18 January 2019

News Flash

तू है तो सब कुछ है

कारण ती आजूबाजूला, विचारविश्वात नव्हतीच कधी.

खरं तर कोल्हापूरसारख्या छोटय़ा शहरात वाढलेल्या आणि सध्या पंचविशी-तिशीत असणाऱ्या आम्हा तरुणांची एक वेगळीच गोची झालेली आहे. मी एका मराठी शाळेत शिकलो, ती शाळा जरी मुलामुलींची असली तरी आमच्यावरचे संस्कार आणि एकूणच शाळेचं वातावरण असं होतं की, मुलामुलींच्यात संवाद नव्हताच. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, नाटकाच्या निमित्तानं जो काही संवाद होईल तितकाच आणि तेवढाच. आणि जरी तो झाला तरी त्याची गावभर चर्चा व्हायची. त्यामुळे शाळेत असताना ‘ती’ला कधी समजूनच घेता आलं नाही. कारण ती आजूबाजूला, विचारविश्वात नव्हतीच कधी.

सुदैवानं एक बरं झालं की, शाळेतून बाहेर पडताना ‘ऑर्कुट’ आलं आणि मी इंजिनीअरिंग कॉलेजला जाईपर्यंत ‘फेसबुक’ सुरू झालेलं होतं. खरं तर आम्ही साऱ्यांनी या दोन्ही माध्यमांचे मनापासून आभारच मानले पाहिजेत. कारण या माध्यमांमुळे पहिल्यांदा निदान माझा तरी भिन्नलिंगी संवाद सुरू झाला. ‘फेसबुक’ आणि ‘ऑर्कुट’चं एक बरं होतं की, कॉम्प्युटर स्क्रीनच्या आड लपून हा संवाद करता येत होता. त्यामुळे तो जास्त ‘सेफ’ वाटायचा, यातून काही वाईट होणार नाही, असं वाटायचं कदाचित. आमच्यासारख्या सर्वानाच अशा एका माध्यमाची नितांत गरज होती. प्रत्यक्षात तिच्याशी बोलता न येण्याची कमतरता ‘फेसबुक’ आणि ‘ऑर्कुट’नं भरून काढली. त्यामुळे ही माध्यमे लगेचच लोकप्रिय झाली. आमच्यापेक्षा ४-५ वर्षांनी लहान असलेल्या आमच्या नंतरच्या पिढीला मात्र ती माध्यमे खूप आधी मिळाली. त्यामुळे एकुणातच त्यांचे ‘ती’च्याबरोबरचं वागणं- बोलणं खूप आधीपासून सुरू झालं व ते जास्त मोकळंढाकळं राहिलं, असं आत्ता जाणवतं. अर्थात यामध्ये तुम्ही राहता ते गाव, शाळा, शाळेची शिस्त या सगळ्याचा भाग तर आलाच; पण कित्येक शहरी मध्यमवर्गीय मुलांची अशीच अवस्था होती याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. तोपर्यंत तिची प्रतिमा ही पाहात असलेल्या चित्रपटांवरून, आजूबाजूला जेवढं निरीक्षण शक्य आहे त्यावरूनच निदान मी तरी तयार केलेली होती. त्या वेळी ‘लगे रहो मुन्नाभाई’मधली विद्या बालन आणि ‘वेकअप सिद’मधील कोंकणा सेन-शर्मा ही दोन ठळक नावं मला आठवतात. या दोन्ही कॅरॅक्टर्स मला प्रचंड आवडल्या होत्या व ज्यांच्यावरून माझ्या मनात ‘ती’ची प्रतिमा तयार झाली होती. माझी ‘ती’ची पहिली ओळख ही अशी!

‘फेसबुक’वरून खूप ओळखीच्या मुलींशी संवाद सुरू झाला, शिवाय अनेक नव्या मैत्रिणीही झाल्या. त्यामुळे पुढे कॉलेजला जाईपर्यंत निदान ‘ती’च्याबद्दलचे गैरसमज जाऊन त्याची जागा कुतूहलाने घेतली होती. इंजिनीअिरगच्या आयुष्याची ही खरं तर नेट प्रॅक्टिस म्हणायला हवी. इंजिनीअिरगला ‘ती’ खऱ्या अर्थानं आयुष्यात आली, वेगवेगळ्या मैत्रिणींच्या स्वरूपात. ‘ती’ खूप जास्त सोशीक असते हे आत्ता जाणवतंय, कारण त्या वेळी अगदी गबाळ्या आणि धड बोलण्याचाही सेन्स नसणाऱ्या माझ्याशी अनेक जणींनी मैत्री केली व वर्षांनुवर्षे मला झेललं. त्या चार वर्षांत या सर्वामुळे जणू नवीन विनायक उभा राहिला. आजपर्यंत जगातल्या पन्नास टक्के गोष्टी आपल्याला माहीतच नव्हत्या हे ‘ती’च्यामुळं समजायला लागलं आणि आपोआपच स्वत:च्या जगण्याचं भान येऊ लागलं. तिच्याबरोबर फिरताना, बोलताना, कॉलेजमधल्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करताना जास्तच सावध होऊ लागलो. अंगातले प्रौढांना शोभणारे चेक्सचे शर्ट जाऊन तिथं तारुण्यसुलभ टी शर्ट आले. खुरटी दाढी वाढवून फिरणारा मी रोज गुळगुळीत दाढी करू लागलो, कारण आपल्याला पाहणारी आणि आपल्याबद्दल प्रतिमा बनवणारी ‘ती’ आहे याची जाणीव झाली होती. या सगळ्यामुळे आत्मविश्वास पटकन वाढला. या सर्वात ‘ती’ला इम्प्रेस करायला सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे उत्तम इंग्लिश. तिथं माझी बोंबाबोंबच होती. आज जेव्हा ‘फेसबुक’ ७ वर्षांपूर्वीच्या पोस्ट दाखवतं तेव्हा ती वाक्यं वाचून लाज वाटते. ‘ती’च्यामुळे प्रयत्नपूर्वक इंग्लिश सुधारलं. इतकं की नंतर अनेक ठिकाणी इंग्रजीत न घाबरता बोलता येऊ लागलं. त्या वेळी ज्या कोणत्या वर्तमानपत्रात स्तंभ लिहीत होतो त्या लिखाणाचे विषय आपोआपच बदलले आणि असं लक्षात आलं की, ते लोकांना आता जास्त जवळचे वाटू लागलेत. थोडक्यात ‘ती’नं मला खऱ्या अर्थानं तरुण बनवलं. अर्थात, या सगळ्याच्या जोडीला तिचे मूड स्विंग्स, एखाद्या गोष्टीवरून अचानक बिनसणं, आयुष्यात ‘ती’ असली की होणारे तारुण्यसुलभ राडे आणि भांडणं या सगळ्या गोष्टीसुद्धा आपोआपच आल्या. वरवर ते सगळं फालतू वाटायचं खरं, पण आता कळतंय की, हेच तर खरं जगणं. आपण ‘ती’च्यासाठी कोणी तरी आहोत आणि ती आपल्याकडे अपेक्षेने बघत आहे हे लक्षात आलं आणि आपोआपच एक स्वत:विषयी जाणीवजागृती आली. या कालावधीत जे जे काही धाडस केलं, जे जे छोटं का असेना यश मिळवलं. त्या सगळ्याच्या पाठीमागे ‘ती’ होती हे मान्य करायला हवं.

नंतर एकटाच पुण्याला शिफ्ट झालो आणि त्यानंतरच्या काळात सगळ्यात जास्त सोबत कुणी केली असेल तर ‘ती’नंच. पुण्यात आल्यावर प्रचंड बावचळला होतो खरा. भिन्नलिंगी संबंधातला मोकळेपणा हा कोल्हापूरसारख्या छोटय़ा शहरातल्या मला माहीतच नव्हता. जेव्हा एका मैत्रिणीनं सहज भेटल्यावर मिठी मारली तेव्हा नक्की काय करायचं हे मनाला समजलंच नव्हतं. इथे असणारी ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’ची सवय, कपडय़ातला आणि वर्तणुकीला मोकळेपणा समजून घ्यायला खूप वेळ गेला; पण या सगळ्याला कोल्हापुरातूनच आलेली ‘ती’ मात्र खूप लवकर सरावलेली होती असं लक्षात आलं. स्त्री ही सर्वात जास्त लवचीक आणि गोष्टी सहज स्वीकारणारी असते असं पुस्तकात वाचलं होतं; पण त्याची प्रचीती इथं आली. या गावातली ‘ती’ अधिक बोल्ड, बिनधास्त आणि म्हणून तिच्यात जास्त आत्मविश्वास होता. ग्लोबलायजेशननंतरच्या नव्या जगाची ती खऱ्या अर्थाने प्रतिनिधी म्हणायची. एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोघींपैकी एक ‘ती’ सवाई गंधर्वला जाते, तर दुसरी ती प्रत्येक शनिवार-रविवारी पबमध्ये असते हे कळून चुकलं आणि ‘ती’चं जनरलायझेशन करून आपण लोक किती मोठा घोळ करत होतो याची जाणीव झाली. जणू काही आपल्या समजांना एक थप्पड बसली. पुण्यातल्या सीसीडीमध्ये तासन्तास गप्पा मारत, कधी नाटकांना एकत्र जात, तर कधी कुठली तरी कॉर्पोरेट पार्टी अटेंड करत पुन्हा एकदा माझा ‘ती’चा शोध सुरू झाला..

या नव्या संवादातून एक वेगळीच गोष्ट जाणवली ती म्हणजे आजची ‘ती’ थोडीशी गोंधळलेलीसुद्धा आहे. हातात सिगारेट धरून जगाच्या गप्पा मारेल, सतत बॉयफ्रेंड बदलेल, पण नंतर म्हणेल की, मला नवरा घरगुतीच हवा. शेवटी मला संसारही करायचाय आणि कदाचित लग्न करून घरसुद्धा सांभाळायला लागेल. परदेशात जाऊन भरपूर पैसा कमवायचाय,पण गावची ओढ सुटत नाही, नवीन जग तर हवंय आणि आवडतंय, पण जुन्यातून पूर्ण बाहेरही पडलेली नाही अशी काही तरी विचित्र परिस्थिती ‘ती’ची झाली आहे. म्हणून मग ती हळूहळू पुरुषांमध्येही ‘मॅरेज मटेरियल’ आणि ‘बॉयफ्रेंड मटेरियल’ असे दोन वेगवेगळे गट करू लागते. ज्याच्यासोबत या जगात धमाल करायची ती वेळ आणि व्यक्ती वेगळी आणि ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं ती व्यक्ती आणि तिची वेळ वेगळी असं हे तिचं सोपं वर्गीकरण! खरं तर ती जे काही करते ते तिने शोधलेले व्यावहारिक उत्तर आहे असेसुद्धा मानता येईल. कारण या तिच्या अवस्थेला ती जितकी जबाबदार आहे त्याहून जास्त तुम्ही, मी आणि आपणसुद्धा. पुणे असो वा कोल्हापूर, आपल्या नजरा बदललेल्या नाहीत. आपल्या चर्चेचा विषयसुद्धा बदलत नाही. कुठेही जा आपण अजून तिला नव्या रूपात स्वीकारलंच नाही.

बऱ्याचदा यातून ती स्वत:च मार्ग काढते. धाडस आणि इच्छा हे तिचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. कदाचित त्यामुळेच असेल की, शहरी मध्यमवर्गातून परदेशात शिकायला जाणाऱ्या, राहायला जाणाऱ्या मुलींची संख्या खूप वाढली आहे. याचं कारण असं असू शकेल की, नव्या ‘ती’ला मिळणारा कम्फर्ट झोन, तिच्या आकांक्षांना हवी असणारी स्पेस आपल्या देशात उपलब्ध नाही. इथे चारचाकीतून फिरणारी ती परदेशात गेल्यावर हॉटेलात वेटर म्हणून काम करायलाही कचरत नाही. कारण ‘ती’ला ध्यास असतो तो तिच्या आकांक्षांना बळ देणाऱ्या कम्फर्ट स्पेसचा. असं म्हणतात की, पुरुष जास्त खंबीर असतात; पण खरं तर मनात सगळी द्वंद्वं साठवून नव्या जगाला सामोरी जाणारी ‘ती’ कदाचित आमच्यापेक्षा जास्त खंबीर आहे आणि हे लोण आता ग्रामीण भागातही नक्कीच पसरत आहे, कारण ‘सैराट’मधली आर्ची ही या बदललेल्या ग्रामीण स्त्रीचे प्रतीक आहे. प्रश्न एवढाच उरतो की, तिला हवा तो स्पेस देण्यासाठी आपण पुरुष काय करणार आहोत?

मध्यंतरी असंच झालं! आयुष्याच्या एका टप्प्यामधून जात असताना आजूबाजूला ‘ती’ असणं फार गरजेचं होतं. कारण एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं की, मी जसा आहे तसा, कोणत्याही मुखवटय़ांशिवाय फक्त तिच्या समोरच राहू शकतो आणि मनात कितीही द्वंद्व असलं तरी वरून स्थिर असणारी ती मला सगळ्यात जास्त समजून घेऊ शकते; पण त्या वेळी माझ्या जवळच्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या करिअरसाठी दूर उडालेल्या होत्या आणि त्यांचे स्वत:चे नवीन प्रश्न झेलत नव्या आव्हानांना सामोरे जात त्यांचं जग उभं करत होत्या. त्यामुळे माझ्या आयुष्याचा तो टप्पा लांबला. त्या वेळी लक्षात आलं की, ‘ती’ आहे म्हणून मी आहे. फिल्मी भाषेत सांगायचं झालं तर, ‘तू है तो सब कुछ है..’

विनायक पाचलग

info@pvinayak.com

(सदर समाप्त)

First Published on December 23, 2017 4:52 am

Web Title: kathakathan by vinayak pachalag