आजच्या काळात खरेदीपासून बिल भरण्यापर्यंत सर्व काही करण्यासाठी लोक क्रेडिट कार्ड वापरतात. बरेच लोक क्रेडिट कार्डने घरभाडेही भरतात. मात्र, आता असे करणे महागात पडणार आहे. आयसीआयसीआय बँकेने आता आपल्या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी एक टक्का शुल्क आकारले आहे.

आयसीआयसीआय बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. हे शुल्क आता लागू करण्यात आले आहे. क्रेडिट कार्डवरून भाडे भरण्यासाठी बँकेने शुल्क आकारण्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तथापि, आता असे मानले जात आहे की इतर बँका लवकरच आयसीआयसीआय बँकेसारख्या त्यांच्या क्रेडिट कार्डवरून भाडे भरण्यासाठी समान शुल्क जाहीर करू शकतात.

या कारणास्तव आकारले बँकेने शुल्क

आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी शुल्क आकारण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. तथापि, क्रेडिट रोटेशनसाठी भाडे भरण्याच्या वैशिष्ट्याचा गैरवापर टाळण्यासाठी बँकेने हे केले असावे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : तुमच्या बॅंक खात्यातील रक्कम तपासा फक्त ‘या’ १२ अंकी क्रमांकानी; फॉलो करा सोपी प्रक्रिया

आत्तापर्यंत फक्त हा चार्ज दिसत होता

आतापर्यंत कोणतीही बँक अशा व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारत नव्हती. यामुळे, अनेक भाडेकरू क्रेड, रेड जिराफ, माय गेट, पेटीएम आणि मॅजिक ब्रिक्स (magic bricks) सारख्या प्लॅटफॉर्मवर प्राप्तकर्त्याच्या पर्यायामध्ये घरमालकाच्या बँक खात्याचे तपशील किंवा UPI पत्ता भरायचे आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरायचे. यासाठी, प्लॅटफॉर्मवर प्रत्येक व्यवहारावर ०.४६ टक्के ते २.३६ टक्के शुल्क आकारले जात होते. मर्चंट डिस्काउंट रेटच्या बदल्यात हे शुल्क आकारण्यात आले. आता क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरणाऱ्यांना या शुल्काव्यतिरिक्त १ टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

हा नियम कोणाला लागू होणार

हा नियम पेटीएम, क्रेड, मायगेट, रेडजिराफ किंवा मॅजिक ब्रिक्स यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे भाडे भरणाऱ्या लोकांसाठी आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वतीने हा नियम लागू केल्यानंतर इतर बँकाही असा नियम लवकरच आणतील अशी शक्यता आहे.