पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जीओ आणि एअरटेल यांसारख्या टेलिकॉम कंपन्या 5G इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. सुरुवातीला भारतामधील प्रमुख १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार असून यांत राज्यातील दोन प्रमुख शहर म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. आता आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आजपासून भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशात 5G सेवा सादर करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी सांगितले की, आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२२ भारतात एअरटेल 5जी लाँच होणार आहे. कंपनीने अद्याप सर्व आठ शहरांची नावे उघड केलेले नाहीत, परंतु दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि बंगळुरू हे त्यापैकी काही शहरे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, एअरटेलची मार्च २०२३ पर्यंत अनेक शहरांमध्ये आणि २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एअरटेल 5G सेवा सध्याच्या 4G दरांवर उपलब्ध असेल आणि 5G साठी नवीन दर काही काळानंतर जाहीर केले जातील. चेन्नई, हैदराबाद आणि सिलीगुडी येथेही 5G सेवा सुरू केल्या जात आहेत.

आणखी वाचा : 5G Launch In India: Jio कितीमध्ये देणार सेवा, मुकेश अंबानी म्हणाले…

5G चा वेग किती असेल?

मोबाइल डेटाच्या बाबतीत, 5G नेटवर्क तुम्हाला 4G नेटवर्कपेक्षा दुप्पट गती देईल. व्हिडीओ आणि चित्रपट आता काही सेकंदात तुमच्या फोनवर डाउनलोड केले जातील. 4G मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, पण 5G मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.

 

 

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel becomes first company to launch 5g services in india pdb
First published on: 01-10-2022 at 18:15 IST