युरोपिअन युनियनने घेतलेल्या निर्णयानंतर अ‍ॅपलसह जगभरातील सर्वच मोबाइल कंपन्यांना सी- टाइप चार्जरची सोय त्यांच्या उत्पादनांमध्ये द्यावी लागणार आहे. त्यासाठीच्या तयारीलाही अ‍ॅपलने यापूर्वीच सुरुवातही केली आहे. मात्र चार्जरमधील एकसमानता म्हणजे नवोन्वेषणातील (इन्नोव्हेशन) सर्वात मोठा अडथळा अशी जाहीर भूमिका अ‍ॅपलने घेतली आहे. टाइप सी संबंधित निर्णय हा जी उत्पादने केबलच्या माध्यमातून चार्ज केली जातात त्यांना लागू आहे. म्हणूनच आपले वेगळेपण टिकवण्यासाठी अ‍ॅपलने वायरलेस मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आणखी वाचा : ‘हा’ रिचार्ज केल्यावरच ग्राहकांना घेता येणार JIO 5G सेवेचा लाभ; नाहीतर मिळणार नाही सेवा…

जगभरातील सर्वच मोबाइल कंपन्यांनी प्रत्यक्ष मोबाइलसह त्याच्यासोबत वापरण्यात येणाऱ्या सर्व उत्पादनांना सी- टाइप चार्जरची सोय दिली आहे. मात्र युरोपिअन युनियनच्या निर्णयापर्यंत अ‍ॅपलने स्वतःचे वेगळेपण जपले होते. अ‍ॅपलच्या सर्वच उत्पादनांसोबत लायटनिंग चार्जरची सोय असते. मात्र अलीकडेच युरोपिअन युनियनने इ- कचरा कमी करण्याच्या सामुहिक उद्देशाने चार्जर्समध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय घेत तसा कायदाही संमत केला. त्यामुळे २०२४ सालापासून युरोपिअन युनिअन अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांमध्ये स्मार्टफोन, कॅमेरा, टॅब्लेट या सर्व उपकरणांसाठी एकसमान यूएसबी टाइप सी चार्जर्स वापरले जातील. ही सोय नसलेल्या उत्पादनांच्या विक्रीवर युरोपात बंदी घालण्यात आली आहे. युरोप ही अ‍ॅपलसाठी जगभरातील एक महत्त्वाची बाजारपेठ आहे, त्या मुळेच अ‍ॅपलनेही यू एसबी टाइप सी चार्जिंग सोय असणारे आयफोन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय केवळ आयफोनपुरताच नव्हता तर अ‍ॅपलच्या इतर उत्पादनांनाही टाइप सी चार्जरची सोय देणार आहे.

आणखी वाचा : Samsung Galaxy S23 सीरीजचे कलर व्हेरिएंट आणि स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या माहिती…

असे असले तरी अ‍ॅपलने जाहीर भूमिका घेताना हा एकसमानतेच्या निर्णय इन्नोवेशन अर्थात नवतेच्या मूळावर येणारा असल्याची टीका केली आहे. दरम्यान, ब्लूमबर्गसाठी नियमित लिखाण करणारे पत्रकार मार्क गु्र्मन यांनी त्यांच्या ‘पॉवर ऑन’ न्यूजलेटरमध्ये अ‍ॅपलच्या भविष्याचा वेध घेताना त्यांचा प्रवास आता वायरलेस मार्गावर सुरू असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅपलबाबतच्या सर्व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी अचूकपणे देण्यासाठी गुर्मन ओळखले जातात. २०१७ साली अ‍ॅपलने ‘एअरपॉवर ड्रीम’ या वायरलेस प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र त्यात फारसे यश न आल्याने २०१९ साली हा प्रकल्प जवळपास गुंडाळलाच. आता पुन्हा एकदा त्यावरची धूळ झटकून अॅपल कामाला लागल्याचे वृत्त गुर्मन यांनी दिले आहे. आपले बाजारपेठेतील वेगळेपण राखण्यासाठी आता अ‍ॅपलकडे हाच मार्ग शिल्लक आहे. वायरलेसमध्ये खात्रीशीर यश येईपर्यंत मात्र अ‍ॅपलकडून टाइप सी चार्जरचाच वापर करण्यात येईल, असे चित्र आहे.