नाव मोठं, लक्षण खोटं: 'अमेझॉन'मध्ये टॉयलेटला जायचीही चोरी, कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा| amazon in uk toilet breaks workers revelation workers under watch by managers | Loksatta

नाव मोठं, लक्षण खोटं: ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये टॉयलेटला जायचीही चोरी, कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामासाठी दबाव आणण्यास सुरुवात केल्याचा आरोप होतो आहे.

Amazon Workers revelation In Uk
Amazon Workers (Image Credit- Reuters)

सध्या जगभरात मंदीचे वारे वाहत आहेत. Amazon सारख्या बड्या कंपन्याही त्याला अपवाद नाहीत. अनेक कंपन्यानी हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. पलीकडच्या बाजूस रोजगाराच्या संख्येतही घट झाली आहे. कारण अनेक कंपन्यांनी नवीन भरती पूर्णपणे थांबवली आहे. त्यामुळे बाहेर नोकऱ्याही उपलब्ध नाहीत, अशी अवस्था आहे. अशा अवस्थेत अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामासाठी दबाव आणण्यास सुरुवात केल्याचा आरोप होतो आहे. अॅमेझॉन या बड्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी इंग्लंडमध्ये या प्रकारास वाचा फोडली आहे. आता तर टॉयलेटलाही जायची चोरी झाली आहे. इथे मिनिट अन् मिनिट मोजलं जातं आणि त्याचा जाबही विचारला जातो, असा उघडउघड आरोप डॅरेन वेस्टवूड आणि गारफिल्ड हिल्टन या दोन कर्मचाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना केला आहे.

इंग्लंड (युनायटेड किंगडम) मधील Amazon कंपनीतील कर्मचाऱ्यांना या व्यथा व पगाराच्या समस्येसाठी संप पुकारला आहे. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सारखे लक्ष ठेवण्यात येते. तसेच यामुळे त्यांना टॉयलेटला जाणेही अवघड झाले आहे. केवळ काही वेळ टॉयलेटमध्ये गेला तरी जाब विचारला जातो. बीबीसीने या संदर्भात इंग्लंडमधील कॉव्हेंट्री वेअरहाऊसमधील अॅमेझॉनच्या कर्मचार्‍यांचे उदाहरण दिले आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: Amazonपासून Microsoft पर्यंत अनेक कंपन्यांकडून नोकरकपात; जाणून घ्या किती होता महिन्याचा पगार ?

युके जनरल ट्रेड बॉडी (GMB)ची संबंधित कमचाऱ्यांनी याबद्दल बीबीसीला सांगितले की , कर्मचाऱ्यांची कामगिरी तपासण्यासाठी यंत्रणेचा वापर करणे, यात गैर काहीच नाही. पण कर्मचारी टॉयलेटला गेले आणि दोन मिनिटांपेक्षा थोडा अधिक वेळ लागला तरी त्यांच्या वेळेची नोंद करत त्याबाबत चौकशी करणे, जाब विचारणे हे जरा अतीच आहे. हे असे का, हे व्यवस्थापनाला विचारणे हाही या संपाचाच एक भाग आहे. कर्मचाऱ्यांनी तर याहीपुढे एक पाऊल टाकत असा आरोप केला आहे की, कंपनी तर आमच्या (माणसां) पेक्षा रोबोटलाही चांगली वागणूक देते. आलेल्या वस्तू स्कॅन करून त्याची नोंद करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना वेळेबाबत स्कॅन करून जाब विचारण्यातच कंपनीतील अधिकाऱ्यांचा अधिक वेळ खर्च होत असावा, अशी टिप्पणीही एका कर्मचाऱ्याने केली.

आम्ही काम का थांबवले हे त्यांना जाणून घ्यायचे असते असे सांगून हिल्टन म्हणाला की, तो स्वतः मधुमेहग्रस्त आहे. त्यामुळे त्याला इतरांपेक्षा अधिक वेळा टॉयलेटला जावे लागते. वेअरहाऊसच्या आवारातील टॉयलेट्स लांब आहेत. तिथे जायलाच आठेक मिनिटे लागतात. पुन्हा कामाच्या ठिकाणी यायला साहजिकच १५ मिनिटे लागू शकतात. असे असतानाही १५ मिनिटे टॉयलेटला का लागली, असा जाब विचाला जातो. आणि व्यवस्थापकच्या रोषाला सामोरे जावे लागते. कारण तुम्ही कुठे होता ? काय करत होता? असे प्रश्न सारखे विचारतात. खरं तर आपण किती वेळ जागेवर नव्हतो हे सुपरवायझर सिस्टीमवर पाहू शकतात.

हेही वाचा : मायक्रोसॉफ्टनंतर आता IBM कंपनी करणार नोकरकपात; ३९०० कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

कामाच्या मूल्यमापनाबद्दल अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, तुम्ही कामाच्या ठिकाणी पोहोचून लॉगइन केले की, मूल्यमापनास सुरुवात होते. कर्मचारी लॉगऊट करून बाहेर पडू शकतात, तसा पर्याय देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत व्हावी म्हणून कंपनी कोचिंगवर जास्त लक्ष देते. आपल्याला देण्यात आलेले काम आणि दिला जाणारा मोबदला यात तफावत आहे. हे वेतन अपमानास्पद आहे, असा आरोप करत १५०० पैकी ३०० कर्मचाऱ्यांनी बुधवारी युकेच्या कॉव्हेन्ट्री वेअरहाऊसमधून बाहेर पडत संप पुकारला.

वेस्टवूडने बीबीसीशी बोलताना सांगितले की, जेफ बेझोसच्या अब्जावधी रुपयांच्या संपत्तीशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. आम्हाला त्याची बोट नकोस आणि रॉकेटही नको आहे तर आम्हाला सन्मानाने जगता येईल, असे वेतन हवे आहे. सध्या ब्रिटनमधील महागाईने गेल्या ४१ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. कमी पैशांत जगणे मुश्कील झाले आहे. अश अवस्थेत खर्च भागवण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठवड्यात ६० तास काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:51 IST
Next Story
BSNL Recharge Plan: फक्त ९९ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार अनेक जबरदस्त फायदे, जाणून घ्या