मुंबई : तंत्रजगतातील दिग्गज ॲपल कंपनीचे मुख्याधिकारी (सीईओ) टिम कूक यांनी निवृत्तीची घोषणा केली असून त्यांच्या जागी जॉन टर्नस यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते एक सप्टेंबरपासून ॲपलची धुरा सांभाळतील. संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे महत्त्वाकांक्षी तंत्रभरारी घेणाऱ्या ॲपलचा जागतिक आणि आर्थिक विस्तार करण्याचे श्रेय टिम कूक यांना जाते तर, ॲपलच्या उत्पादनांचे ‘रचनाकार’ समजले जाणारे जॉन टर्नस यांच्यापुढे पन्नाशीतील या कंपनीला पुन्हा नाविन्याच्या वाटेवर नेण्याचे आव्हान असेल.
आजारपणामुळे स्टीव्ह जॉब्स यांनी राजीनामा दिल्यानंतर २०११मध्ये ॲपलची सूत्रे टिम कूक यांच्या हाती देण्यात आली होती. कूक यांच्या कार्यकाळात ‘आयफोन’च्या जोरावर आलेल्या समृद्धीच्या युगात, ॲपलचे बाजार भांडवल चार लाख कोटी डॉलरवर पोहोचले. ॲप स्टोअर, ॲपल म्युझिक, आयक्लाऊडसारख्या सेवांद्वारे ॲपलला नव्या उंचीवर नेण्यात कूक यांचा मोठा वाटा आहे. आयफोननिर्मितीची मुळे भारतात रुजवण्यातही त्यांची मोलाची कामगिरी राहिली आहे. ॲपलमधील २८ वर्षांच्या कारकीर्दीनंतर ६५ वर्षीय कूक कंपनीच्या सक्रिय व्यवहारांतून बाहेर पडतील. मात्र, कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनोस्थित ॲपलमध्ये कूक हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. ॲमेझॉनचे जेफ बेझोस आणि नेटफ्लिक्सचे रीड हेस्टिंग्ज यांनी मुख्याधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ज्या प्रकारे पद हस्तांतरण केले, त्याच धर्तीचा हा बदल असेल.
चालू महिन्यातच ॲपलने पन्नाशी पूर्ण केली. आयफोनमुळे आजही उद्योगजगतात शिखरावर असलेल्या ॲपलपुढे दिशाबदलाचे मोठे आव्हान आहे. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानात आतापर्यंत ॲपलला अपेक्षित प्रगती साधता आलेली नाही. कुक यांनी जॉब्स यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. मात्र, क्रांतिकारी तंत्रज्ञान बदल आणि संशोधनाबाबत त्यांचे सावध धोरण राहिले. ‘आहे तेच वाढवण्या’वर त्यांचा भर राहिला. अशावेळी ॲपलच्या ‘हार्डवेअर इंजिनीअरिंग’चे २५ वर्षे नेतृत्व करणारे जॉन टर्नस यांची नेमणूक हे महाकाय तंत्रज्ञान कंपनीतील लक्षणीय स्थित्यंतर मानले जात आहे. आयफोनच्या वलयातून बाहेर पडून फोल्डेबल फोन, स्मार्ट ग्लासेस, कृत्रीम प्रज्ञावर आधारित रोबोटिक उपकरणे, ‘व्हीआर’ गॅजेटच्या संशोधनावर टर्नस भर देतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
जॉन टर्नस कोण?
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून १९९७ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविलेले टर्नस हे २००१ पासून (स्टीव्ह जॉब्स यांच्या कार्यकाळातच) ॲपलमध्ये दाखल झाले. आयफोन, आयपॅड आणि मॅकच्या हार्डवेअर इंजिनीअरिंगमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एअरपॉड्स आणि ॲपल सिलिकॉनच्या (एम सीरिज चिप्स) विकासामध्ये त्यांची मोठी भूमिका राहिली आहे.
कूक यांचे सातत्य
कारकीर्दीच्या सुरुवातीस आयबीएम, कॉम्पॅक यांसारख्या कंपन्यांचे व्यवहार पाहणारे टिम कूक १९९८ साली ॲपलमध्ये रुजू झाले. ॲपलची सूत्रे हाती घेतल्यानंतर कूक यांनी जॉब्स यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. अमेरिका, युरोपपलीकडे भारतासारख्या देशांत आयफोनची बाजारपेठ निर्माण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ‘ॲपल व्हिजन प्रो’ हे आभासी तंत्रज्ञान आणि वास्तव जग यांचा समन्वय साधणारे तंत्रज्ञान कूक यांच्या कार्यकाळातच सादर झाले. मात्र, किमतीसह अनेक तांत्रिक आव्हानांमुळे ते लोकप्रिय झाले नाही.
