समानता फक्त पुरुषांनीच नाही तर स्त्रियांनीही समजून घेण्याची गोष्ट आहे.  समानता हा शब्द आपण फार सहजतेने उच्चारतो, पण आपल्या वागणुकीत मात्र तो सहजपणे येत नाही. या समानतेत एका पुरुषाला त्याच्या मैत्रिणीसोबत फिरायला जाता येईल आणि त्याचा कोणताही अन्य अर्थ इतर लोक काढणार नाहीत. या समानतेत स्त्री-पुरुष एकमेकांकडे त्यांच्या गुणांमुळे, विचारांमुळे एकत्र येतील; इतर गोष्टी दुय्यम असतील. आणि ही  समानता आणणं, ती राबवणं ही फक्त पुरुषांची जबाबदारी असणार नाही.

‘स्त्रीचं मन व चरित्र देवांनाही कळत नाही, तर माणसांना (वाचा ‘पुरुषांना’) काय कळणार, अशा अर्थाचं एक सुभाषित आहे. ते अर्थातच कोणा पुरुषानंच तयार केलं असणार. एखाद्या स्त्रीनं ते केलं असतं तर तिनं पुरुषाचं मन व चरित्र कळणं अशक्य आहे, असं म्हटलं असतं. हे असं वाटणं हे भारतीय स्त्री-पुरुषांमध्ये संवादाचा किती अभाव आहे याचं उत्तम उदाहरण आहे. आपल्या इथं हा संवाद कायमच दडपण्यात येईल, अशी एक व्यवस्था जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रात कार्यरत राहील, याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रीला काय वाटतं ते तिला पुरुषांसोबत वाटून घेता येत नाही आणि पुरुषांचीही तीच परिस्थिती आहे.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

जो संवाद होतो तो स्त्रीचा स्त्रीसोबत आणि पुरुषाचा पुरुषासोबत. त्यातून अर्थातच अनेक गैरसमज उपजले तर नवल नाही. हे गैरसमज मुख्यत: असतात एकमेकांना एकमेकांविषयी काय वाटतं किंवा काय हवं असतं याविषयीचे, ज्यांना प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा ऐकीव गोष्टींचाच जास्त आधार असतो. मुलं वयात येताना त्यांच्या कानावर ज्या गोष्टी पडतात त्यातला एक विनोद म्हणजे, ‘स्त्रीला एकाच पुरुषाकडून सर्व काही हवं असतं आणि पुरुषाला मात्र प्रत्येक स्त्रीकडून एकच गोष्ट हवी असते.’ आता ही ‘एकच गोष्ट’ काय ते सांगायला नको. हा विनोद आपल्या समाजातील पुरुषी लैंगिक वर्चस्वाचा एक उत्तम आविष्कार आहे. तुम्ही कोणत्याही पुरुषाला हा विनोद सांगा, तो यावर रागावणार नाही, उलट हसेल. तो विनोद त्याला पटलेला असतो. कारण  पुरुषाला प्रत्येक स्त्रीकडून लैंगिक सुखच हवं असतं अशी त्याची समजूत असते. त्यातून त्याच्या तथाकथिक पुरुषत्वाला बळ मिळतं. ही समजूत आसपासच्या पुरुषी वातावरणातून त्याच्या मनावर कळत नकळत ठसत राहते.

स्त्री ही फक्त उपभोगासाठी असते व एक पुरुष कितीही स्त्रिया भोगू शकतो असा यातला मूलार्थ. दुसरा अर्थ म्हणजे स्त्रीनं तिच्या वाटय़ाला जे येईल ते पवित्र मानून घ्यावं. यात पुरुषांनी स्त्रीच्या लैंगिक किंवा अन्य कोणत्याही गरजांचा विचार केला नाही हे उघडच आहे. कारण यात स्त्रीला निवडीची संधी नाही.  तिला लैंगिक सुखाची आकांक्षा नाही,  हा निष्कर्ष आपण कशाच्या आधारावर काढतो? लैंगिक सुखाची गोष्ट राहू देत. ती आपल्या सध्याच्या समाजाला अजूनही न झेपणारी आणि अनेक संस्कृतिरक्षकांना खटकणारी गोष्ट आहे. आपण इतर गोष्टींबाबत बोलूयात ज्यांचा स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्दय़ाशी जवळचा संबंध आहे. माझ्या एका मैत्रिणीनं एकदा असं म्हटलं की, ‘‘आपल्यावर एकाच माणसावर प्रेम करण्याची सक्ती का केली जाते? सुरुवातीला बरं वाटतं, पण नंतर कंटाळा येतो त्याचा. म्हणजे त्याचा तिरस्कार वाटतो किंवा तो नकोसा होतो असं नाही; पण मला ज्या गोष्टी हव्या असतात अशा अनेक गोष्टींत तो मला उत्तम साथ देऊ  शकत नाही. मला संगीताची आवड आहे, पण त्याला नाही. मला फिरायला आवडतं, पण त्याला नाही. अशा वेळी अशा गोष्टी आवडत असलेल्या अन्य पुरुषांच्या सहवासात तो वेळ घालवला तर काय वाईट आहे? त्याच्याकडे व्यभिचार म्हणूनच का बघायचं आपण? प्रेम ही फार मोठी गोष्ट आहे. ती एक-दोघांनी करण्याची गोष्ट नाही. आयुष्यदेखील फार मोठी गोष्ट आहे. तीही एक-दोघांनी जगण्याची गोष्ट नाही.’’ मी यावर म्हटलं की, ‘‘यासाठीच तर मित्र असतात ना?’’ त्यावर तिनं उत्तर दिलं की, ‘‘लग्न झालं की या मैत्रीलाही बंधनं पडतात. कालपर्यंतचे मित्र आता माझ्या नवऱ्याला चालत नाहीत.’’ त्यावर मी विचारलं, ‘‘त्याच्या अनेक मैत्रिणी तुला चालतील का?’’ त्यावर तिनं ‘नाही’ असं उत्तर दिलं. त्यातली तिची असहायता, तिची खंत, तिची तगमग ही सर्व स्त्री-पुरुषांची आहे.

या अवस्थेला स्त्रियांपेक्षा नि:संशयपणे पुरुषच जबाबदार आहेत. शेकडो-हजारो वर्षांपासून त्यांनी स्त्रियांना आपल्या धाकात ठेवलं. नंतर त्यांनी स्त्रियांना मुक्त करण्याचं ठरवलं, तेही त्यांच्या सोयीनुसार किंवा गरजेनुसारच. अजूनही अनेक पुरुष हे त्यांना झेपेल इतपतच स्वातंत्र्य, बरोबरी स्त्रियांना देत असतात. त्यापलीकडे स्त्रीनं जाण्याचा प्रयत्न केला किंवा खरोखरच प्रत्येक बाबतीत समानता मिळवण्याचा आग्रह धरला, तर ‘ती पुरुषासारखी वागते’ असं पुरुषच नाही तर स्त्रियाही म्हणतात. स्त्रीचं असं ‘पुरुषासारखं वागणं’ पुरुषांना काही पचनी पडत नाही आणि अनेक स्त्रियांनाही नाही. पुरुष, स्त्रीसारखे वागू लागले तर आणखीनच हाहाकार उडतो. उदाहरणार्थ तृतीयपंथी. या दोन्ही बाबी, आपली स्त्री-पुरुषांना समजण्याची क्षमता किती तोकडी आणि हलक्या स्वरूपाची आहे, याचं उत्तम उदाहरणं आहेत. स्त्रियांच्या वागण्यामागे त्यांची आजवरची झालेली सुव्यवस्थित मुस्कटदाबी असते, तर पुरुषांना मात्र त्यांचा अहंकार आडवा येतो. आजकालच्या अनेक उदार पुरुषांना स्त्रियांना बरोबरी देणं मान्य असतं, पण ती बरोबरी किती द्यावी व कोणत्या क्षेत्रात द्यावी हे ठरवण्याचे अधिकार मात्र ते स्वत:कडे राखून ठेवतात. सार्वजनिक जीवनात हे स्त्रीवादी पुरुष उदारपणाचा मुखवटा चढवून वागतात, पण खासगी जीवनात मात्र तासन्तास तसं वागणं त्यांना झेपत नाही आणि मग त्यांच्यातला पुरुष जागा होतोच. ती आपल्या हातातून निसटेल, आपल्या पुढे जाईल, अशी भीती त्यांना वाटते. समानतेचा मुद्दा अहंकारानं सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे स्त्री-पुरुष समानता ही अजूनही आभासीच राहिली आहे.

समानता फक्त पुरुषांनीच नाही तर स्त्रियांनीही समजून घेण्याची गोष्ट आहे. स्त्रीमुक्तीचा अनेक स्त्रियांनी चुकीचा अर्थ लावला आहे, ज्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागत आहेत. समानता हा शब्द आपण फार सहजतेने उच्चारतो, पण आपल्या वागणुकीत मात्र तो सहजपणे येत नाही. समानतेचा पाया हा एकमेकांना स्वातंत्र्य देणं व हे स्वातंत्र्य आनंदानं मान्य करणं यावर उभा असतो. यातील स्वातंत्र्य आणि आनंद, हे शब्द महत्त्वाचे. स्वातंत्र्याचा संबंध व्यक्तीशी असतो. आपण एकमेकांना जोवर ‘मी पुरुष व तू स्त्री’ म्हणून मी असं वागेन आणि तू तसं वागायचं असं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगू तोवर हे स्वातंत्र्य येणार नाही. तिथं गुलामीच नांदेल. स्त्री-पुरुष दोघेही परंपरेचे, समाजव्यवस्थेचे, कुटुंबव्यवस्थेचे गुलाम म्हणून जगत असतात. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसतं. व्यक्ती म्हणून त्यांना फार अधिकार नसतात. त्यामुळे आधी हा व्यक्तीपणा अंगात रुजायला हवा. तो आला की त्याच्यासोबत स्वातंत्र्य येतं. फक्त ते कोणा एकाचं स्वातंत्र्य नको. ते एकाच वेळी दोघांचंही स्वातंत्र्य हवं, हे स्वातंत्र्य दोघांनाही मान्य हवं आणि तेही आनंदानं; नाइलाज म्हणून नको. या अटी पूर्ण झाल्या तर खरी समानता येऊ शकेल.

अशा समानतेमध्ये एका स्त्रीला तिच्या लैंगिक अपेक्षांसंबंधी मोकळेपणानं बोलता येईल, फक्त तिच्या पुरुषासोबतच नाही तर अन्य पुरुषांसोबतही. या समानतेत एका पुरुषाला त्याच्या मैत्रिणीसोबत फिरायला जाता येईल आणि त्याचा कोणताही अन्य अर्थ इतर लोक काढणार नाहीत. या समानतेत स्त्री-पुरुष एकमेकांकडे त्यांच्या गुणांमुळे, विचारांमुळे एकत्र येतील; पैसा, प्रतिष्ठा, जातपात, धर्म, वय, सामाजिक स्थान या गोष्टी दुय्यम असतील. समानता आणणं, ती राबवणं ही फक्त पुरुषांची जबाबदारी असणार नाही, (जी सध्या आहे असं मानलं जातं) त्यात स्त्रीचाही तितकाच सहभाग असेल. एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करणं, आपल्यात गुण-दोष असतात हे स्वीकारणं, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा संकोच न करणं, एकमेकांच्या विकासासाठी सहकार्य करणं, यामुळेच खरी समानता येईल. अन्यथा यापुढेही आपण आपल्यातील गैरसमजुतींच्या आधारेच एकमेकांना समजण्याचा व समजावण्याचा प्रयत्न करत राहू ज्याचा शेवटी दोघांनाही त्रास होईल.

एकमेकांशी मोकळेपणानं बोललं की, एकमेकांची मनं कळायला वेळ लागत नाही. प्रश्न आहे तो पुढाकार घेण्याचा, जे कळेल ते समजून घेण्याचा आणि एकमेकांच्या मतभेदांचाही आदर करण्याचा. हे जर झालं तर स्त्रीचं मन कळत नाही ही मिथही संपुष्टात येईल आणि पुरुषांना फक्त एकच गोष्ट हवी असते ही समजूतही!

प्रतीक पुरी pratikpuri22@gmail.com