रुजू झालेली स्त्री आईशी अधिक कनेक्ट होते हे सुद्धा. लोकल ट्रेनमधल्या तरुण मुलींच्या कपडय़ांची स्टाइल कधी कधी तिला हास्यास्पद वाटते, मात्र ‘चुकीची’ वाटत नाही. तिच्या तरुणपणी जग वेगळं होतं आज वेगळं आहे, हे कळून बरोबर कोण चूक कोण हा मुद्दाच नाही हे सुद्धा तिला कळतं.

आजच्या आदर्श समाजाच्या व्याख्येमध्ये अनेकदा पुरुषांच्या मनातल्या स्त्रीबद्दलच्या विचारांचं मूल्यमापन केलं जातं. तितकंच महत्त्वाचं खरं तर स्वत: स्त्रियांना दुसऱ्या स्त्रीबद्दल काय वाटतं याचं मूल्यमापन आहे. मला कॉलेजमधला एक प्रसंग आठवतो. आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती, तडकाफडकी कुणाला तोंडावर काहीही बोलू शकणारी. तिच्याबरोबर एकाच दिवसात दोन प्रसंग घडले. कॉलेज ऑफिसमध्ये फी घेणारी बाई तिला बजावत होती, ‘‘कसे कपडे घातले आहेस तू? असं कॉलेजमध्ये येता तुम्ही? परत अशी आलीस इथे तर फीच घेणार नाही.’’ त्या मुलीने कॉलेजच्या नियमात न बसणारे कपडे मुळात घातलेच नव्हते. एक नॉर्मल स्लीवलेस टॉप आणि बॉडीफिट जीन्स, यात काय आहे! मी तिथे नसताना हे घडलं. जरी ती बाई माझ्यासमोर असं बोलली असती, तर मी काय केलं असतं? कदाचित काहीच नाही. इथे तिसरा माणूस पडू शकतो का? मला तेव्हा वाटलेलं की हो पडू शकतो, मात्र तिसरा माणूस ही स्त्री असायला हवी! ग्रुपमधल्या दुसऱ्या मुलीने तरी बोललं पाहिजे होतं! आज वाटतं तिथे असलेल्या प्रत्येकाने त्या ऑफिसमधल्या बाईला शांतपणे विचारलं पाहिजे होतं, दाखवा कॉलेजचे नियम कुठे लिहिलं आहे की हे कपडे घालू नयेत?

कॉलेजमधून बाहेर पडलो ते याच गोष्टीवर चर्चा करत. आमचा ग्रुप रस्त्याने चालत होता, कॉलेज प्रशासनाशी कशाला पंगा घ्यायचा म्हणून शांत राहायला हवं हाच सूर होता. ती ऑफिसमधली बाई प्रिन्सिपल मॅडमची खास आहे, म्हणून कुणाला काहीही बोलते असं काहींचं मत होतं. तेवढय़ात एक अंगाने थोडी लट्ठ वाटणारी बाई आमच्या समोरून गेली. ती काही तरी पुटपुटत गेली इतकं मी ऐकलं, नेमकं काय पुटपुटली हे नाही ऐकलं. आमच्या ‘त्या’ मैत्रिणीने मात्र नेमकं ऐकलं. ती बाई आमच्या ग्रुपमधल्या एका दुसऱ्या मुलीबद्दल कमेंट मारत गेली. ती नेमकी काय कमेंट होती हे मला आजपर्यंत कळलेलं नाही आणि त्या बाईला ती मारताना त्या दुसऱ्या मुलीच्या कपडय़ांत नेमकं काय दिसलं हेही मला कळलेलं नाही. ‘ती’ पहिली मुलगी आता भडकली होती, मी तिच्या मागे गेलो होतो ते तिला अडवायला, पण मी तसलं काही केलं नाही. ती बाई हिची बडबड न ऐकताच पुढे निघून जात होती. माझ्या मैत्रिणीचा सूर असा होता की ती लठ्ठ बाई स्वत:चं पोट दाखवत फिरतेय आणि इथे आम्हाला नावं ठेवतेय की आम्ही असे कपडे घातले आणि तसे कपडे घातले. ज्या मुंबैया भाषेचा ही मैत्रीण वापर करत होती ते ऐकून मला नुसतं हसायला येत होतं. अशांना अशीच उत्तरं द्यायला हवीत असंही तेव्हा वाटलं होतं.

आज या प्रसंगाचा पुनर्विचार करताना मला असं वाटतं, की ती मैत्रीण जे काही म्हणाली ते जशास तसं अशा प्रकारचं होतं. म्हणजे तुम्ही जर गुडघ्यातनं विचार करता तर आम्हीसुद्धा त्या एका क्षणासाठी तसाच विचार करून तुम्हाला तोडीस तोड उत्तर देऊ. त्या दिवशी आम्ही पहिल्या प्रसंगात बोलले पाहिजे होते, रीतसर त्या फी घेणाऱ्या बाईची कम्प्लेंट प्रिन्सिपलकडे करायला पाहिजे होती आणि दुसऱ्या प्रसंगात आम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे होतं. त्या लठ्ठ बाईची कमेंट ही फक्त हवेत केलेली कमेंट होती, अशा कमेंट करणारे लोक मनातसुद्धा कमेंट करत असतातच. त्यांना अशी कमेंट आणि त्या अंगाने विचार करण्यापासून आपण कुणीच अडवू शकत नाही. त्यांचे विचार बदलणे आपल्याला त्या एका क्षणात अथवा आपल्यासारख्या अनेकांना अनेक क्षणांतदेखील शक्य नाही. मात्र जिथे कृती असते, त्या कृतीचे परिणाम आपल्याला दिसतात, कळतात. तिथे तिथे आपण आपला मुद्दा मांडायलाच पाहिजे.

माझी आई आज त्या लठ्ठ बाईप्रमाणे अथवा फी घेणाऱ्या बाईप्रमाणे असती, तरीही ती माझी आई असतीच. मात्र ती माझी मैत्रीण कधीच झाली नसती. स्त्रियांच्या समानतेचा सावकाश आणि सतत चाललेला लढा हा तेव्हाच पूर्णत्वास जाईल जेव्हा स्त्रियांची आधीची पिढी येणाऱ्या पिढीच्या सामाजिक, वैचारिक बदलांना समजून घेईल, स्वीकारील.

अभय साळवी

salviabhaythegodfather@gmail.com

First Published on October 14, 2017 12:13 am

Web Title: articles in marathi on my mother