17 December 2017

News Flash

निवड

भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेने लग्न, जोडीदार, वंशसातत्य याचं नको इतकं अवडंबर माजवून ठेवलं आहे.

विवेक कुलकर्णी | Updated: September 28, 2017 9:18 PM

प्रतिनिधिक छायाचित्र

पारंपरिक पुरुषप्रधान मुशीत वाढलेली ‘ती’ व आधुनिक स्वतंत्र वळणाची, स्वत:च्या विचारांवर ठाम असणारी ‘ती’ या ‘ती’च्या दोन रूपांमध्ये कमालीची सामाईकता आहे. ती सामाईकता म्हणजे ‘निवडीचा अधिकार’. परिस्थिती कशीही असली तरी तिला त्यातून निवड करता येते. वीसेक वर्षांपूर्वी असा निवडीचा पर्याय तिच्यासमोर नव्हता. समोर येणारा पुरुष हा आपली जबाबदारी घ्यायला सक्षम आहे का नाही इतकंच तिच्यासमोर असायचं.

पहिला प्रसंग –

‘‘नवरा मुलगा कोण आहे?’’ आत्या नावाच्या बाईचा प्रश्न. मुलगी बघायला गेल्यावर पहिला प्रश्न विचारल्या विचारल्या त्याला जोडून पुढचे प्रश्न येणार. ‘‘किती कमावतो मुलगा.’’ ‘‘पॅकेज किती आहे त्याचं?’’

दुसरा प्रसंग –

‘‘शिक्षण किती झालंय?’’ त्याने मुलगी बघायला गेल्यावर तिला केलेला पहिलाच प्रश्न. ‘‘एमए इंग्लिश.’’ ‘‘तुम्हाला पगार किती व पर्मनंट नोकरी आहे का तुमची?’’ त्याला तिने विचारलेला प्रश्न.

तिसरा प्रसंग –

स्लॅमबुकमध्ये त्याने कौतुकाने मैत्रिणींकडून एक कॉलम भरून घेतलेला ‘लाइफ पार्टनर कसा असावा?’ सर्वच्या सर्व मैत्रिणींनी एकच दिलेलं उत्तर ‘तो काळजी घेणारा असावा.’

चौथा प्रसंग –

‘‘मला कर्तृत्ववान पुरुष आवडतात. जे पुरुष काहीच करत नाहीत, नुसते बसून राहतात किंवा वडिलोपार्जित संपत्तीवर जगतात असे पुरुष मला आवडत नाहीत.’’ व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंगमध्ये ‘ती’ने त्याला दिलेले सडेतोड उत्तर.

पाचवा प्रसंग –

‘‘माझी स्पेस मानणारा, माझ्यावर पुरुषी अरेरावी न करणारा, त्याचं मूल पोटात वाढवायचं का नाही याचा निर्णय घेऊ  देणारा, त्याची आर्थिक स्थिती उत्तम असेल तर मला नोकरी न केल्याची, करिअर सोडून दिल्याची खंत वाटणार नाही असा जोडीदार हवाय.’’ दुसऱ्या एका व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगमधील ‘ती’चं उत्तर.

भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेने लग्न, जोडीदार, वंशसातत्य याचं नको इतकं अवडंबर माजवून ठेवलं आहे. वरील पाच प्रातिनिधिक प्रसंग नेहमीचे असले तरी इथल्या सामाजिक-सांस्कृतिक चौकटीत नैसर्गिक निवडीला कुठलंही स्थान नाही ही बाब ते अधोरेखित करतात. त्यामुळे तिच्या स्वार्थाला इथे बराच वाव ठेवला गेलेला आहे. तिने सामाजिक, सांस्कृतिक चौकटीत तिला ‘क्लिक’ होणारा पुरुष निवडावा असा प्रघात पडलेला असावा, अशी आजची परिस्थिती आहे.

करिअर, शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी गोष्टी करताना आपल्यासाठी निवडला गेलेला साथीदार, जोडीदार कसा असावा याचे आडाखे बदलले आहेत. तो कोण असावा, त्याने कुठे नोकरी करावी, कुठल्या पद्धतीची नोकरी केल्याने तिला व तिच्या मुलांना कसे सुरक्षित आयुष्य जगता येईल याचे पर्याय समाजानं तिच्यासमोर ठेवले आहेत. त्यानुसार ‘ती’ ते तिच्या मर्यादित आकलनात वापरत आहे. आज ती बदलली आहे असं नेहमी ऐकण्यात येतं. कुठल्या अर्थाने ती बदलली आहे ते मात्र पूर्णत: लक्षात येत नाही. तिच्या जोडीदार निवडीला चॉइस आहे, पण ती खरंच त्याला निवडू शकते का, असा प्रश्नही उपस्थित होतो. काही काही वेळेस त्याची केलेली निवड पुढे चुकली म्हणण्याइतपत परिस्थिती वाईट झालीय, असंही निदर्शनाला येतं.

समाजानं एका विशिष्ट परिस्थितीत तिचं केलेलं संगोपन तिला सुरक्षित आयुष्य बहाल करतं. त्यामुळे मग कुठल्याही भूमिकेतला ‘तो’ असला तरी तिला फरक पडत नाही. कधी नवरा अचानक वारला म्हणून दुसरं लग्न करण्याचा चॉइस तिच्यासमोर आहे. दुसरं लग्न नाही केलं तरी वडील, भाऊ  यांच्या मानसिक, वडीलधारी आधाराने नोकरी, व्यवसाय करत मुलांचं संगोपन करून त्यांना कर्तृत्ववान करण्याचा पर्याय तिच्यासमोर आहे. तिला वाटलं तर ती ‘लिव्ह इन’मध्ये राहून आपला जोडीदार निव्वळ पारंपरिक भूमिकेतला नऊ  ते पाच नोकरी करणारा न राहता कुठला तरी मोठा व्यावसायिक/उद्योजक असलेला निवडू शकते.

स्वजातीत मनासारखा पुरुष नाही मिळाला तर ती आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडीदार निवडू शकते. याबाबतीत तिचा उंबरठा बराच दूरवर आहे. असा आंतरजातीय, आंतरधर्मीय पुरुष निवडताना तिला समाजाने घालून दिलेल्या ‘प्रेम’ नावाच्या संकल्पनेत आपण पडलो आहोत याचा साक्षात्कार होतो. तिला वाटतं तिने केलेली निवड योग्य आहे. त्यासाठी ती घरदार, कपडेलत्ते सोडायला तयार होते. प्रसंगी घरच्यांच्या विरोधात जाते. तिच्या निवडीवर होणारं आक्रमण तिला थोपवायचं असतं. त्यासाठी हातात हत्यार घेण्याची वेळ आली तरी तिला त्याचं काही वाटत नाही.

पारंपरिक पुरुषप्रधान मुशीत वाढलेली ती व आधुनिक स्वतंत्र वळणाची, स्वत:च्या विचारांवर ठाम असणारी ती या ‘ती’च्या दोन रूपांमध्ये कमालीची सामाईकता आहे. ती सामाईकता म्हणजे ‘निवडीचा अधिकार’. परिस्थिती कशीही असली तरी तिला त्यातून निवड करता येते. इंटरनेटने पोखरलेल्या या समाजात निवड करण्याचा अधिकार अंत:प्रेरणेने समाजाने, संस्कृतीने तिला बहाल केला आहे. ही बाजारपेठीय मानसिकता आहे का यावर वाद होऊ  शकतील. बाजारपेठेत वस्तूला किंमत असते. मग समाजाने, संस्कृतीने ‘पुरुष’ नावाची वस्तू निवडावी अशी परिस्थिती आज आहे. वीसेक वर्षांपूर्वी असा निवडीचा पर्याय तिच्यासमोर नव्हता. समोर येणारा पुरुष हा आपली जबाबदारी घ्यायला सक्षम आहे की नाही इतकंच तिच्यासमोर असायचं. त्याला निवडून देऊन आपल्यावर उपकार केले गेलेत अशी भावनाही तयार होण्याला वाव होता.

नैसर्गिक निवडीची शक्यता मानवी संस्कृतीत नसली तरी समाजाने काही प्रमाणात उदारमतवादी दृष्टिकोन बाळगण्याने तिची परिस्थिती काहीशी सुसहय़ झाली आहे असं दिसून येतं. अशी निवड करण्याचा अधिकार तिच्यात कुठनं आला. दोनेकशे वर्षांपूर्वी सुरक्षित वर्तुळात राहण्यात धन्यता मानणारी ती आज स्वत:चं सुरक्षित वर्तुळ तयार करण्याला प्राधान्य देतेय. त्यासाठी ती कधी परदेशात नोकरी, करिअर निमित्ताने जाईल. तिथे तिच्या आयुष्याचा साथीदार मिळाला तर तिला आयुष्य सार्थकी लागल्याची भावना तयार होईल. तो कुणीही असू शकेल. परदेशात नाही गेली तर पलीकडच्या कॉलनीत असणारा एखादा स्वजातीतला किंवा परजातीतला तरुण तिला निवडता येऊ  शकतो. पहिल्या प्रेमात अपयश आलं तरी आयुष्य जगणं गरजेचं आहे, या भावनेतून ती त्याला त्याचं सर्वस्व बहाल करू शकते. ‘द चॉइस इज युअर्स’ असं समाजानं तिला सांगून ठेवलंय.

समाज काहीही सांगत असला तरी हा निवडीचा अधिकार तिच्यात कुठून आला, हा प्रश्न तसाच राहतो. याचं उत्तर तिच्या नैसर्गिक अंत:प्रेरणेत आहे, असं म्हणता येईल. निसर्गाने तिला बहाल केलेलं गर्भाशय याच्या मुळाशी आहे, असं राहून राहून वाटतं. समाजात वरवर दिसणारी तिची अबला, पिचलेली, आत्मविश्वास नसणारी नारी ही प्रतिमा आजच्या निवडीच्या पद्धतीमुळे एकदम निसर्गनिवडीचं तत्त्व जवळ करणारी आहे का, असं वाटतं.

यामुळे ‘तो’ची भूमिका बदलून दुय्यम झालीय का, असं वाटणं साहजिक आहे. याचं उत्तर हो ही आहे व नाही ही. तिच्या नैसर्गिक अंत:प्रेरणेच्या स्वार्थाला निवडीचा अधिकार मिळालाय इतकंच सध्या तरी म्हणता येईल.

विवेक कुलकर्णी genius_v@hotmail.com

First Published on September 28, 2017 9:18 pm

Web Title: right to choose life partner