शिक्षण-नोकरीच्या शोधानंतर व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव झाली. आता मुलीही जेव्हा बाहेर पडायला लागल्या, तेव्हा त्यांनाही त्यांच्या एकटेपणाची (स्वातंत्र्य या अर्थी) जाणीव होणं अपरिहार्य होतं, पण अजूनही वाढता सामाजिक दबाव असल्याने त्या पेचात आहेत. एखाद्या कमावत्या मुलीनं ठरवलं, समजा या गावातल्या ‘ती’ला असंच एकटं राहून काही तरी करायची इच्छा असेल तर? ते तिला जमूही शकेल; पण तेवढी हिंमत दाखवताना ती धारातीर्थी पडू शकते, तिचे लचके तोडले जातील हे तिला नि आपल्यालाही चांगलंच माहितीये.

शहरातून जवळच्या खेडेगावात जाऊन राहायचा निर्णय ‘मी’ जेव्हा घेतला तेव्हा एका अस्वस्थ मितीचा जन्म होईल असं वाटलंही नव्हतं. सर्व शहरी मित्या सोडून एकांतवासात राहायच्या रोमँटिक संकल्पनेचा एका रोमँटिक मितीनेच काटा काढला.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक
Budaun murder
“चकमकीत ठार झाला हे योग्यच झालं”, दोन मुलांची गळा चिरून हत्या करणाऱ्या साजिदच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया
father commits suicide after killing daughter in latur
लातूरमध्ये मुलीची हत्या करून वडिलांची आत्महत्या

गावातल्या घरात काढलेले पहिले दोन महिने वैतागवाडीची हद्द होती. सर्वदूर नुसते प्रश्नच उभे होते. हे काय चाललंय आपलं? का असं शहरी घर सोडून आलोय आपण? इथं एकटय़ानेच आयुष्य काढायला जमेल का? हा कसला अट्टहास? इतरांना दाखवून द्यायचंय का, की मी एकटा राहू शकतो ते? इत्यादी प्रश्न सतत छळत होते. तरी मी स्वत:ला दटावून तिथे जमवून घ्यायच्या मागे होतो. त्यासाठी दोन दोन दिवसांनी शहरात जाऊन थोडं काम, थोडा टाइमपास करायचा असं चाललं होतं. त्याच वेळी एके दिवशी गावातल्या एसटी स्टॉपवर ‘ती’ दिसली. मग तर प्रश्नांचा वेग अजूनच तीव्र झाला. एकांतवास म्हणजे नक्की काय? आपण खरंच एकटे असतो का? आत आत एकदम मनाच्या आत आपल्याला काय वाटत असतं? कोणी तरी जवळ पाहिजे की नकोच? जवळ पाहिजे असल्यास कशाला? किती वेळ? आयुष्यभर? का काही महिने? की दिवस? टक्केवारी काढायची तर मला ७०-३० असं वाटायला लागलं. ७० टक्के एकटं. ३० टक्के दुकटं. कसली टक्केवारी नि काय? सगळे मनाचे खेळ. थोडक्यात मी पर्फेक्ट अडकलो होतो निसर्गाच्या चकव्यात. त्याला मानवी मिती लाभल्याने गुंता वाढायला लागला.

एकटं राहायचं असं कितीही ठरवून आलो असलो तरी तिला पाहायला रोज पावणेनऊच्या एसटीला स्टॉपवरून जाणं सुरू झालं. तिच्या आठवणी येऊन तापायला व्हायचं. त्या ‘ती’मध्ये परत गावातलं हे रूप नि एक शहरी जुनं रूप अशी दोन दोन रूपं होतीच. शक्ती एकच. शरीरं दोन. मग नव्या ‘ती’शी शहरातल्या एसटी स्टँडवर उतरताना फालतू कारण काढून ओळख काढावीच लागली. मग हळूहळू लक्षात आलं ‘ती’चं अस्वस्थ अवघडलेपण. म्हणजे उदाहरण घेऊ, काही दिवसांनी प्रोफेशनली फोन नंबर एक्स्चेंज झाल्यावर- ओळख बऱ्यापैकी नीट झाल्यावर एका दिवशी सकाळचं. त्या दिवशी लगेच जेव्हा साडेआठलाच स्टॉपवर जाऊन उभा राहिलो, ती माझ्याशी फारच उडवाउडवी करत बोलत होती. माझ्याकडे न बघता दुसरीकडेच बघत होती. मला काही कळेना. मग जरा वेळानं टय़ूब पेटली जेव्हा मी आजूबाजूला बघितलं. बाजूला गाव जमा होता ना नि बरेचसे आमच्याकडेच बघत होते. काय होतं त्यांच्या नजरेत- एका बाजूने स्वातंत्र्याचं आश्चर्य नि दुसऱ्या बाजूला ते कसं दाबावं याची चिंता. ‘ती’ मग शहरात उतरल्यावर नेहमीप्रमाणे काही चुकार शब्द बोलली नि घाईने निघून गेली. तिथपासून दोन आठवडे काही बोलणं नाही झालं. मी शहरी जीवनातला मुक्तपणा कोळून प्यालेलो असल्याने माझा मेसेज प्रवाह दुथडी भरून वाहत होता. त्याला पलीकडून काहीही प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे माझी इकडे चिडचिड होत होती. भलताच निराश वगैरे होतो. आधुनिक रिलेशनशिप्स घडवण्यात मोलाचा हात असलेल्या मोबाइल या टेक्नॉलॉजीचाही काही उपयोग नव्हता. महिनाभर हे असंच चालत राहिलं. शहरातून आल्याने मला सगळं ‘फास्ट’ घडणं अपेक्षित होतं. तसं काही न होता, रडतखडतही होत नव्हतं. (इथं या स्थितीत कुविचारी मुलांकडून पुरुषीपणाचा एक उद्दाम आविष्कार घडू शकतो तो म्हणजे- एकतर्फी प्रेमातून खून किंवा अ‍ॅसिड हल्ला) मला तिचं नकार देण्याचं स्वातंत्र्य मान्य होतं. फक्त एकच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे कारण काय? म्हटलं तर हाही एक पुरुषी अहंकारच होता; पण जरा संयमित, अस्वस्थ असा. आपलं काही चुकलं का? या प्रश्नातून आलेला थोडा. जवळपास त्यानंतर आठवडाभर विविध प्रकारचे मार्ग चोखाळल्यावर एका मेसेजला तिचा वैतागलेला प्रतिसाद आला. त्यात तिनं मला जे लिहिलं ते वाचून मी वेडाच झालो. तिनं लिहिलं होतं- ‘हल्ली काही गोष्टी अशा घडतात ज्याचा मला त्रास होतो. लोक आधी ओळख काढतात. मग बोलायला लागतात, पण त्यांचं ‘इंटेंशन’ वेगळंच असतं. उगाच कॉल करून विचारत बसतात.’

माझे अतिरिक्त विचार सुरू झाले. माझी सुरुवात तिच्याविषयीच्या शारीरिक आकर्षणामुळे झाली याबद्दल शंका नाही. ती तशी होतेच हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नव्हता. वाईट याचं वाटलं की, तिनं मला ‘फक्त’ लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या पुरुषांमध्ये नेऊन बसवलं होतं. मला दहशतवादी असल्यासारखंच वाटायला लागलं. मध्यंतरी मला एका मैत्रिणीने दारू पिऊन माझ्याशी बोलत जाऊ नकोस, असं सांगितलं होतं तेव्हाही असंच वाटलं होतं. आजवर झालेल्या सर्व चुका मान्य करून, शरणागत होऊन मी एका विवाह समुपदेशक असणाऱ्या मैत्रिणीशी या विषयावर चर्चा केली. तिचं मत असं होतं- बहुसंख्य तरुणी सोशलायझेशन प्रोसेसच्या बळी आहेत. सेक्ससाठी विचारणं हा काही गुन्हा ठरत नाही, पण कन्सेंट घेणं महत्त्वाचं. एखादी मुलगी नाही म्हणाली तरी मग तिचा पिच्छा करून जबरदस्ती करणं, हा नक्कीच गुन्हा आहे. यात कोणालाच शंका नाही. एका ‘ती’चं हे मत ऐकून मला जरा हलकं वाटलं. मग एकांतवास राहिला बाजूला. माझे विचार सुरू झाले.

शिक्षण-नोकरीच्या शोधानंतर व्यक्तीला आपल्या हक्कांची जाणीव झाली. आता मुलीही जेव्हा बाहेर पडायला लागल्या, तेव्हा त्यांनाही त्यांच्या एकटेपणाची (स्वातंत्र्य या अर्थी) जाणीव होणं अपरिहार्य होतं; पण अजूनही वाढता सामाजिक दबाव असल्याने त्या पेचात आहेत. जशी ही गावातली ‘ती’. एखाद्या मुलाने म्हणजे समजा मी, ठरवलं की एकटं राहून आयुष्य काढूयात, तर सामाजिक दबावाला तोंड देऊन मी एक वेळ सुटीनही. एखाद्या कमावत्या मुलीनं ठरवलं, समजा या गावातल्या ‘ती’ला असंच एकटं राहून काही तरी करायची इच्छा असेल तर? ते तिला जमूही शकेल; पण तेवढी हिंमत दाखवताना ती धारातीर्थी पडू शकते, तिचे लचके तोडले जातील हे तिला नि आपल्यालाही चांगलंच माहितीये.

हेच ते त्यांचं सोशलायझेशन. म्हणजेच सामाजिक बंदिस्तता. घरच्या प्रथा-परंपरा-संस्कार या त्रिमूर्तीमुळे बहुसंख्य मुलींचं आयुष्य वडीलधाऱ्यांपुढे पूर्णत: दबून जातं. लैंगिक समानतेच्या मोहिमेमुळे काही अंशी मुली-स्त्रिया बाहेर फिरत असल्या तरी अस्वस्थतेचं वातावरण आहेच. एक तर नुसता समानता कायदा करून काही होणार नाही. नुसत्या कायद्यानं मनातली मुळं उपटली जात नाहीत, हे प्रत्येक वेळी दिसून आलंय. त्यासाठी शिक्षणव्यवस्थेत (शाळा-पाठय़पुस्तकं यात येतातच; पण एकूण सामाजिक व्यवस्थाही अंतर्भूत आहे) तशा ‘बिनसंस्कारी’ सुधारणा व्हायला हव्यात. मुलगी = बाहुली. मुलगा = सैनिक/शूरवीर किंवा मुलगा कधी रडत नाही, मुलीनंच घरकाम करावं, असली उदाहरणं देणं बंद झालं पाहिजे, कारण मोठं झाल्यावर त्या बाहुलीचं रूपांतर दुर्दैवानं वेश्येत झालं तर त्याबद्दल कोणालाच काहीच वाटत नाही. अगदी स्त्रियाही नाकं मुरडून त्यांना तुच्छ करतात. तरी एकीकडे लैंगिक समानता मोहीम चालू राहिली पाहिजे यात काही वाद नाही. त्याचसोबत प्रत्येक माणूस हा ‘युनिक’ आहे. हे सर्वाना आतून जाणवणं गरजेचं आहे. (म्हणून खरं तर आधार – द युनिक आयडेंटिटी कार्डचं महत्त्व आहे.) म्हणजे मग जेंडर बायस संपून एक व्यक्ती आतून सगळ्यांशी ‘कनेक्ट’ होऊ शकेल. ही पद्धत कशी सर्वांपर्यंत पोचेल यावर अजून विचार व्हायला हवा, असं मला वाटलं. कुठल्याही ‘मी’ने जर तो सुरू केला तर ‘मी’ नि ‘ती’ या अपरिचित मितीवर अजून प्रकाश पडेल. ही एक खरंच अगम्य मिती आहे. ‘ती’ कोणतंही रूप, आकार, गंध घेऊन येते. आपणही त्याच फॉर्ममध्ये तिच्याशी ‘कनेक्ट’ होतोय का हे शोधणं आपल्याला सुरू करता यायला हवं. मग तसं जगताना दिसायला हवं. त्यावर काम करणं व्यक्तिगत आहे. कारण प्रत्येक जण अनंतविध दिशांनी झेपावतोय. सायकलच्या स्पोक्ससारखा; पण झालंय असं की, सध्या ‘मी’च एवढा तुटलेलो आहे स्वत:शी. तर कुठल्याही ‘तो’शी किंवा ‘ती’शी मिती जुळून येणं अवघडच झालंय. आपण कनेक्शनचा विचारच करत नाहीयेत. फ्रॉइडने माणसाच्या गरजांचा विचार करताना प्रतिष्ठा (ईगो) नि सेक्स याला अनन्यसाधारण महत्त्व का दिलं ते कळलं. डार्विनही नैसर्गिक निवडीबद्दल बोलताना लैंगिक द्वंद्वाविषयीच का बोलतो, ते जाणवलं. प्राण्यांचं जीवन त्या प्रकृतीला अनुसरून सुरळीत चालू आहे; पण माणूस म्हणून आपली संस्कृती श्रेष्ठ असल्याचा जेव्हा आपण दावा करतो तो आजूबाजूला बघताना किती चुकीचा आहे हे दिसून येतं. परस्परांविषयीचं शारीरिक आकर्षण तर मान्यच करावं. ते न केल्यास अडकल्यासारखं होईल. फक्त विचारी माणसाला तिथे न थांबता पुढे ‘मेंटल कनेक्शन’पर्यंत जावं लागेल. अस्सल भारतीय अतिभावनिक होण्याचा धोका यात आहेच. तो टाळून सजग राहणं म्हणजे परत तारेवरची कसरत आली.

पण ठीके. कशाशी तरी कनेक्ट होणं गरजेचं आहे. सॉरी! ती गरज नाहीये. तीच मिती आहे की मी नि ती आहोत?

हळूहळू माझ्या शहराच्या ट्रिपा कमी झाल्या. फालतूचे मेसेज करणं थांबलं. कधी तरी ती स्टॉपवर दिसली. आम्ही एकमेकांकडे नुसतं पाहिलं. काहीच बोलावंसं वाटलं नाही. ही अस्वस्थ मिती, एकदमच शांत झाली नि अपरिचितसुद्धा. आता दुसरी मिती अंगावर येण्याची वाट पाहत मी थांबलोय. त्याला समर्थपणे कसं सामोरं जायचं? याचे विचार चालू झालेत.

हृषीकेश पाळंदे

hrishpalande@gmail.com