20 January 2019

News Flash

‘त्या’ सर्व जणी

ती सतत आसपास असते. तिच्या आसपास असण्याची सवय जन्मापासूनच लागलीय.

ती सतत आसपास असते. तिच्या आसपास असण्याची सवय जन्मापासूनच लागलीय. वयाची चौऱ्याऐंशी वर्ष पार केल्यानंतरही तिचा वावर अजूनही तसाच आहे. आमच्या वडिलांनी बिऱ्हाड फिरतं ठेवलं. हिने चार शहरात संसार मांडला, कुडाच्या घरापासून- फ्लॅटपर्यंत! चार शहरात आम्हा चार भावंडांचं शिक्षण पार पाडण्यात हिची सगळी ऊर्जा कामी आली. एकाच शहरात आम्हा चार जणांना चार वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल करण्याची अजब कल्पना हिच्या डोक्यात कशी यायची देव जाणे! पण प्रत्येक शाळेत अर्ज करून, प्रवेशाचे सगळे सोपस्कार पूर्ण करणे हिला सहज जमायचं. आम्हाला शाळेत नेणं, आणणं, आमच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं, घरात ‘गुरुवार’वगळता लागणारा बाजार आणणं, रविवारची गावठी कोंबडी घरातच कापणं या सगळ्या कला तिला चांगल्याच अवगत होत्या.

मला लागलेल्या सिनेमाच्या वेडाला हीच कारणीभूत आहे. ‘सिनेमाचा नाद खूप वाईट’, ‘सिनेमा पाहून मुलं वाया जातात’ या भाकडकथांना न जुमानता ही माझ्यासाठी आगाऊ तिकीट काढून आणायची. ‘जय संतोषी माँ’पासून ‘जवानी दिवानी’ अशी ‘वाईड रेंज’ असलेले चित्रपट हिने मला लहानपणीच दाखवले. आता घरातल्या वाईड स्क्रीनवर जागतिक सिनेमा पाहताना ही माझ्या शेजारी बसलेली असते. हिच्याकडे पाहताना मला ‘अपराजितो’मधली सवरेजया आठवते. वाढत्या वयाच्या अपूकडे कौतुकाने पाहणारी, तो पाहत असलेलं जग जाणून घेण्याची इच्छा असणारी मनस्वी सवरेजया! अपू मोठा होत जातो आणि तिच्यापासून तुटत जातो हळूहळू! माझंही हिच्या बाबतीत असंच झालयं का?

वडील गेल्यानंतर हिच्या कणखर स्वभावाला हादरा बसला. वडील मृत्युशय्येवर असताना तू तुझा अभ्यास कर, शेवटचं वर्ष आहे. असं हिने बजावलं नसतं तर आज मी ज्या स्थानावर आहे तिथे पोहचलो नसतो. आजही रात्री घरी यायला उशीर झाला की मनात ही काय म्हणेल याची धाकधूक असते. तिचा वावर कायम असतो घरात आणि मनातही.

आमच्या घरात विचारांचा मोकळेपणा होताच पण तथाकथित संस्कारांची झूलसुद्धा होती. मुलगा म्हणून ही झूल बाजूला सारण्याचं किंचित स्वातंत्र्य मला मिळालं होतं. त्या चौघींसाठी मात्र ते सहजशक्य नव्हतं. थोरली तासन्तास रेडियोवरची गाणी ऐकायची. आपण जम्पिंग जॅक जितेन्द्रवर फिदा होतो हे आता तिला आठवतही नसेल. दुसरीला चटकमटक खाण्याचा शौक होता. आता ती इतरांना चविष्ट जेवण बनवून देते, पण तिच्या जिभेची चव मात्र हरवलीय.

या चार जणींमुळे एका हाताने कणकेचं पीठ भिजवणं, वरणाला फोडणी देणं आणि मोदकाच्या कळ्या पाडणं मी शिकलो. बालपणी एकाच शहरात न स्थिरावल्यामुळे घट्ट मित्र, हक्काचं क्रिकेट व फुटबॉलचं मैदान या संकल्पनांना मी मुकलो. मात्र घरातच मला जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. घरात शिरल्यावर मी कुणाला भेटून आलोय याचा अचूक अंदाज धाकटीला यायचा. ‘नॉन व्हर्बल कम्युनिकेशन’चे पहिले धडे मी तिच्याबरोबर गिरवले. एकदा गणेशोत्सवात चुलत भावांबरोबर तीन पत्ते खेळत असताना थोरलीने पाठीत सणसणीत रट्टा हाणला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, ‘जुगारी व्हायचं का तुला?’ तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं माझं पत्ते खेळायचं वेड कायमच बुडवून टाकलं.

बालपणात किती शिकलो नकळतपणे त्यांच्याकडून! आमच्या या नात्यातली एक गंमत म्हणजे मला त्यांचा धाक कायमच वाटतो, पण अनेक प्रसंगात त्या माझ्या धाकात आहेत याची जाणीवही होत राहते. त्यांच्या अस्तित्वाने माझं व्यक्तिमत्त्व भारून टाकलेलं आहे. एकमेकांच्या सहवासातून व्यवहारज्ञान व संवेदनशीलता आमच्यामध्ये झिरपल्या आहेत. माझ्या वागण्या-बोलण्यातील कंगोऱ्यांचा शोध त्यांच्यापाशी येऊन संपतो.

मलेरिया झाल्यामुळे आयसीयूत ऑक्सिजन मास्क लावून निपचित पडलेलो असताना त्यांच्या स्पर्शाने शरीरात पुन्हा धुगधुगी आली. मी डोळे किलकिले केले, या चौघींचे डोळे पाण्याने डबडबलेले. आपलं ‘असणं’ किती महत्त्वाचं आहे हे मला त्या एका क्षणाने पटवून दिलं.

मुंबईच्या उपनगरात सुखवस्तू घरात वाढलेल्या हिने माझ्या कल्याणच्या चाळवजा इमारतीत येण्याचं मान्य केलं. घराच्या लांबी-रुंदीपेक्षा पहिल्या भेटीत मी थोडंसं वाढवून-चढवून सांगितलेल्या माझ्या कर्तृत्वाची भुरळ हिला कदाचित पडली असावी. एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम होऊन, पारंपरिक पद्धतीने आमचं लग्न झालं. सजातीय असूनही आमची जीवनशैली वेगवेगळी होती. मला पाचकळशी पदार्थाची आवड तर हिला फास्टफूड अधिक प्रिय. शिक्षणाच्या बाबतीत आम्हा दोघांचं पारडं जवळजवळ सारखंच! या शिक्षणाच्या जोरावर आपल्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालत पुढे जाण्याची माझी सुप्त इच्छा तर साऱ्या क्षमता असूनही घराला प्राधान्य देण्याचा हिचा एकमेव ध्यास! हिच्या या ध्यासापोटी आपण घेतलेल्या शिक्षणाचा योग्य ठिकाणी वापर करावा या माझ्या मताला माझ्यापुरतंच मर्यादित ठेवावं लागलं.

कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याने पाच तासात आपला नवरा घरी येणार ही तिची अपेक्षा मी सपशेल फोल ठरवली. राष्ट्रीय सेवा योजना, फिल्म सोसायटीच्या कामामुळे कॉलेजच्या पाच तासानंतरचे दहा तास घराबाहेर राहण्याच्या माझ्या सवयीशी हिने खूप लवकर जुळवून घेतलं. लग्नानंतर १५ दिवसातच मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या दहा दिवसांच्या शिबिराला निघून गेलो. तिथे ही आली आणि विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकही केला. विद्यार्थ्यांचा अवतीभवती असणारा घोळका, वेळी-अवेळी येणारे त्यांचे फोन, माझ्यावर जरा अति प्रेम करणाऱ्या विद्यार्थिनींनी केलेल्या करामती, याचा हिला निश्चितच त्रास झाला असणार, पण माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून तिने तो निमूटपणे सहन केला. क्वचित प्रसंगी आपल्या खमक्या स्वभावाचं दर्शनही घडवलं. भावनेच्या भरात मी वाहून जाण्याचा प्रसंगही आला. हिने आपलं सर्वस्वच पणाला लावून दिलं.

ही कॉम्प्युटरतज्ज्ञ असल्यामुळे माझं लिखाण टाइप करणं, प्रेझेंटेशन्स् बनवणं व ऑनलाइन व्यवहार करणं मी हिच्याकडे सोपवून निर्धास्त झालो. माझ्या पुरुषी आळशीपणाला हिच्या टेक्नोसॅव्ही गुणाने अधिक प्रोत्साहन दिलं. लॅपटॉपवर काम करताना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मला वेळोवेळी हिला हाक द्यावी लागते. माझ्या लिखाणाची डेडलाईन हिला सांभाळावी लागते. अगदी मध्यरात्र झाली तरीही पेंगुळलेल्या अवस्थेत हिची बोटं लॅपटॉपच्या कीबोर्डवर चालत असतात.

धाकटीचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी मला दबक्या आवाजात सांगितलं, मुलगी झाली. दुसरीही मुलगी झाली म्हणून मी निराश झालो असेन असं त्यांना वाटलं. त्यांच्या त्या दबक्या आवाजानं मला हसू आलं! दुसरी मुलगी झाल्याचा आनंद खरंच वर्णनातीत होता. घरातल्या वंशाच्या दिव्यांमुळे आजूबाजूच्या घराची झालेली राखरांगोळी मी पाहातच होतो. अर्थात मुलगा की मुलगी असा चॉईस ठेवायचा असतो का कधी? घरात बालपणीदेखील स्त्रियांचं राज्य होतं. आता या दोघींच्या जन्मामुळे ते कायम राहणार आहे. याची खात्री होऊन मी निवांत झालो. थोरलीच्या जन्मानंतर काही काळ थांबलेल्या माझ्या कवितालेखनाला पुन्हा बहर आला.

‘घरासाठी राबते ग, अहोरात्र तुझी आई

नीज बाळे ऐकून तू, टीव्हीवरची अंगाई.’

असं मी कवितेत लिहून गेलो खरा. पण आता खरोखरच अगदी झोप येईपर्यंत या दोघी टीव्ही पाहत राहतात. आई-वडिलांना गृहीत धरून परस्पर निर्णय घेण्याची वृत्ती त्यांनी आत्मसात केली आहे. एन्सीसीच्या शिबिराला निघताना आता यापुढे चार दिवस फोन करू नका, आमच्याबरोबर आमचे शिक्षक आहेत. काळजी घ्यायला, असं मला बजावायलाही या विसरत नाहीत.

गायनाच्या परीक्षा पास होऊनही दोघींचाही जीव गायनात रमेना. त्यांनी गाणं थांबवलं. आता त्यांचा मोर्चा चित्रकलेकडे वळला आहे. कॅनव्हासपासून घराच्या भिंतीपर्यंत उत्तम चित्र दोघी काढू लागल्या आहेत. भविष्यात कोण होतील ठाऊक नाही. वर्तमान मजेत जगण्याचा मार्ग त्यांनी आपणहून शोधलाय. या सगळ्यांच्या अस्तित्वाने घर गजबजलेलं असतं, अस्ताव्यस्त झालेलं असतं. दिवसभराच्या कामात एक फोन करून चौकशी करावी एवढं भानही राहत नाही बरेचदा! घरी पोहचलो की सर्वात आधी नजरेस पडतो तो यांनी केलेला पसारा! पण पुढच्याच क्षणी हातात पाण्याचा ग्लास घेऊन एकजण पुढे येते. दिवसभराचा थकवा क्षणार्धात निघून जातो- भुर्रकन!

संतोष पाठारे

santosh_pathare1@yahoo.co.in

First Published on October 28, 2017 2:23 am

Web Title: santosh pathare loksatta chaturang marathi articles