23 January 2018

News Flash

ती गेली तेव्हा..

एवढय़ा दिवसांत एकाच वर्गात बसूनही त्याच्याकडे तिचं कधी साधं लक्षही गेलेलं नव्हतं.

हृषीकेश गुप्ते | Updated: June 10, 2017 2:46 AM

आयुष्याच्या प्रवासात ‘ती’ त्याला सतत भेटतच राहिली. कधी प्रवासात, कधी कामाच्या रहाटगाडय़ात, कधी लग्नात, कधी शॉपिंग मॉलमध्ये, कधी नाटय़गृहात, तर कधी बँकेच्या रांगेमध्ये. तिनं कधी त्याला पराभूत केलं, कधी हताश केलं, कधी दिङ्मूढ केलं, कधी तो तिच्या हुशारीने नेस्तनाबूत झाला.. ती वेगवेगळ्या रूपांत त्याला सामोरी येत राहिली असली, तरी एक नक्की, ती कायम त्याला दशांगुळे  पुरून उरली..

ती नि:सीम आहे, ती अनंत आहे, ती अशेष आहे.. आजवरच्या त्याच्या मनातल्या तिच्या सर्व आठवणी त्याच्या आयुष्यातून जाण्याच्याच आहेत..

ती सर्वप्रथम त्याच्या आयुष्यातून गेली, तेव्हा तो चार वर्षांचा होता. शिशुवर्गात नुकताच प्रवेश घेतलेला. घरापासून तोडून कुणी तरी आपल्याला जबरदस्तीने विजनवासात ढकललंय या अन्यायपूर्ण जाणिवेने तो कासावीस झाला होता आणि ती कासावीस करणारी जाणीव त्याच्या डोळ्यांत अगदीच स्पष्ट दिसत होती. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. पाण्याच्या पडद्यामधून सारं काही अस्पष्ट आणि धुरकट धुरकट दिसत होतं.

आजूबाजूला फक्त आवाज होते- रडण्याचे, ओरडण्याचे, खोडय़ा काढण्याचे. त्याच्याच वयाच्या मुलामुलींनी भरलेल्या वर्गातला तो निरुद्देश कोलाहल त्याला अधिकच रडवेलं बनवत होता. ओठ कोरडे पडलेले, घशात दाटून आलेलं असतानाच बाईंनी त्याच्या समोरच बसून जिवाच्या आकांताने रडणाऱ्या एका मुलाच्या फाडकन थोबाडीत मारली. तो मुलगा धाय मोकलून रडू लागला आणि मघापासून त्यानं रोखलेलं रडू शेवटी डोळ्यांतून गालावर आणि गालावरून खाली गळ्यापर्यंत वाहू लागलं. तो हातानेच डोळे पुसत असताना एक रुमाल धरलेला चिमुकला हात त्याच्या गालाशी आला आणि त्याच्या डोळ्यांतून गालावर ओघळणारे अश्रू पुसू लागला. त्यानं मान वळवून पाहिलं तेव्हा त्याला ती दिसली. हे तिचं त्याला झालेलं प्रथम दर्शन होतं. ती तिच्या चिमुकल्या हातातल्या रुमालाने त्याच्या गालावरचे अश्रू पुसत होती. त्याला तिच्या हातातल्या रुमालाचा कापडी स्पर्श प्रचंड मायाळू वाटला. त्या वयातही आईच्या मायेतला आणि तिच्या हातातल्या रुमालाच्या कापडी मायेतल्या स्पर्शातला फरक त्याच्या अजाण मनाला एका वेगळ्याच निरागस, पण अपरिपूर्ण पातळीवर कळला होता. त्याचे हुंदके थांबले. डोळ्यांवर दाटलेला आसवांचा धुरकट पडदा नाहीसा झाला आणि त्याला एकाएकी सारं काही स्पष्ट आणि लखलखीत दिसायला लागलं.

पुढच्या आयुष्यात तिने वेगवेगळ्या रूपांत भेटून त्याची दृष्टी अनेकदा स्वच्छ केली अथवा बदलून टाकली असली, तरी हा त्याला तिचा आलेला पहिला अनुभव होता.. थोडय़ा वेळाने त्याचा खचलेला धीर जो तिने परत मिळवून दिला होता, तो एकवटत त्याने तिचा हात धरून पुन्हा एकदा त्याच्या गालावर ठेवला. जणू त्याला आता तिच्या हातामध्ये आणि त्याच्या गालामध्ये मघासारखा कोणताही कापडी रुमाल, पडदा नको होता. त्यानं तिचा हात त्याच्या गालावर ठेवायला आणि वर्ग सुटायची घंटा वाजायला एकच गाठ पडली. वर्ग सुटल्याची घंटा ऐकून तो तिच्या स्पर्शाची जादू विसरून एका वेगळ्याच सुटकेच्या आनंदात मश्गूल झाला असताना तिने मात्र त्याच्या गालावरचा हात काढून त्याच हाताने त्याचं मनगट पकडलं आणि त्याला थांबवलं. त्याला तिची वाटत असलेली गरज संपलेली होती, त्यामुळे आता काय या नजरेनंच तो तिच्याकडे पाहात असताना तिने तिचे पाच वर्षे वयाचे लालचुटूक ओठ त्याच्या गालावर टेकले आणि ती हसत हसत दुडक्या चालीने तिथून निघून गेली. ती निघून गेली आणि त्या वयातली ती पुन्हा त्याला कधीही दिसली नाही. जणू त्या एका दिवसासाठी त्याला धीर मिळावा म्हणूनच ती त्याच्या वर्गात अवतरली असावी एवढं तिचं नाहीसं होणं रहस्यमय होऊन राहिलं. वयाच्या चाळिशीतही तो मात्र अजूनही शिशुवर्गातच थांबून आहे, तिच्या ओठांचा व्रण त्याच्या गालावर घेऊन, वर्गाच्या दारातून बाहेर पडणाऱ्या तिच्या दुडक्या पायांकडे या वयातही पाहात..

ती त्याला पुन्हा भेटली तेव्हा तो नववीत होता. तिच्या दर्शनासाठी, तिच्या त्याच्या आयुष्यातल्या अस्तित्वासाठी तो आसुसला असतानाच तिने अचानकच पहिली टर्म अध्र्यावर आली असताना त्याच्या वर्गात प्रवेश घेतला. ते दिवस मनातल्या परिकथेतल्या पऱ्यांची जागा चित्रपटातल्या पऱ्यांनी घेण्याची होते. त्यातून तिच्याविषयी अगदी लहान वर्गातल्या विद्यार्थ्यांपासून मोठय़ा वर्गातल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांना आकर्षण होतं. सरकारी नोकरीत असलेल्या तिच्या वडिलांची बदली त्याच्या गावी झाली होती आणि ती चक्क त्याच्या वर्गात आली होती. अधनंमधनं तिच्याकडे कटाक्ष टाकण्यापलीकडे त्याच्यात कसलीही हिंमत नव्हती. इतर मुलं तिच्याकडे पाहून शिटय़ा मारत, तिच्या मागे मागे सायकलवर घिरटय़ा घालत. काही मुलांनी तर तिच्या घरचा फोन नंबर मिळवून तिचा केवळ आवाज ऐकण्यासाठी तिला ब्लँक कॉल द्यायला सुरुवात केली होती. तो मात्र वर्गातल्या एका कोपऱ्यात बसून तिच्याकडे पाहण्याशिवाय काहीही करत नव्हता; किंबहुना करू शकत नव्हता. एवढय़ा दिवसांत एकाच वर्गात बसूनही त्याच्याकडे तिचं कधी साधं लक्षही गेलेलं नव्हतं.

आणि मग तो दिवस उजाडला! त्या दिवशी त्याला शाळेत पोहोचायला उशीर झाला होता. तो अगदी घायकुतीला येऊन घाईघाईने वर्गात पोहोचणार एवढय़ात वर्गाबाहेर तिच्यापेक्षा साधारण पाच वर्षांनी मोठय़ा त्यांच्या शाळेच्या परिसरातल्याच महाविद्यालयात जाणाऱ्या तिच्या बहिणीने त्याला अडवलं आणि त्याच्या हातात तिचा डबा देत त्याला विचारलं, की तू तिच्याच वर्गात आहेस ना! जरा तिला हा डबा देशील? आपण तिच्या वर्गात आहोत हे तिच्या मोठय़ा बहिणीला ठाऊक आहे या जाणिवेनंच त्याच्या अंगी दहा हत्तींचं बळ आलं. पुढे आयुष्यात फार कमी गोष्टींमुळे त्याला आनंद झाला; ही घटना त्यात कायमच अग्रक्रमावर राहिली. त्यानं वर्गात शिरून नंतर तिच्या हातात डबा दिला. त्या वेळी तिने सर्वप्रथम त्याच्या डोळ्यांत पाहिलं.

ती जेव्हा सर्वप्रथम  त्याच्या डोळ्यांत पाहाते तेव्हा भरमध्यान्ही विजांचा लखलखाट होतो, ढगांचा गडगडाट होतो. ती जेव्हा सर्वप्रथम त्याच्याकडे पाहाते, तेव्हा त्याच्या आतली सारी जळमटं, कोळिष्टकं धुतली जातात, स्वच्छ होतात. तो तिच्याकडे कायम पाहात असतो. कधी लपून, कधी थेट. कधी चोरून, तर कधी नागडय़ा निर्लज्जतेने. असंख्य वेळा असंख्य भावभावनांच्या छटा नजरेतून परावर्तित करूनही त्याला जे आजन्म साध्य होत नाही, ते ती आयुष्यात निव्वळ एकदाच त्याच्याकडे पाहून तिच्या एका नजरेतून अध्याहृत करते.

शेवटी नित्यनेमाने येणारा तिच्या जाण्याचा दिवसही उजाडलाच. वर्षभरातच तिच्या वडिलांची दुसऱ्या गावी बदली झाली. इतर अनेक मुलांप्रमाणे तोही अनाहुतासारखा त्या दिवशी गावाबाहेरच्या रेल्वेस्टेशनवर उगवला. लपूनछपून तिच्याकडे पाहात राहिला. ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दुसऱ्या गावी कायमची निघाली होती. आनंद तिच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहात होता. ती हसत होती, खिदळत होती आणि मग अचानक तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती क्षणभर त्याच्याकडे पाहातच राहिली. मग अगदी क्षणभरच तिच्या डोळ्यांत दाटलेलं औदास्य त्याला दिसलं. मग तिनेच त्याला हाक मारून जवळ बोलावलं. ती चार शब्द त्याच्याशी बोलली आणि मग ट्रेन आल्यावर तिच्या कुटुंबासह ट्रेनमध्ये चढली. तिनं निरोपाचा हात हलवला आणि बघता बघता ट्रेनसोबतच निघूनही गेली. तो गलबलला. त्याचा घसा दाटून आला. डोळ्यासमोर पुन्हा एकदा आसवांचा पडदा दाटला. त्याच्या डोळ्यांत दाटलेला पडदा ती गेली म्हणून नव्हता. जाण्याआधी ती त्याच्याशी बोलली होती हे त्याच्यासाठी पुरेसं होतं. तिनं त्याची चौकशी केली होती. एवढंच काय बोलण्याच्या ओघात एकदा तिने त्याचा हातही हातात घेतला होता; पण जे तिला करता आलं होतं ते तिच्या मोठय़ा बहिणीला का करता आलं नाही? जिच्या हातून डबा घेण्यासाठी त्याने बरेचदा मुद्दामहून शाळेत पोहोचायला उशीर केला होता तिला त्याचा शेवटचा निरोप सोडा; पण त्याच्याकडे एक शेवटचा कटाक्ष टाकायचीही आठवण का राहिली नसेल? या विचारानं त्याचं पुढचं आयुष्य कायमचं ग्रासून टाकलं.

ती शांत आहे आणि तो ढवळलेला. ती आश्वस्त आहे आणि तो अधीर. ती चराचरात सामावलेली अनेक रूपांचं एकच एक प्रारूप आहे. तरीही त्याला तिच्या नाना रूपांचा हव्यास..

ती त्याला तिसऱ्यांदा भेटली तो एक निरुद्देश दिवस होता. बिनकामाच्या दिवसांच्या रद्दीतला एक दिवस. वेळ घालवण्यासाठी तो पुण्यातल्या पीएमटीच्या बस स्टॉपवर उभा होता. एवढय़ात ती तिच्या काही मैत्रिणींसोबत आली आणि स्टॉपवर बसची वाट पाहात उभी राहिली. ती बसस्टॉपवर आली आणि चित्रपटातल्या पडद्यावरच्या बॅकग्राऊंड म्युझिकप्रमाणे त्याच्या हृदयातल्या असंख्य तारा झंकारू लागल्या. इतकं अस्खलित सौंदर्य, शरीरसौष्ठव त्याने आजवर कधीही पाहिलं नव्हतं. तिचं रूप, रंग, वर्ण अवर्णनीय होतं. त्या क्षणी दैवी ती दिसत होती आणि तिच्या सौंदर्याच्या तेजापुढे भर मध्यान्हीचं ऊनही फिकं पडलं होतं. पुढची दहा-पंधरा मिनिटं तो तिच्याकडे देहभान हरपून पाहात राहिला होता. तहानभूकच नव्हे, तो सभोवताल विसरला होता. काही वेळाने तिची बस आली आणि ती बसमध्ये चढताचढता तिच्या मैत्रिणीला म्हणाली, ‘‘शी! किती बघतोय हा मुलगा?’’

या तीन आठवणी निव्वळ ‘टिप ऑफ द आइसबर्ग’ ज्या कायम जलपृष्ठाच्या वर राहिल्यामुळे आठवणींच्या दृष्टिक्षेपात राहिल्या. खरं तर आयुष्याच्या प्रवासात नंतरही ती त्याला भेटतच राहिली. कधी प्रवासात, कधी कामाच्या रहाटगाडय़ात, कधी लग्नात, कधी शॉपिंग मॉलमध्ये, कधी नाटय़गृहात, तर कधी बँकेच्या रांगेमध्ये. कधी ती त्याला निव्वळ त्याच्यासाठी कुटुंबाचे सारे पाश तोडून चालत्या ट्रेनमागे धावणाऱ्या ‘डीडीएलजे’मधल्या सिमरनमध्ये दिसली. कधी ती त्याला उभ्या पुरुषजमातीला स्वत:च्या तेजापुढे नतमस्तक करणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधल्या खलीसीमध्ये, डॅनॅरीस टार्गारीयनमध्ये दिसली.

तिनं कधी त्याला पराभूत केलं, कधी हताश केलं, कधी दिङ्मूढ केलं. कधी तो तिच्या हुशारीने नेस्तनाबूत झाला, कधी तो तिच्या दिव्यत्वापुढे किंकर्तव्यमूढ झाला, तर कधी त्याने तिच्या सौंदर्यापुढे अक्षरश: गुढघे टेकले. ती वेगवेगळ्या रूपांत त्याला सामोरी येत राहिली असली, तरी एक नक्की, ती कायम त्याला दशांगुळे पुरून उरली. ती अनेक प्रारूपांतून त्याच्यासमोर प्रकट होत असली, तरी ती एकमेव आहे हे त्याला अजूनही कळलेले नाही. ती त्याची पाणिग्रहिणी बनून कायमची त्याला प्राप्त झालेली असली, तरी तो तिला तिच्या अनंत रूपांमध्ये अजूनही शोधतोच आहे. एवढय़ा वर्षांनंतर त्याला एक मात्र कळून चुकलंय, की तो तिच्याशिवाय पूर्ण नाही आणि ती त्याच्याशिवाय अपूर्ण नाही.

हृषीकेश गुप्ते rushikesh.gupte@gmail.com

First Published on June 10, 2017 2:46 am

Web Title: love of mother
  1. No Comments.