5G Launch In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात 5G सेवांचे उदघाटन करतील अशी माहिती आज राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्वीट करून दिली आहे. भारताच्या डिजिटल मिशनला नवीन उंचीवर नेत आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शन इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधान, नरेंद्र मोदी 5G सेवा सुरु करतील असे या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.

आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच असणारी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हे दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले प्रदर्शन आहे. अगदी अल्प कालावधीत देशातील 5G ​​दूरसंचार सेवांच्या 80 टक्के जोडणी पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मागील आठवड्यात सांगितले होते.

नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात वैष्णव यांनी सांगितले की “5G चा प्रवास खूप बदल घेऊन येणार आहे अनेक देशांना ४० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागली. पण भारतात कमीत कमी वेळात ८० टक्के देशवासियांना 5G ची जोडणी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच ही सेवा परवडणारी आहे याची खात्री करू आणि उद्योग शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर लक्ष केंद्रित करू असेही वैष्णव यांनी सांगितले.

दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६. ४ ट्रिलियन (४५५ अब्ज डॉलरचा) फायदा होण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक तृतीयांश वाटा हा 5G चा असेल. उत्पादन क्षेत्रात , किरकोळ (१२ टक्के) आणि कृषी (११ टक्के) यांना 5G तंत्रज्ञानाचा फायदा होईल असे अंदाज आहेत.

या १३ शहरांना प्रथम 5G वापरता येणार..

दूरसंचार विभागच्या माहितीनुसार, भारतात 5G लाँच केल्यानंतर, भारतातील १३ शहरांमध्ये उपलब्ध होईल. २०२२ मध्ये, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे ५जी सेवा प्राप्त करणारी पहिली शहरे असतील.