13 December 2017

News Flash

डीअर आलिया!

एकदा मला निघायला उशीर झाला घरातून आणि अचानक मला तू वेगळ्याच ठिकाणी दिसलीस.

प्रणव सखदेव | Updated: February 4, 2017 12:33 AM

‘‘माझ्या मनात तुझ्या या थोडय़ाफार आठवणी आहेत. खरं तर माझ्यासाठी तू आठवणींपुरती, आठवणींनी तयार झालेली अशी कोणी नाहीसच. माझ्यासाठी तू तपशील नाहीसच. माझ्यासाठी तू एक मनावर झालेला इम्पॅक्ट आहेस. ओल्या सिमेंटच्या फ्लोअिरगवर चुकून कोणाचा तरी पाय पडावा आणि मग तो तसाच राहावा तसा तुझा ठसा माझ्या मनाच्या एका हळव्या जागेवर पडून गेला आहे.’’

त्यांच्या नजरेतील ‘ती’ विषयी सांगणारं तरुण लेखकांचे हे सदर. त्यातलीच ही एक कथा.

तू आत्ताही अगदी तशीच दिसतीयेस, जशी मी तुला रोज पाहायचो. अगदी तशीच – तोच गोल, थोडा बसकट चेहरा. गोरा रंग. सरळ नाक. जाड भुवया आणि काळसर ओठ. तसेच मोकळे कुरळे केस. फुललेले आणि आता जमिनीवर विसावलेले.

तू तशीच निळी जीन्स घातलीयेस आणि त्यावर टीशर्ट. गुलाबी, प्लेन, कॉलरचा!

फक्त आत्ता मला तुझे डोळे तेवढे दिसत नाहीयेत. त्यावर पापण्यांची कफनी आहे.

तुझे करडे-काळे डोळे एवढे बोलके कसे काय, असं मला कायमच वाटायचं तुला पाहून. वाटायचं, तुझ्या डोळ्यांना स्वरयंत्र असेल जोडलेलं! एवढे ते एक्स्प्रेसिव्ह होते. आणि खरं सांगू, तेव्हा तुझ्यात जो एक चार्म असायचा, एनर्जी असायची, ती आज कुठेच नाही. तो चार्म कुठे तरी हरवून गेलाय, गायब झालाय. कुठे गेलाय तो? तू कुठे गेली आहेस?

तुझी आणि माझी ओळख अशी नाही. खरं तर ‘ओळख’ हा शब्दही वापरता येणार नाही असं आपलं रिलेशन. तेही एकाच बाजूने – माझ्या. मी तुला ऑफिसात जाताना रोज पाहायचो, तेव्हा मी स्कूटरवर असायचो. आणि तू चालत जात असायचीस. आणि जवळपास मला रोज दिसायचीस – एकाच ठिकाणी किंवा थोडं पुढे-मागे.

एकदा काय झालं माहितेय, आठवडाभर मी घरीच होतो. मला बरं नव्हतं. त्यामुळे मला तू दिसली नव्हतीस. आणि नंतरही असं किती तरी वेळा झालं. पण त्याने मी कधीही अस्वस्थ वगैरे झालो नाही. मला तेव्हा तू आठवायचीही नाहीस. एवढंच नाही, तू ज्या रस्त्यावर मला दिसायचीस, त्या रस्त्यावर जाईपर्यंत माझ्या मनात तू इथे दिसण्याची शक्यता आहे हे रजिस्टरही झालेलं नसायचं. अगदी तू दिसेपर्यंत मी माझ्याच नादात स्कूटरवर असायचो. आणि एखाद्या लॅण्डमाइनवर पाय पडावा, तसं तू दिसताक्षणी, त्या काही सेकंदांत माझ्या मनात असंख्य स्फोट व्हायचे. मलाही ते सगळे कधीच समजले नाहीत. आणि यापुढे ते कधी समजतील असं मला वाटतही नाही. हे स्फोट मला हवेहवेसे वाटायचे. ते एकाच कप्प्यात बंदिस्त करता येणारे नव्हते, खूप कॉम्प्लेक्सेस होते त्यात.

एकाच वेळी मला तू माझ्या मुलीसारखी वाटायचीस. वाटायचं, तुला कुशीत घ्यावं आणि थोपटून झोपवावं. तुझ्यावर कायम आभाळासारखं पसरून राहावं. तुझी काळजी घ्यायला, रक्षण करायला. मग वाटायचं, तू माझी मैत्रीण आहेस. तुझा हात धरून तुला वेताळ टेकडीवर घेऊन जावं आणि दिवसभर काय काय झालं ते सगळं सांगून टाकावं. सगळं. राग, अपमान, आनंदाचे क्षण. अवघडलेले क्षण. सगळं. मोकळं व्हावं. आणि मग हळूहळू हातात हात घेऊन टेकडी उतरून यावं आणि तुझ्यामागे स्कूटीवर बसावं. तू स्कूटी चालवत असताना, तुझ्या खांद्यावरून तुझ्याशी गप्पा माराव्यात. तुझं ऐकावं. आणि एकीकडे, तुझ्या केसांचा गंध आणि तू लावलेल्या श्ॉम्पूचा वास यांतला फरक ओळखत राहावा. मग वाटायचं, तू एक मादी आहेस. तुझा गंध कसा असेल, तो आपल्याला आपल्या नाकात कसा भरून घेता येईल आणि तू नुसतीच, कपडय़ांशिवाय कशी दिसत असशील हे एकदा पाहूनच टाकावं. तुझ्या पिटुकल्या देहात मुठीएवढं यूटरस आहे, ज्यात क्रिएट करण्याची जगातली सर्वात मोठी शक्यता दडून बसलेली आहे, ती फुलवावी. तिथपर्यंत पोचावं.

मग वाटायचं की, तुझ्यासोबत कोणता तरी मूव्ही पाहायला जावं. इंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न खावेत. किंवा वाटायचं, तुझे भरपूर फोटो काढावेत – खरं तर चित्र – पण मला ती कला अवगत नाही. पहिल्यांदा, केस ओले असताना काढावेत, मग ते फुलल्यावर, हलका मेकअप करून, कधी खूप मेकअप करून. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट किंवा कलर पॉप करून.

कधी वाटायचं, तुझा हात धरून बागेत जावं आणि घसरगुंडीवर खेळावं किंवा पकडापकडी. आणि मध्येच असंही वाटायचं की, तुझ्या बोटाच्या पेराला घट्ट रबर बांधावा. बोट चांगलं काळंनिळं पडेल एवढा घट्ट. आणि मग कर्कटकाचं टोक टुचूकक्न् लावावं त्याला आणि तरारून आलेला लाल थेंब जिभेवर घ्यावा. त्याची चव घ्यावी आणि मग बोट चोखत राहावं.

मला तू आवडतेस हे तर नक्की, पण त्याही पलीकडे काही तरी होतं. काय असेल ते? काय म्हणायचं त्याला?

मला माहीत नाही. मी फक्त तुझ्या अस्तित्वाच्या आधाराने जे काही वाढत होतं, ते वाढू देत राहिलो, बस्स.

एकदा मला निघायला उशीर झाला घरातून आणि अचानक मला तू वेगळ्याच ठिकाणी दिसलीस. नेहमीचा रस्ता पार करून तू बरीच पुढे आली होतीस. चालता चालता काही तरी खात होतीस. बहुतेक व्हेज पफ. किती गोड दिसत होतीस तू तेव्हा! तू निळा कॉटनचा टॉप घातला होतास, त्यावर पांढरे पोलका डॉट्स होते. अगदी आलियासारखीच वाटलीस, ‘डीअर जिंदगी’मधल्या. तेव्हाच मी तुला ‘डीअर आलिया’ असं नाव देऊन टाकलं. तुझा चेहरा गोंधळलेला होता. बहुतेक, त्यामुळेच तू एवढी गोड दिसत होतीस. अतिठामपणा आपल्यातलं चैतन्यच घालवून टाकतो नाही?

कदाचित तू तेव्हा तुझ्या मित्राशी त्याच्या-तुझ्या किंवा इतर कोणाशीही असलेल्या तुझ्या रिलेशनशिपबद्दल बोलत असशील.. किंवा कदाचित करिअरबद्दल – पुढे काय करायचं ते.. किंवा कदाचित, तुझ्या घरच्यांबद्दल, आईबाबांच्या डिव्होर्सबद्दल किंवा आणखी काहीही.. काहीही असू शकेल यातलं किंवा यातलं काहीच नसेल. किंवा तू उगाचच संभ्रमात पडली असशील. किंवा त्या दिवशी मला तू उगाचच तशी गोंधळलेली वाटली असशील. पण तू मला खूप खूप गोड वाटली होतीस तेव्हा. कोकरासारखी. मऊ, लुसलुशीत. कुठे आणि कुणामागे जायचं असे बेसिक प्रश्न पडलेली.

तुझ्याबरोबर कायम एक मित्र असायचा. तो तुझ्यापेक्षा बराच उंच होता, एवढंच मला आठवतंय. मी कधीच त्याचा चेहरा पाहिला नाही. पाहिला नाही पेक्षा माझं कधी लक्षच नाही गेलं त्याच्याकडे. त्यामुळे तो तुझा कोण होता, वगैरे प्रश्न मला पडलेच नाहीत. पडले असते तरी मला त्याचं उत्तर नको होतं.

पण एकदा, मला अगदी नीट आठवतंय, तुम्ही दोघं रस्त्याच्या कडेला थांबला होतात. तुझे डोळे वाहत होते, नाक लाल झालं होतं आणि डोळ्यातलं पाणी गालावरून तोंडात जात होतं. तू तुझ्या ब्राऊन पुलोव्हरच्या बाहीने ते पुसत होतीस, पण तुला ते थोपवणं कठीण जात होतं. तसा उघडपणे मी फारसा रडत नाही. पण तेव्हा तुला पाहून काही क्षण माझ्या डोळ्यांत पाणी आलं. तुला काय झालं होतं हे काहीही मला माहीत नव्हतं. आणि काही झालं तरी मला ते समजणारं नव्हतं, पण तुझा दु:खी चेहरा मला फील झाला होता. आणि तुला सांगू – त्या क्षणाला, अगदी त्या क्षणाला मी तुझा तो मित्र झालो.

तेव्हा त्या मित्राने किती छान जवळ घेतलं तुला. तो मीच होतो. मग तूही त्याच्या बरगडय़ांमध्ये आपली मान घातलीस. तो मीच होतो.

तुझे केस तेव्हा पार विस्कटले होते. आणि त्याच्यासमोर तू अगदीच छोटुकली वाटत होतीस. अगदी लहानशी. तो मीच होतो.

त्याने एक हात तुझ्या खांद्यावरून टाकून तुला जवळ घेतलं. तो मीच होतो. मीच.

तुला तेव्हा मी तिथे असल्याचं जाणवलं होतं?

माझ्या मनात तुझ्या या थोडय़ाफार आठवणी आहेत. खरं तर माझ्यासाठी तू आठवणींपुरती, आठवणींनी तयार झालेली अशी कोणी नाहीसच. माझ्यासाठी तू तपशील नाहीसच. माझ्यासाठी तू एक मनावर झालेला इम्पॅक्ट आहेस. ओल्या सिमेंटच्या फ्लोअिरगवर चुकून कोणाचा तरी पाय पडावा आणि मग तो तसाच राहावा तसा तुझा ठसा माझ्या मनाच्या एका हळव्या जागेवर पडून गेला आहे. सिमेंटवरचं ते पाऊल जसं कोणाचं आहे हे कधीच समजत नाही, तसंच कदाचित, आता यानंतर काही काळाने हा ठसा कोणाचा आहे हे मला आठवणारही नाही, हळूहळू तो ठसा जिचा आहे त्या तुला मी विसरून जाईन, पण तो ठसा मात्र कायम तिथे राहील. हा ठसा तुझ्या देहाचा नाही, तुझ्या डोळ्यांचा नाही, तुझ्या केसांचा, रंगाचा किंवा कपडय़ांचा नाहीये. तो तुझ्या असण्याचा आहे.

आज तू अशी प्रेत होऊन या रस्त्याच्या मध्यावर निपचित पडून आहेस आणि आता यापुढे तू मला कधीच दिसणार नाहीयेस आणि तू इथून पुढे कुठे जाणारेस, तुझं काय होणार आहे याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. जीवन अखंड वाहतं असतं आणि मरण हा जीवनाचाच एक भाग असतो, तो अंत नसतो असं आजी नेहमी म्हणते. आणि तसं असेल तर तुझा प्रवास संपलेला नाही. तो माझ्यापुरता संपलेला आहे. आणि म्हणूनच पुढच्या प्रवासाला लागण्याआधी मला तू खूप आवडायचीस हे सांगणं मला भाग आहे.

डीअर आलिया, गुड बाय!

तू कुठे राहायचीस? कुठे जायचीस? काय बोलायचीस? काय करायचीस? मला यातलं काहीही माहिती नाही. आणि तुला तर माझ्याबद्दल काही माहिती असणं अशक्यच. पण तरी मी तुझ्याशी एक नातं बांधून घेतलं. पहिल्यांदा जेव्हा मी तुला पाहिलं, तेव्हा माझ्या कानात हेडफोन्स होते आणि मी अरिजित सिंगने गायलेलं ‘एन्ना सोणा क्यू रब ने बनाया’ गाणं ऐकत होतो. आणि तेव्हाच तू दिसलीस. तुझे ओठ हलत होते. त्यावरून मला काहीही समजत नव्हतं. पण त्या ओठांची हालचाल म्हणजे एखादी कविताच असावी असं वाटलं मला. अंतर्गत लय घेऊन आलेली, घट्ट कविता. मंत्रमुग्ध करून टाकणारी. आणि तू अचानक माझ्या दिशेने पाहिलंस. मला चांगलं आठवतंय, तू अगदी काही नॅनो क्षण माझ्याकडे किंवा माझ्या दिशेने पाहिलं असशील. माझं अंगांग फुलून आलं तेव्हा. आणि मला वाटलं, की थांबावं आणि तुला अरिजित ते गाणं म्हणून दाखवावं आणि विचारावं – एन्ना सोणा क्यू बनाया?

तेव्हा किंवा नंतर कधी तरी मी खरंच असं काही केलं असतं, तर तू काय म्हणाली असतीस मला? कदाचित मला दोन लगावल्या असत्यास किंवा तुझ्या मित्राने माझी गचांडी धरली असती किंवा नुसतीच गोडसं हसून मला कॉम्प्लिमेंट दिली असतीस किंवा आणखी काही तरी. तू काहीही केलं असतंस, तरी मी नुसताच निघून गेलो असतो. कारण मला तुझ्या कोणत्याही पर्सनल गोष्टींमध्ये रस नव्हता. आणि आजही नाही.

मला तू जशी दिसत होतीस तशीच आवडत होतीस. माझ्या बाजूने आपल्यात काही तरी जुळून आलं होतं. मला तेवढंच हवं होतं. मला आणखी काही नको होतं. मला भीती होती की, जर समजा कधी आपली ओळख झाली आणि आपण अधिक खोलात जाऊन एकमेकांना ओळखू लागलोच, तर मी हा जो तुझ्या-माझ्यात कोळ्यासारख्या एक नाजूकसा धागा विणला होता, तो तुटून जाईल की काय!

प्रणव सखदेव   sakhadeopranav@gmail.com

First Published on February 4, 2017 12:33 am

Web Title: dear alia