अगदी गरज असल्याशिवाय कानात इअरप्लग न बाळगणारी फग्र्युसन रस्त्यावरची तेव्हाची ती आज अगदी गरज भासल्याशिवाय कानातला इअरप्लग बाहेर काढायची नाही. मुळात तिला, तुम्हाला तिच्याविषयी काय वाटतं याची फिकीरच नाही. काही वर्षांपूर्वी ती होती. आपण चालत जात असताना हजारो हृदयं महापालिकेच्या तुटक्या फुटपाथच्या एकेका टाइलमध्ये तुडवून जातोय याची त्या सुंदरीला कल्पना असायची. आणि त्याचा हलकासा अभिमानही. हल्ली तो गेला. कारण तिचं आजूबाजूला लक्षच नसतं. ती मोबाइलवर असते. सतत कुणाशी तरी बोलत असते. चॅट करत असते. ऑनलाइन असते..

दृश्य क्रमांक- (खरं तर या दृश्याला क्रमांक नाही तरी दृश्य मात्र एक नंबरचं आहे!)

स्थळ : नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, पुणे. (यालाच पुणेरी मराठीत फग्र्युसन रोड असंही म्हणतात)

वेळ : दुपारी बारा.

पात्रे : मी, तो आणि ती. शिवाय अनधिकृत विक्रेत्यांनी व्यापून उरलेल्या फुटपाथवरच्या तुटक्या टाइल्सवरून जीव आणि हातातल्या वस्तू सांभाळून चालण्याच्या प्रयत्नात असलेले असंख्य पादचारी आणि बाप जिवंत असताना दुसरं लग्न लावायला निघालेल्या आईला थांबवायला निघण्याच्या घाईत असल्याप्रमाणे बाईक चालवणारे रस्त्यावरचे इतर असंख्य.

रानडे इन्स्टिटय़ूट नामक दगडी इमारतीसमोरच्या रुपाली हॉटेलमधून वय आणि बुद्धिमत्ता यांची पर्वा न करता समोरच्यांची टवाळी करून (आणि स्वत:ची करून घेऊन) मी बाहेर पडतो. समोरच्या फुटपाथवरून नेमक्या कोणत्या दिशेला गेल्यास रस्त्यावरून नीट चालता येईल असा विचार करत असतानाच विशीच्या उंबरठय़ावर असणारे तो आणि ती माझ्यापुढे येतात. थांबतात. एकमेकांना मिठी मारून उभे राहतात. जीन्स आणि गेली साताठ वर्ष धुतलेला नसावा असा वाटणारा टीशर्ट असा दोघांचाही पेहराव. आणि अचानक रस्त्यावरची गजबजलेली दुनिया अस्तित्वातच नसल्याप्रमाणे ती आपल्या चवडय़ावर उभी राहून त्याच्या ओठांचं एक कचकचीत चुंबन घेते. तो तिच्या पाश्र्वभागावर एक प्रेमळ चापट मारतो. मिठी सुटते आणि दोघंही हसून चालायला लागतात. फुटपाथवरच्या वयस्क पावलांच्या चपलांमध्ये घाम फुटतो, आजूबाजूचे विक्रेते हिंदीत काही तरी कुजबुजत हसू लागतात. रस्त्यावरच्या जरा मंद जाणाऱ्या चारदोन बाइक्स अधिक मंदावतात. उरलेल्या आपल्याच घाईत असलेल्या दुनियेचं याकडे फारसं लक्ष नाही. दोघांपैकी त्याचं मात्र या दुनियेकडे जरा लक्ष आहे. तिचं मात्र मुळीच नाही. ती आपल्याच चुंबनाच्या आठवणीत मग्न असावी बहुधा. किंवा नसेलही.

दृश्य संपलं.

फग्र्युसन रस्त्यावर दिसणारी ‘ती’ गेल्या दहा वर्षांमध्ये एवढी बदलली?

दिवसाच्या कुठल्याही प्रहरी ‘ती’ आकर्षक दिसत असे एवढं मात्र नक्की. आजही दिसते. काहीच काम नसताना फग्र्युसन रस्त्यावरच्या कुठल्याही कोपऱ्यात उभं राहून चालत्याबोलत्या ‘ती’ला पाहणं ज्याला जमलं नाही त्याला आयुष्यात जमलंय तरी काय? दहा-बारा वर्षांपूर्वी ती जेव्हा फग्र्युसनच्या फुटपाथवर दिसत असे तेव्हा तिच्या पावलांमध्ये घाई नसली तरी नजरेमध्ये असायची. कारण ओळखीचं कुणी दिसेल अशी धास्ती असायची. अशा वेळी मित्र-मत्रीणींच्या घोळक्यात तिला सुरक्षित वाटत असे. कारण त्या वेळी कुणी बघितलं तरी चालायचं. अर्थात तेव्हाची ती काही साधीसुधी होती अशातला भाग नव्हता. पण आपली कुठली गोष्ट समाजाला कळावी आणि कुठली नाही एवढं तिनं तिच्यापुरतं ठरवलेलं होतं. अमुक एक मुलगा आपला खास मित्र आहे हे जगाला कळलंच पाहिजे असा अट्टहास नसायचा. कळलं तर तेव्हाही काही ती फार मनावर घेत असे असं नाही. पण आवर्जून सांगावं असं काही तिला वाटत नसे. मधल्या काही काळात आठ-दहाच्या घोळक्यातून ती आपल्या खास मित्राबरोबर इतरांना बाय करून त्याच्याबरोबर जरा अधिक मोकळेपणे रेंगाळायला थांबत असे. हल्ली तर याची गरज भासेनाशी झालेली आहे. मित्रांच्या घोळक्यातसुद्धा तिला आपली स्वत:ची स्पेस आहे. हवं तेव्हा आपल्या मित्राशी खासगी खुसफुस ती घोळक्यातच करू शकते. आणि ही खुसफुस शारीरिकही असू शकते. इतर तिच्याकडे लक्ष देत नाहीत. कुणी दिलं तर त्यांची फिकीर ती करत नाही.

इतरांची फिकीर न करणं हे आजच्या तिचं वैशिष्टय़ आहे. इतरांचीच कशाला, कसलीच फिकीर न करणं हेच मूळ वैशिष्टय़. आपल्या आजच्या खास मित्राविषयी इतरांना कळलं तर, ही चिंता गेल्या काही वर्षांत तिच्या मनातून हद्दपार झालेली असावी. तेव्हा दहा-बारा वर्षांपूर्वी आपल्या मुलीनं तिच्या मित्राशी हात मिळवणं या गोष्टीविषयी काही वाटून घ्यायचं नाही असं तिच्या आई-बाबांनी स्वीकारलं असेल तर आता त्यांनी तिनं आपल्या मित्राचं चुंबन घेणं- सार्वजनिक ठिकाणीसुद्धा- ही गोष्ट हात मिळवण्याएवढीच माफक समजायची तयारी करून ठेवलेली बरी. आणि केली नसेल तर? एकच उत्तर येईल- सो व्हॉट, इट्स योर प्रॉब्लेम!

‘इट्स योर प्रॉब्लेम’ आणि ‘सो व्हॉट’ हे दोन परवलीचे शब्दसमूह सध्याच्या निकिता आणि जान्हव्यांच्या घोळक्यात सहज ऐकू येतील. काही वर्षांपूर्वी हा घोळका ऋतुजा आणि पल्लव्यांचा असायचा. अर्थात सध्याच्या घोळक्यातल्या जान्हवीला जर ‘जान्हवी’ अशी हाक मारली तर ती लक्ष देणार नाही. कारण आजच्या तिचं उच्चारी नाव ‘जान्हवी’ असं नसून ‘जान्वी’ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मात्र जान्हवी हाच उच्चार बरोबर कसा आहे हे तिला सांगायला जाऊ नका. गेलात तर ‘सो व्हॉट?’ असा उलट फटका तोंडावर बसेल. केवळ तुमचं वय जास्त आहे म्हणून आदर ठेवून बोलण्याची जबाबदारी आजच्या तिनं स्वत:च्या अंगावरून झटकून टाकलेली आहे. अगदी जुना बॉयफ्रेंड फेसबुकावरून झटकावा तशी. तुम्हाला आदर हवा असेल तर तुम्ही तुमच्या वागण्यानं तो कमवा. सिंपल! (हाही तिचाच शब्द.)

अगदी गरज असल्याशिवाय कानात इअरप्लग न बाळगणारी फग्र्युसन रस्त्यावरची तेव्हाची ती आज अगदी गरज भासल्याशिवाय कानातला इअरप्लग बाहेर काढायची नाही. मुळात तिला, तुम्हाला तिच्याविषयी काय वाटतं याची फिकीरच नाही. काही वर्षांपूर्वी ती होती. आपण चालत जात असताना हजारो हृदयं महापालिकेच्या तुटक्या फुटपाथच्या एकेका टाइलमध्ये तुडवून जातोय याची त्या सुंदरीला कल्पना असायची. आणि त्याचा हलकासा अभिमानही. हल्ली तो गेला. कारण तिचं आजूबाजूला लक्षच नसतं. ती मोबाइलवर असते. त्यामुळे कुणाचा खात्मा होतोय हे कत्ल करणारीला माहितीच नाही! अफसोस! म्हणजे शेळी जिवानिशी जातेच आहे आणि खाणारा ‘वातड कशी’ असंसुद्धा म्हणत नाही!

पूर्वी रस्त्यावरची ती जिवंत असायची. तिच्याकडे चोरून बघावं लागायचं. तिनं उलट नजर दिली तर आपण दुसरंच काही तरी वेगळं करतोय असं झटकन दाखवायची तयारी लागायची. ती एक वेगळी साधना होती. सगळ्यांना ते जमत नसे! पण हल्ली ते कौशल्य लागत नाही. कारण तुम्ही तिच्याकडे बघा, नका बघू तिला काहीच फरक पडत नाही. कारण ती सतत मोबाइलवरच असते. सतत कुणाशी तरी बोलत असते. चॅट करत असते. ऑन लाइन असते. किंवा अरजीत ऐकत असते.. काय सांगता? अरजीत माहिती नाही? नरकात जाल! गेले आता, तो रफी, तो किशोरबिशोर सगळे. किंवा अमुक गंधर्व किंवा तमुक खान वगरेंचा तो जमाना गेला. आता अरजीत. तो गाईल त्याला गाणं म्हणायचं. आणि त्याचे शब्द म्हणजे.. पण ‘हू केअर्स? तुम्हाला नसेल आवडत तर नका ऐकू. xxयू!’ (आता या फुल्या प्रत्यक्ष लिहायची आपली हिंमत नाही बाबा. फुल्यांऐवजीचा ऐवज प्रत्यक्ष ऐकायचा असेल तर रस्त्यात इअरप्लग लावून म्युझिक ऐकणाऱ्या तिला ‘ते काय तुमचे अर्जीत नि फिर्जीत, कुमार ऐकलाय का कधी?’ असं विचारून बघा. अर्थात स्वत:च्या जबाबदारीवर. आयुष्यात ऐकले नसतील असे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडतील. हल्लीच्या तिच्या संग्रहातली ही भर विलक्षण आहे.)

तिच्या कपडय़ांमध्ये झालेला बदलही विलक्षण आहे. काही वर्षांपूर्वी आपण काय कपडे घातले की आकर्षक दिसू असा विचार कपडे घालण्यापूर्वी तिनं केलेला आहे असं वाटायचं. आजकाल जे काय हाताला आलं ते घातलं असा प्रकार वाटतो. (अर्थात त्याला आमचा आक्षेप काही नाही. निरीक्षण आहे.) काही वर्षांपूर्वी घोळक्यातल्या शॉर्ट्स घातलेल्या तिच्याकडे चटकन लक्ष जायचं. आता घोळक्यातल्या सलवार-कमीज घातलेल्या तिच्याकडे नजर वळते. नेमकं काय बदललेलं आहे? प्रेझेन्टेशनची व्याख्या बदललेली आहे की मुळात नजरच काही तरी वेगळं शोधत असते? तिला मात्र तिच्या कपडय़ांविषयी अजिबात काळजी नाही. या बाबतीत ती त्याच्याही पुढे निघून गेलेली आहे. ‘त्या’ कॉन्शसमधून फग्र्युसन रस्त्यावरची आजची ती पूर्ण मुक्त झालेली आहे. निर्धास्त आहे. आणि म्हणून आनंदीही आहे. तिच्या वागण्यात तो कॉन्फिडन्स जाणवतो.

एरवी आपल्यातच मग्न असेलल्या तिला तुम्ही सोशल नेटवर्किंगवर बघा. स्वत:ची सगळी कुंडली मांडून ठेवलेली दिसेल. अर्थात आई-बाबा फेसबुकवरसुद्धा असतात तेव्हा काही गोष्टी ती इंस्टावर टाकते! तेसुद्धा त्यांना कळू नये म्हणून, नाही तर लग्न वगैरे बोलून ते बोअर करतात म्हणून! (सध्याच्या तिचे आई-बाबा तिला बोअर करतात, भाऊ सॅड असतो आणि टीचर्स पथेटिक असतात. हा बदलही नोंद घेण्यासारखा आहे.) आपल्या बॉयफ्रेंडने त्याचं आणि आपलं रिलेशनशिप स्टेटस् अपडेट करावं यासाठी ती आग्रही असते. आणि तो डबलडेट करत नाहीये ना याकडे तिचं लक्ष असतं. मुळात आपल्या चुंबनापासून ते रिलेशनपर्यंत कुणापासून काही लपवून ठेवावं असं तिला वाटेनासं झालंय. हेमंतकुमारचं एक गाणं आहे-

‘छुपा लो यूं दिल में प्यार मेरा, के जैसे मंदिर में लौ दिये की..’ मंदिराच्या गाभाऱ्यात हलके तेवणारी ज्योत असावी तसं माझं प्रेम तू तुझ्या हृदयात ठेव..  आजच्या तिला याची मजा कळणारच नाही. मुळात यात काही मजा असू शकते हेच तिला अमान्य आहे. तिचं गीत आहे- ‘कह दो तो सारी दुनिया में आज बजाके बैंड, तू है मेरा बॉयफ्रेंड!’  (जिज्ञासूंसाठी- हेसुद्धा एक गाणं आहे!)

गेल्या दहा-बारा वर्षांत एकाच रस्त्यावर फिरता फिरता तिथली ती एवढी बदललेली आहे. तिचं तिला माहिती आहे की नाही कुणास ठाऊक. तिच्यावरचा हा लेख ती अर्थातच वाचणार नाही. कारण ती मराठी जाऊच द्या, वर्तमानपत्रच वाचत नसावी. याउप्पर कुणी तरी तिला आपल्यावरचं हे निरीक्षण वाचून दाखवलंच तर तिला काय वाटेल? काहीही नाही! ती म्हणेल, ‘सो व्हॉट?’ किंवा म्हणेल.. असो. उगीच लेखाचा शेवट फुल्यांनी कशाला करा?

प्रसाद नामजोशी prasadnamjoshi@gmail.com