AI’s Impact on India’s IT Jobs: नवी दिल्लीतील कृत्रिम प्रज्ञा प्रभाव परिषद (एआय इम्पॅक्ट समिट) पहिल्या दिवशीची अनियंत्रित गर्दी, नियोजनाचा बट्ट्याबोळ, बिल गेट्स यांच्या उपस्थितीवरून अखेरपर्यंत सुरू राहिलेले घोळ आणि गलगोटियास विद्यापीठाचा वावदूकपणा यामुळे नकारात्मक कारणांनी चर्चेत आली. ‘सर्वम्’ या अस्सल भारतीय एआय साधनाची कामगिरीही त्यात झाकोळली गेली. आणखी एका मुद्द्यावर यानिमित्ताने प्रकर्षाने चर्चा व्हायला हवी होती, तो म्हणजे एआय आणि भविष्य. कृत्रिम प्रज्ञेने मानवाच्या भविष्यासमोर कोणती आर्थिक, सामाजिक आव्हाने वाढून ठेवली आहेत, याची वारंवार उजळणी सध्या कळीची. या प्रत्येक उजळणीत इतके नवे काही तरी गवसते, की कृत्रिम प्रज्ञेने मानवी आयुष्याला वेढण्याचा वेग पाहून प्रत्येक वेळी अचंबित व्हायला होते. साहजिकच त्यासाठी सातत्याने तयारीत राहणे, एवढाच उपाय हाती उरतो. ते काय याचे भान या परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा यावे.
‘एआय’मुळे काय बदल होत आहेत?
‘एआय’ने मुळात अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलायला सुरुवात केली. ज्या ज्ञान अर्थव्यवस्थेचा बोलबाला गेल्या काही दशकांत झाला, त्याचा लोलक आता प्रकर्षाने कौशल्य अर्थव्यवस्थेकडे झुकताना दिसतो. ‘एआय’च्या लाटेत टिकून राहण्यासाठी आपली कौशल्ये वारंवार अद्ययावत करत राहणे, आणि त्यात भर घालून नवी शिकत राहणे हाच एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. एखादे विशिष्ट काम करण्यासाठी विशिष्ट नोकरी असे कदाचित येथून पुढे नसेलच. त्या विशिष्ट जबाबदारीच्या ज्ञान संपादणुकीचे सातत्याने वेगवेगळ्या कौशल्यांत रूपांतर करत राहावे लागेल, तरच टिकाव लागेल.
उदाहरणार्थ, मजकुराचे संपादन करण्याचे ज्ञान असलेल्याला केवळ मनुष्यनिर्मित नाही, तर ‘एआय’निर्मित मजकुराच्या संपादनाचेही कौशल्य शिकावे लागेल, ते एखाद्या ‘एआय’ साधनालाच सहकारी म्हणून जोडीने घेऊन करावे लागेल, आणि प्रसंगी ते त्या ‘एआय’ साधनाकडून उत्तम रीतीने करवून घेण्यासाठी त्याला शिकवावेही लागेल. ‘डेटा’चे करायचे काय, याचा विचार आणि त्याद्वारे यंत्र सहकाऱ्याच्या जोडीने ‘डेटा’ला योग्य दिशा देण्याचे तंत्र व पुढे जाऊन यंत्र सहकाऱ्याने हे स्वत:च करण्यासाठीचे प्रशिक्षण अशा या पातळ्या वाढत वाढत जाऊ शकतील. थोडक्यात, शिकणे आणि शिकणे आणि शिकत राहणे याला पर्याय नाही.
‘एआय’मुळे नोकऱ्या जातील का?
हा कळीचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतोच. त्याला पुन्हा एकदा सार्वत्रिक वाचा फुटली, ती ‘एआय इम्पॅक्ट समिट’मधील सन मायक्रोसिस्टीमचे संस्थापक विनोद खोसला यांच्या वक्तव्यामुळे. ते म्हणाले, की पुढील चार वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत माहिती तंत्रज्ञान सेवा अर्थात आयटी सर्व्हिसेस, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे बीपीओ असे काही भारतात राहणारच नाही. ‘एआय’ त्याची जागा घेईल. स्वयंचलनीकरणामुळे (ऑटोमेशन) आयटीमधील अनेक नोकऱ्यांवर गदा येईल, असे तज्ज्ञ सांगतच होते. ते आता प्रत्यक्ष घडतानाही दिसते.
‘एआय’ कोड लिहू शकतो, ग्राहक सेवा सांभाळू शकतो, पासवर्ड रिसेट, ट्रबलशूटिंगसारख्या कामातील मानवाची गरजही त्याने संपवली आहे आणि टेस्टिंग, संकेतस्थळ निर्मिती वगैरे कामेही पार सोपी करून टाकली आहेत. पण, तरी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ‘एआय’ हा नोकऱ्या खात नसून, काही नोकऱ्यांतील ठरावीक कामे खातो आहे. त्यातूनच ‘प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग’ हा परवलीचा शब्द बनला, कारण ते काम शिकण्यातून रोजगारसंधी उपलब्ध होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज. म्हणजे सोपे करून सांगायचे, तर ‘एआय’ साधने कामे करत असली, तरी ती कामे त्या साधनाकडून कुणी तरी करवून घ्यावी लागतात. ते करवून घेणारे बना, हा नवा मंत्र.
‘एआय’सज्जतेसाठी काय करावे लागेल?
साहजिकच मग पुढचा प्रश्न येतो, तो ‘एआय’सज्ज असण्याचा. ‘झोहो’ या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत काही रोचक निरीक्षणे नोंदवली. त्यांच्या मते, ‘एआय’ येऊन आता तीन-चार वर्षे होऊन गेली, पण खूप नोकऱ्या गेल्या असे अजून तरी झालेले नाही. मात्र, ‘एआय’ अजून बळकट झाल्यावर, विशेषत: पुनरावृत्त होणारी कामांशी निगडित नोकऱ्या जातील, असे गृहीत धरून नव्या संधी कोणत्या निर्माण होतात, यावर आतापासूनच लक्ष ठेवायला हवे. उदाहरणार्थ, विविध क्षेत्रांतील अनेक कंपन्यांना त्यांच्या यंत्रणा ‘एआय’सज्ज करण्यासाठी जे त्यांच्या कामांचे परिवर्तन, स्थित्यंतर करायचे आहे, तेथे एक संधी दिसते. नोकऱ्या खूप जातील, यापेक्षा नोकऱ्या त्यांचे स्वरूप बदलतील, असे म्हणणे अधिक योग्य. त्यातील अधोरेखन एकच, या बदलांना तयार राहणे. कसे? तर, कोणत्याही क्षेत्रात सध्या काम करणाऱ्यांनी, किंवा त्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांनी ‘एआय’ कौशल्ये शिकणे. या एआय साधनांबद्दल फक्त वाचणे, अभ्यास करणे पुरेसे नाही, तर ती प्रत्यक्ष वापरून पाहणे महत्त्वाचे, असे वेम्बू सांगतात.
याचा काही तज्ज्ञांनी सांगितलेला आणखी एक आयाम असा, की ‘एआय’चा सध्याचा आधारभर हा बहुतांश बृहद् भाषा प्रारूपे अर्थात लार्ज लँग्वेज मॉडेल्स – ‘एलएलएम’वर आहे. त्यात भाषा हा मजकूर आहे, ज्यावर प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे ध्वनी, छायाचित्रे, चित्रफितींच्या डेटावर प्रशिक्षण देण्यासाठी अजून वाव आहे. त्यामुळे ‘एआय’वर आधारित रोजगारांमध्ये न्यूरल नेटवर्कमधील संशोधन, एआय साधनांचे प्रशिक्षण यात संधी असू शकतात.
‘एआय’ हे नवे ‘एक्सेल’ आहे…
‘डेटा इज न्यू ऑइल’ अशी म्हण जशी गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झाली, तशी ‘एआय’बद्दल ‘एआय इज न्यू एक्सेल’ हा वाक्प्रचार सध्या प्रचलित झाला आहे. ‘एक्सेल’ येत असेल, तर कोणत्याही नोकरीत कधी काही अडत नाही किंवा त्यात पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, असा एक प्रवाद होता. आता ‘एक्सेल’ची जागा ‘एआय’ने घेतली. ‘एआय’मधील मूलभूत काही गोष्टी शिकलेल्या असणे ही नोकरीची आता गरज आहे. कशी? तर ‘एआय’कडून योग्य उत्तर मिळविण्यासाठी योग्य प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण करण्याची, ज्याला ‘प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग’ म्हटले जाते. चांगले प्रश्न विचारायचे, तर विचार केवळ चांगला नाही, चिकित्सक असायला हवा. पाठ केले, उत्तरपत्रिकेत उतरवले, गुण मिळाले हा काळ गेला. वाचले, विचार केला, त्यावर स्वत:चे, स्वत:च्या भाषेत मांडले हा काळ आहे. तो समजून घेतला, तरच ‘एआय’च्या लाटेत तरणे शक्य.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. ती म्हणजे, सध्या ज्या डेटावर एआय साधने तयार झाली आहेत, त्यानुसार त्या साधनांची पातळी ठरते. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत किंवा करू इच्छित आहोत, त्या क्षेत्रामध्ये आपली पातळी त्या क्षेत्रात उपलब्ध एआय साधनांपेक्षा वरची आहे का, हे तपासणे आणि ती वर राहील, यासाठी पुन:पुन्हा कौशल्ये आत्मसात करत राहणे हे आणि शिकणे, शिकणे आणि शिकत राहणे हेच मनाशी घोकत राहणे, हेही आता निकडीचे.
ता.क. : ‘एआय’च्या प्रभावामुळे आयटी सर्व्हिसेस हे क्षेत्र संपेल, असे सांगताना विनोद खोसला यांनी भविष्यातील जगाची कल्पना केली आहे. ते म्हणतात, ‘साधारण २०५० नंतर कुणालाही रोजगाराचीच गरज भासणार नाही, कारण पुरेसे माल उत्पादन आणि सेवा जवळपास फुकट मिळतील. परिणामी, लोकांना रोजगाराच्या मागे धावण्याऐवजी स्वत:ची आवड जोपासण्यासाठी वेळ मिळेल…’ बघायचे हे स्वप्न खरे ठरते का?
siddharth.kelkar@expressindia.com

