एप्रिल महिन्यामध्ये Apple ने भारतामध्ये मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये आपली दोन रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. Apple चे सीईओ टीम कुक यांनी या दोन्ही स्टोअर्सचे उदघाटन केले होते. Apple चे देशातील दुसरे रिटेल स्टोअर हे दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. दरम्यान, १८ एप्रिल २०२३ मध्ये मुंबईतील बीकेसीमध्ये जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये Apple ने आपले रिटेल स्टोअर सुरू केले होते. देशातील पहिले Apple रिटेल स्टोअर १८ एप्रिल रोजी मुंबईत सुरु झाले आहे. आता Apple च्या स्टोअरबद्दल एक माहिती समोर आली आहे.
अॅपल कंपनी २०२७ पर्यंत भारतामध्ये आणखी ३ स्टोअर्स सुरू करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गचे अॅपलचे मुख्य वार्ताहर मार्क गुरमन यांनी याबाबत एक ट्विट पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले, ”Apple २०२७ पर्यंत नवीन ५३ स्टोअर्सवर काम करत आहे. ज्यामध्ये चीन, जपान आणि कोरियामधील अनेक नवीन ठिकाणांचा समावेश आहे. तसेच भारतात तीन आणि मियामी, डेट्रॉईट, लंडन आणि जर्मनीमध्ये नवीन आउटलेट या ठिकाणांचा समावेश आहे.”




मार्क गुरमन यांच्या मते , नवीन ३ सुरू होणारी स्टोअर्स पहिल्या २ स्टोअर्सप्रमाणेच मुंबई आणि दिल्लीमध्ये सुरू होणार आहेत. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील बोरिवलीमध्ये देशातील तिसरे Apple स्टोअर सुरू होऊ शकते. तसेच २०२७ मध्ये पाचवे स्टोअर हे वरळी येथे सुरू केले जाणार आहे. अॅपल टेक जायंटचे चौथे स्टोअर हे २०२६ मध्ये सुरू होणार आहे. जे राजधानी दिल्लीमधील DLF Promenade मॉलमध्ये आहे. हे भारतातील कंपनीचे सर्वात मोठे दुसरे रिटेल स्टोअर असू शकते.
Apple चे सीईओ टीम कुक यांनी भारतात Apple BKC आणि Apple Saket या भारतातील दोन रिटेल स्टोअर्सचे उदघाटन केले. या दोन्ही स्टोअर्सनी मिळून तब्बल ४४ ते ५० कोटींची मासिक विक्री केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे Apple आपल्या मुंबई आणि दिल्लीमधील स्टोअरसाठी अनुक्रमे ४० आणि ४२ लाख रुपये इतके मासिक भाडे देत आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.