तुम्ही कधी असा लॅपटॉप पाहिलाय का, जो इतका हलका आहे की प्रवासात सहज बरोबर नेता येईल; पण कामगिरी मात्र एखाद्या शक्तिशाली डेस्कटॉपलाही मागे टाकेल अशी आणि हो… त्याची किंमत ऐकून क्षणभर थांबायला भाग पाडेल. ASUS नं नुकताच असा एक प्रीमियम आणि अत्याधुनिक लॅपटॉप सादर केला आहे, ज्याने टेक विश्वात खळबळ उडवली आहे.
२२ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात ASUS ने AI-आधारित ExpertBook Ultra चे अनावरण केले. हा लॅपटॉप केवळ दिसण्यातच नव्हे, तर परफॉर्मन्स, इनोव्हेशन आणि बिझनेस वापरासाठी असलेल्या खास वैशिष्ट्यांमुळेही चर्चेत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात Ultra-Immersive Demo Zone मध्ये उपस्थितांना या डिव्हाइसचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
अप्रतिम डिस्प्ले आणि जबरदस्त परफॉर्मन्स
या लॅपटॉपमध्ये वापरण्यात आलेले ‘टँडेम OLED’ तंत्रज्ञान खरोखरच गेम-चेंजर ठरत. हे तंत्रज्ञान साधारण स्क्रीनपेक्षा ४०% कमी वीज वापरतं; पण ब्राईटनेस इतका जास्त आहे की, उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. त्याशिवाय ३K रिझोल्यूशनमुळे प्रत्येक व्हिज्युअल जिवंत भासते.
परफॉर्मन्सच्या बाबतीतही हा लॅपटॉप पुढे आहे. त्यात Intel Core Ultra Series ३ प्रोसेसर देण्यात आला आहे. AI-आधारित कामं, ग्राफिक्स आणि मल्टीटास्किंगसाठी तो अत्यंत वेगवान आहे.
ASUS कडून आणखी दमदार टेक सोल्यूशन्स
ASUS ने केवळ लॅपटॉपच नव्हे, तर आणखी काही अत्याधुनिक उत्पादनंही सादर केली आहेत.
- NUC १६ Pro: छोटा, पण AI आणि मशीन लर्निंगसाठी शक्तिशाली मिनी पीसी
- PE५१०१D: फॅनलेस आणि मजबूत इंडस्ट्रियल कॉम्प्युटर, ज्यात RAID तंत्रज्ञानासह सुरक्षित डेटा स्टोरेज
- ZenScreen OLED MQ१६CF: फक्त ७८० ग्रॅम वजनाची पोर्टेबल स्क्रीन, जी लॅपटॉप किंवा मोबाईलशी सहज कनेक्ट होते
बॅटरी आणि डिझाईन – प्रवासासाठी परफेक्ट
हा लॅपटॉप केवळ ०.९९ किलो वजनाचा असून, तो अत्यंत पोर्टेबल आहे. त्यात ७०Wh बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर तब्बल २६ तासांपर्यंत चालू शकते. फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी फक्त ३० मिनिटांत ५०% चार्ज होते म्हणजे कामात खंड पडत नाही.
ऑडिओ अनुभव – जणू होम थिएटर!
फक्त १०.९ मिमी जाडी असलेल्या या लॅपटॉपमध्ये सहा स्पीकर्सचा सेटअप दिला आहे. त्यात दोन वूफर्स आणि दोन ट्विटर असल्यामुळे आवाज खोल, स्पष्ट आणि 3D चा अनुभव देणारा आहे. व्हिडीओ मीटिंग असो किंवा चित्रपट; बाह्य स्पीकर्सची गरजच भासत नाही.
किंमत आणि उपलब्धता
हा प्रीमियम लॅपटॉप फ्लिपकार्टवर २२ एप्रिलपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे, जो २९ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. त्याची सुरुवातीची किंमत आहे तब्बल २,३९,९९० रुपये आणि याच किमतीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकं खास काय?
उच्च किंमत असूनही, हा लॅपटॉप त्याच्या प्रीमियम फीचर्स, AI पॉवर, लांब बॅटरी लाईफ आणि पोर्टेबल डिझाईनमुळे बिझनेस आणि प्रोफेशनल वापरासाठी एक दमदार पर्याय ठरू शकतो.
आता प्रश्न एकच ही किंमत योग्य आहे का?
की हे फक्त टेकप्रेमींसाठीचे लक्झरी गॅझेट? निर्णय तुमचा!
